‘त्या’ गुजराती तरुणाचा शोध लागेना

0
16

>> दुसऱ्या दिवशी शोधकार्यात अपयश; गूढ कायम

सांतइस्तेव-आखाडा येथील फेरी धक्क्यावर शनिवारी मध्यरात्री घडलेल्या अपघातानंतर गायब झालेला बासुदेव भंडारी हा गुजरातमधील तरुण अद्याप सापडलेला नाही. त्याच्या शोधासाठी आलेल्या नाविक दलाच्या पाणबुड्यांनाही तो काल दिवसभरात सापडू शकला नाही. या प्रकरणी म्हार्दोळ पोलीस अधिक तपास करीत आहेत.

शनिवारी मध्यरात्री सांतइस्तेव-आखाडा येथील फेरी धक्क्यावरून पाण्यात कोसळलेली जीए-03-डब्ल्यू-8421 ही रेंट-अ-कार रविवारीच बाहेर काढण्यात आली होती. कुंभारजुवे नाल्यात कोसळलेल्या ह्या कारमध्ये एक युवती व एक युवक होता. अपघातानंतर युवती पाण्यातून बाहेर आल्याने ती बचावली होती, तसेच युवकही पाण्यातून बाहेर आला होता; मात्र त्यानंतर तो बेपत्ता झाला होता. सदर युवकाचा काल दिवसभरात पुन्हा शोध घेण्यात आला; मात्र तो सापडू शकला नाही.
या अपघातातून बचावलेल्या युवतीने दिलेल्या माहितीनुसार ती साखळी येथील एका मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये शिकत असून, ती गुजराती आहे, तर तिच्यासोबत कारमध्ये असलेला युवक हा गुजरातमधील असून, तो तिचा मित्र आहे. अपघातानंतर आपण कारमधून जेव्हा बाहेर आले, तेव्हा पाण्यात पडलेल्या कारमधून आपला मित्र बासुदेव भंडारी हा देखील बाहेर आला होता; मात्र नंतर तो कुठे गायब झाला हे आपणाला कळू शकले नसल्याचे तिने पोलिसांना दिलेल्या माहितीत
म्हटले आहे.