पोलीस खात्याने वाहतूक नियमभंग करणार्याची छायाचित्रे घेण्यासाठी नियुक्त केलेल्या आदित्य कटारिया नामक वाहतूक पहारेकर्याला जाब विचारण्याचा प्रयत्न काही नागरिकांनी सांताक्रुज येथे केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात ओल्ड गोवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
वाहतूक पहारेकर्याला जाब विचारणे, हुज्जत घालणार्याविरोधात कडक कारवाई करण्याचा इशारा पोलीस महासंचालक मुक्तेश चंदर यांनी शुक्रवारी दिला होता. त्यानंतर केवळ चोवीस तासात वाहतूक पहारेकर्याला घेराव घालून जाब विचारण्याची घटना घडली. या प्रकरणी कटारिया यांनी तक्रार दाखल केली आहे. कटारिया यांनी तक्रारीमध्ये एकाही व्यक्तीचे नाव नमूद केलेले नाही. पोलीस महासंचालक चंदर यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेऊन योग्य कारवाई करण्याची सूचना पोलीस अधिकार्यांना केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
कटारिया यांनी वाहतूक नियमभंग करणार्या अनेकांची छायाचित्रे पोलीस खात्याला पाठविली आहेत. पोलीस महासंचालक चंदर यांच्या हस्ते कटारिया यांना ६९ हजार रूपयांचे बक्षीस शुक्रवारी प्रदान करून सन्मानीत करण्यात आले. कटारिया यांना वाहतूक नियमभंगाच्या कार्याबाबत बक्षीस देण्यात आल्याचे वृत्त प्रसिध्द झाले आहे. शनिवारी सांन्ताक्रुज येथे कटारिया यांना पाहिल्यानंतर काही जणांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार करून जाब विचारण्याचा प्रयत्न केला. संतप्त जमावाची माफी मागून कटारिया यांनी सुटका करून घ्यावी लागली.
कटारिया यांनी दमदाटी प्रकरणी चौकशी सुरू आहे. कटारिया यांनी तक्रारीत व्यक्तींची नावे दिलेली नाहीत. या प्रकरणी छायाचित्र व इतर माध्यमातून मिळणार्या माहितीच्या आधारे चौकशी केली जात आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक आशिष शिरोडकर यांनी दिली.