ग्रामीण विकास प्राधिकरणातील काही पदे त्वरित भरणार ः लोबो

0
130

ग्रामीण विकास प्राधिकरणाची (आरडीए) गाडी रूळावर आणण्याची गरज असून त्यासाठी आपण त्या खात्यात अभियंत्यांची काही पदे तातडीने डेप्युटेनवर भरणार असल्याचे व खात्यासाठी आवश्यक असलेली वाहने खरेदी करणार असल्याचे खात्याचे मंत्री मायकल लोबो यांनी काल गोवा विधानसभेत सांगितले. प्रश्‍नोत्तराच्या तासाला आमदार एलिना साल्ढाणा यांनी विचारलेल्या एका प्रश्‍नाचे उत्तर देताना त्यांनी वरील माहिती दिली.

आरडीएच्या दक्षिण गोवा कार्यालयात कनिष्ठ अभियंत्याची पदे रिक्त असून ती कधी भरण्यात येतील असा प्रश्‍न साल्ढाणा यांनी विचारला होता. या कार्यालयात अभियंत्यांची पदे रिक्त असल्याने कामे खोळंबून पडली असल्याचे साल्ढाणा यांचे म्हणणे होते. यावेळी बोलताना मायकल लोबो म्हणाले की आपण नव्यानेच या खात्याचा ताबा घेतला आहे. या खात्याकडे गेली काही वर्षे पूर्ण दुर्लक्ष झाले होते. खात्यात मनुष्यबळाचा अभाव आहे. खात्याकडे आवश्यक तेवढी वाहनेही नसल्याचे ते म्हणाले.
यावेळी एलिना साल्ढाणा यांच्याबरोबरच आमदार चर्चिल आलेमाव यांनी आरडीएच्या दक्षिण गोवा कार्यालयात अभियंत्यांची तातडीने भरती करण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले. त्यावर उत्तर देताना लोबो यांनी खात्यात एवढ्यात भरती करणे शक्य नाही. त्यासाठी थोडा विलंब होणार आहे, असे सांगितले. पण तोपर्यंत आपण दोन कनिष्ठ अभियंत्यांची डेप्युटेशनवर भरती करणार असल्याचे सांगितले. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्यातील दोघा कनिष्ट अभियंत्याना डेप्युटेशनवर घेणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. खात्याचा खोळंबलेला कारभार आपण जाग्यावर घालणार असल्याचेही लोबो यांनी यावेळी सांगितले.

यावेळी बोलताना चर्चिल आलेमाव म्हणाले की, आरडीएला केंद्र सरकारच्या विविध योजनांतून भरपूर निधी मिळत असतो. एकेकाळी आपण आरडीए मंत्री होतो व तेव्हा आपण केंद्रीय निधी मिळवून भरपूर कामे केली होती, असे ते म्हणाले. आरडीएच्या मडगाव कार्यालयातील कर्मचारी कामचुकारपणा करीत असल्याचा आरोप यावेळी आलेमाव यांनी केला. तर लुईझिन फालेरो यांनी या खात्यासाठी अर्थसंकल्पातून चांगली तरतूद करण्यात यावी, अशी सूचना केली. आमदार सुदिन ढवळीकर यांनीही यावेळी काही महत्त्वाच्या सूचना केल्या.