हणजूण येथील एका क्लबमधील पार्टीनंतर संशयास्पदरित्या मृत्यू पावलेल्या इंदूर-मध्यप्रदेश येथील 21 वर्षीय युवकाचा मृत्यू हा अमलीपदार्थांच्या अतिसेवनामुळे झाल्याचे शवविच्छेदनातून स्पष्ट झाले आहे. आता, हणजूण पोलिसांनी हा अमलीपदार्थ त्याला कुठून मिळाला याबाबत तपास सुरू केला आहे. हणजूण पोलिसांनी सदर युवकाच्या मित्राचे जबाब नोंदवून घेतले असून, त्यांनी मद्य प्राशन केल्याची माहिती दिली; पण अमलीपदार्थांबाबत अजून काहीच माहिती उघड केलेली नाही.
शुक्रवारी 3 एप्रिल रोजी हणजूण येथील एका क्लबमधील पार्टीत सहभागी झालेला सदर युवक अचानक खाली कोसळला. त्याला तातडीने एका खासगी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. त्याठिकाणी त्याला मृत घोषित करण्यात आले होते. त्या युवकाच्या शरीरात विविध प्रकारच्या अमलीपदार्थांचे अंश आढळून आले आहेत. अमलीपदार्थामुळे त्याला जीवघेणा हृदयविकाराचा झटका आला, असे अहवालात म्हटले आहे. आता, हणजूण पोलिसांकडून अमलीपदार्थांबाबत चौकशी केली जात आहे. सदर युवक फेब्रुवारी- मार्च देखील गोव्यात आला होता. त्यानंतर 2 एप्रिल 2026 रोजी आपल्या आठ मित्रांसमवेत एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तो पुन्हा गोव्यात आला होता, अशी माहिती पोलिसांकडून मिळाली.