- सिया बापट
तेव्हा.. जी शाळा नको वाटायची, आज पुन्हा एकदा त्या वर्गात जाऊन बसावं वाटतं, ती प्रार्थना मोठमोठ्याने म्हणावी वाटते, तो व्यायाम पुन्हा एकदा आत्मसात करून घ्यावा वाटतो, त्या बाईचा ओरडा खावा वाटतो आणि प्रत्येक बाईना, सरांना सांगावं वाटतं, ‘तुमची जागा कोणीच घेऊ शकत नाही’.
‘‘ये महामाया, उठ की आता. किती झोपते ढोरासारखी .. सात वाजलेत गं, चल बाई, उठ! नको अंत पाहू. कधीची उठवतेय.. नववीत गेली गधडे, उठ हं आता, नाहीतर कमरेत लाथ घालीन. आता खूप झालं.’’ ‘‘ये आये! झोपू देनं गं? तूपण ये. तू पण झोप. तुझीपण झोप होत नसणार नं, म्हणून माझ्यावर डावरतेय.. जळू नको माझ्यावर’’, असं म्हणून तोंडावर पांघरून घेऊन पुन्हा झोपली तर ‘श्रद्धा ऽ ऽ ऽ’ असा मोठ्ठा आवाज आला. ‘‘उठली बाबा .. ही काय आवरतेय. उगाच आई माझ्या नावाने बडबडतेय…’’ आई माझ्याकडे तिरक्या नजरेने पाहत राहिली. मी तयार झाली. सायकल काढली आणि निघाली रागारागात.. काय यार! कोणी काढली शाळा? मला कंटाळा येतो, मस्त साखरझोप असते.. सुंदर स्वप्न असतात.. आणि हे दोघे उठवून ठेवतात… विचार करता करता शाळाही आली.. प्रार्थना सुरू, आज त्यातही मन नव्हतं.. त्यात आज परेड-डे.. जीव कंटाळला.. एक एक पाऊल मागे टाकत मी ‘जरा बरी नाही’, असं सांगून बसणार तर तिथे पहिलेच भल्ली मोठी रांग पहिलेच तयार.. शी यार, आजचा ना दिवसच बकवास आहे .. म्हणून रागारागातच व्यायाम पण केला.. बाजूची म्हणते काय.. ‘‘मॅडम आज एकदम जोमात?’’
मी काय म्हणणार? डोकं हलवलं दोन- तीनदा. तिला कळलं जे कळायचं ते.. झाली एकदाची घंटा वर्गात जायची. मी सुसाट वेगाने धावत सुटले वर्गाकडे, त्यात बाकी पण होत्या उनाड मुली.. मी थोडीच होती! पण,. सरांनी पाहिलं ना राव, त्यात पहिलं नाव माझं.. ‘‘क्षीरसागर खाली ये, कुठे पळते? इतकी घाई झाली वर्गात जायची?..’’ मनात म्हणाली… याना काय मीच दिसते का नेहमी? इतक्या सार्या पोरी आल्यात आणि माझंच नाव.. तेही लाऊडस्पीकरवरून?.. मेली मी. आली पुन्हा आपल्या जागेवर.. काय करणार .. गपगुमान रांगेत वर्गात गेले.. सगळा मुडच आज खराब झाला ..
वर्गात आल्यावर दप्तर ठेवून बाकावर डोकं ठेवून विचार करू लागली .. आपल्या मागे शनी-बिनी तर नसेल लागला! काय करता येईल?.. तितक्यात वर्गबाई आल्या आणि आम्ही होतो ना आमच्याच दुनियेत.. तरी बाजुची चिमटे काढत होती .. तिच्यावर जी खेकसली मी.. ‘‘ये बयताडे…’’ म्हणत लक्ष बाईकडे गेलं.. झालं.. झाले वांदे.. नं.. आता ही बया मला वर्गाच्या बाहेर काढते किंवा ग्राउंडचे चक्करतरी मारायला लावते.. विचार करूनच रडू आलं.. बाई माझी तशी बरी होती.. म्हणाली, ‘पुन्हा असं नको करू.. आणि बसा ग सगळ्या..’ देवच पावला रे बाबा..!
मधली बेल झाली तश्या मैत्रिणी जवळ आल्या.. ‘‘काय गं वागते वेंधळ्यासारखी नेहमी? .. कुठे धडपडतेतरी .. किंवा राडातरी करते.. मीही सगळ विसरून गप्पा करायला लागले.. त्यात करूणा म्हणते, ‘‘ये तू प्रियंकाशी बोलली नाही का अजून?’’ त्यात प्रियंका माझी जिवलग मैत्रीण .. पण आमचं कालच कडाक्याचं भांडण झालं. मी ‘नाही’ म्हणाले. तोपर्यंत तीच आली, ‘‘झालं असलं फुगा-फुगी तर चल, रोजचं काम करायचं आहे, उशीर होईल’’. मग काय, मी विसरले. गळ्यात गळे घालून सायकल स्टँडकडे आलो.. करुणा पहारा देत होती. मी आणि प्रियंकानी पटकन अश्विनीच्या सायकलची हवा सोडली.. आणि धूम ठोकली. मग आमच्याशी पंगा कशाला घ्यावा तिने? ..वर्गात गेलो शक्य तितकं हसू दाबत.. आणि कामात मग्न झालो. पुढचा तास सुरू झाला आणि माझं लक्ष खिडकीबाहेर.. बाहेरच गुलमोहराचं उंच झाड.. ऐटदार हिरवं.. त्यावर पक्षी.. मस्त मन रमलं होतं नं होतं.. तितक्यात… जोरात माझ्या डोक्यावर काहीतरी आदळलं. बाईनी खडू फेकून मारला.. समोरून सोनकुसरे बाई, ‘‘ओ, झालं असेल निरीक्षण करून तर इकडे लक्ष देण्याची कृपा करा..’’. ‘हो’ म्हणत पुन्हा वहीत- पुस्तकात डोकं खुपसायला लागली.. तर हे काय..! एक एक अक्षर डोळ्यासमोर उडत आहे. दोन दोन दिसतातेय.. आणि माझ्या डोळ्यांवर झोपेचं अधिराज्य झालं.. मी पुन्हा स्वप्ननगरीत आणि ‘‘क्षीरसागर, ओ महाराणी क्षीरसागर..! उठता ना….’’. आणि मी मस्त प्रेमाने डोळे उघडले. जणु कोणती स्वप्नातली परी मला उठवतेय.. आणि पाहते तर .. बाई..! आज मस्त मार खाणार मी.. माझी वही हातात घेऊन न्याहाळू लागल्या ‘‘..हे हे तुझं अक्षर?.. किडे माकोडे?.. किती वाईट आहे हे.. ‘कु’ला ‘कृ’ वाचायचं तरी कसं?’’ ‘‘बाई मी सुधारेल.’’ जोरात बाकावर वही आदळत निघून गेल्या.. पुन्हा सगळ्यांच्या प्रश्नार्थक नजरा माझ्याकडे.. जणु यांचे अक्षर मोत्याचेच.. त्यात एका वाटेची वेणी सुटली. एक तशीच आहे.. जोकरसारखी दिसतेय.. कसातरी आजचा दिवस जाणार… तितक्यात अश्विनी आली, ‘देवा वाचव रे बाबा .. मी ५ रुपयाचे पेढे वाटेल.. नाही, १० चे पण हिला थांबव..’ झालं कळलं हिला. आता माझं काही खरं नाही.. म्हणून मी पटपट चालायला लागली. तरी तिने गाठलंच..! झालं. आज काय आहे देवा हे; वर्षभराची परीक्षा आजच घेतोस का?.. मनात म्हणू लागले तर बाईसाहेब म्हणाल्या, ‘‘अगं, उद्या पिक्चरला चलतेस का?? माझ्या भीतीवर जसं कोणी थंड पाणी घातलं तसं थंड वाटत होतं.. ती विचारातून जागी करत मला पुन्हा विचारते, ‘‘अगं, येतेस नं?’’.. ‘‘मी काय सांगू बाई! शाळा आहे उद्या आणि संध्याकाळचं बाबा पाठवणार नाहीत’’. ती म्हणाली, ‘‘शाळा उद्या नाही करू’’. मला प्रश्न पडला.. ही चेष्टा करतेय की माझी पडताळणी.. मी बरी आहे की नाही याची? तिने बाकीचा प्लान सांगितला. त्या हिशोबी सगळ्या तयार झालोत.. दुसर्या दिवशी आईच्या पहिल्या हाकेच्या आधीच मी उठून बसलेली पाहून आई अवाक..!! ‘‘अगं, तुला बरं वाटत नाही का?? झोप तू.. नको जाऊ शाळेत आज .. राहू दे..’’ आणि मी.. ‘‘नाही आई, मला काही झालं नाही. मी बरी आहे.’’ ती अजूनच अवाक्. कधी नव्हे ते पोरगी शाळेत जाते म्हणते.. म्हणजेच.. ताप डोक्यात गेलाय.. ती अजूनच काळजीत नि म्हणते .. ‘‘मी तुला पाठवायची नाही, तू झोप बघू.’’ त्यात हा खेळ आमची बहिणाबाई दुरूनच पाहतेय.. नेमकं काय झालं? आज अशी का ‘शाळेत जाते जाते करतेय..?’ मग बाबा आले.. ‘‘बरं वाटत असेल तर जाऊ दे गं तिला. कधी नाही ते शाळेचं महत्व पटलं तिला..’’ मग काय.. आनंदानी शाळेत गेले.. पहिल्याच तासाला सगळ्यांनी एकमेकींना एकमेकींच्या आईबाबांच्या नावाच्या चिठ्ठ्या लिहून दिल्या. एक- एक करून ४- ५ जणी बाहेर पडत होत्या वर्गाच्या.. मी काही चिठ्ठी लिहिली नाही. त्यामुळे मलाही कोणी दिली नाही.. आता सगळ्या वर्गाच्या बाहेर बसून माझी वाट बघतायेत.. ही कधी निघणार.. आता खरी कसोटी होती.. माझ्ं ऍक्टिंग कधी कामी येणार होतं.. मी रडकुंडीला पोहचून.. ‘‘बाई, माझं पोट खूप दुखतंय.. बसणंपण होत नाहीये’’. डोळ्यात आसवं आलेत की खरंच वाटणार ना. बाकी मुली माझी ऍक्टिंग बघून हैराण झाल्या. आपली बॅग उचलली आणि प्रियंकाकडे जाऊन मस्त नवीन कपडे घातले आणि पिक्चरला गेलो. आमच्यापैकी घरी कोणीच सांगितलं नव्हतं सायली सोडून.. मी तसा प्रयत्न केला होता पण साफ नकार दिला.. मग काय करणार? पिक्चर झाल्यावर घरी यायला निघालो तर मातोश्री घराजवळ काडी घेऊन उभी.. वाटेतून मला मारत घरी नेलं.. बिंग फुटलं होतं…
….. आणि आज पुन्हा एकदा ते दिवस डोळ्यासमोरून जसेच्या तसे गेले.. तेव्हा जी शाळा नको वाटायची आज पुन्हा एकदा त्या वर्गात जाऊन बसावं वाटतं.. ती प्रार्थना मोठमोठ्याने म्हणावी वाटते., तो व्यायाम पुन्हा एकदा आत्मसात करून घ्यावा वाटतो.. त्या बाईचा ओरडा खावा वाटतो आणि प्रत्येक बाईना.. सरांना.. सांगावं वाटतं.. तुमची जागा कोणीच घेऊ शकत नाही. ते गुलमोहराचं झाड असेल कां.. तिथेच जाऊन पुन्हा बघावं वाटतं.. माझ्या आवडत्या बाकावर डोकं ठेवून शांत बसावं वाटतं.. त्या वर्गात पुन्हा तशीच मस्ती, खेळ, भांडण, हसू.. रडू.. हे पुन्हा पहावसं वाटतं… आणि आणि त्या मैत्रिणी!! त्यांनाही असंच वाटतं का?? विचारावं वाटतं..!!