नेत्रावळी अभयारण्यात प्राण्यांच्या शिकारीसाठी गेल्याचा आरोप असलेल्या कदंब महामंडळाच्या 16 कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा वनमंत्री विश्वजीत राणे यांनी काल दिला. आरोपींवर वन्यजीव संरक्षण कायद्याखालील कलम 27, 30, 31 व 32 खाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आणि या संदर्भात आपण वनखात्याच्या मुख्य वन संवर्धकांना आवश्यक ते आदेश दिले असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले. या संदर्भात कुणाचीही गय केली जाणार नसल्याचे सांगतानाच वैध परवाना असलेली एक रायफल बंदुक हस्तगत करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
कदंब महामंडळाच्या ह्या 16 कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई केली जावी, अशी मागणी देखील वनखाते कदंब महामंडळाकडे करणार आहे, असे एका वनअधिकाऱ्यानेही स्पष्ट केले आहे. ह्या 16 कदंब कर्मचाऱ्यांपैकी बहुतांश जण हे मडगाव येथील कदंब आगारातील कर्मचारी आहेत.
दरम्यान, ह्या कर्मचाऱ्यांनी अभयारण्यात शिकार केली नव्हती, तर ते अभयारण्यात सहलीसाठी गेले होते. आणि तेथे त्यांनी चिकन, मटण, मासळी आदी स्वयंपाक चूल मांडून केला होता. अभयारण्यात अशा प्रकारे चूल फेटवून अन्न शिजविणे हा गुन्हा असून, वन कायद्यानुसार त्यावर बंदी असल्याचे कदंब महामंडळाचे अध्यक्ष उल्हास तुयेकर यांनी सांगितले. यापैकी 6 जण हे नेत्रावळी अभयारण्य परिसरातील रहिवाशी आहेत. त्यांच्याकडे एक बंदूक सापडल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, सर्व कर्मचाऱ्यांनी ते नेत्रावळी अभयारण्यात शिकारीसाठी गेले होते हा त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावला आहे. आम्ही तेथे शिकारीसाठी गेलो नव्हतो, असे या कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे.
सर्व कर्मचारी कामावर रूजू
या प्रकरणातील सर्व 16 कदंब कर्मचाऱ्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. हे सर्व कर्मचारी काल कदंब महामंडळाच्या मडगाव येथील आगारात कामावर रुजू झाल्याचे कदंब महामंडळाचे चेअरमन उल्हास तुयेकर यांनी काल स्पष्ट केले. त्यापैकी 10 जण हे चालक, तर 6 जण हे वाहक असल्याची माहिती त्यांनी दिली.