योगसाधना – ४९०
अंतरंग योग – ७५
- डॉ. सीताकांत घाणेकर भारतात आध्यात्मिक साहित्य व शास्त्रे अनेक आहेत… एकापेक्षा एक सुंदर व सरस. पण श्रीकृष्ण भगवंताच्या मुखारविंदातून आलेली- श्रीमद्भगवद्गीता तर अगदी वेगळी वाटते. – मुख्यत्वे जेव्हा शब्दार्थ बघता बघता गर्भितार्थ, तदनंतर भावार्थ व आध्यात्मिक अर्थ बघतो तेव्हा.
पहाटे ब्राह्ममुहूर्तावर उठून शांत, पवित्र मनाने जेव्हा व्यक्ती परमेश्वराचे प्रेममय अंतःकरणाने ध्यान करते त्यावेळचा आनंद अगदी शब्दांपलीकडचा आहे. तो खरा- परमानंद, चिदानंद आहे. त्याचा अनुभव घ्यायची सुरुवात केली आणि काही काळाने त्याची अनुभूती यायला लागली की आंतरिक आनंदापुढे भौतिक आनंद तुच्छ वाटतो. प्रत्यक्ष अनुभव घेणार्यालाच त्याची गोडी कळते. हे ज्ञान नसल्यामुळे कितीतरी वर्षे मानव जीवनाची वाया घालवली याबद्दल खंत वाटते. पण उशिरा का होईना आयुष्यात केव्हातरी सुरुवात केली हे लक्षात घेऊन तो जीव सुखावतो.
सकाळी सर्व सृष्टी अगदी शांत असते. अशा वेळी ध्यान करण्यासाठी जर निसर्गरम्य ठिकाण मिळाले तर हा आनंद अनेकपटींनी वाढतो. चौफेर नजर फिरवली तर निसर्गाची आल्हाददायकता लक्षात येते. त्यावेळी वाटते की सकाळ येऊच नये. दिवस उजाडूच नये. ती नशा काही वेगळीच. काही औरच आहे.
अशा स्थितीत जेव्हा भाग्यवान आत्मे अध्यात्माकडे वळतात आणि त्याची गोडी चाखतात तेव्हा तर त्यांची स्थिती उच्च स्तरावर पोचलेली असते. भारतात आध्यात्मिक साहित्य व शास्त्रे अनेक आहेत… एकापेक्षा एक सुंदर व सरस. पण श्रीकृष्ण भगवंताच्या मुखारविंदातून आलेली- श्रीमद्भगवद्गीता तर अगदी वेगळी वाटते. – मुख्यत्वे जेव्हा शब्दार्थ बघता बघता गर्भितार्थ, तदनंतर भावार्थ व आध्यात्मिक अर्थ बघतो तेव्हा. त्या शब्दांचा व श्लोकांचा गोडवा अप्रतिम असतो.
गीतेचा अभ्यास करता करता त्यातील एक एक शब्द विश्वाचे गूढ समजावतो तेव्हा तर आत्मिक स्थिती उच्च असते. गीतेतील सर्वच अध्याय व श्लोक ज्ञानपूर्ण आहेत पण काही श्लोक ज्ञानाने परिपूर्ण आहेत.
इति गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तं मयानघ |
एतद्बुद्ध्वा बुद्धिमान्स्यात्कृतकृत्यश्च भारत (१५.२०)
- हे निष्पाप भारता, याप्रमाणे हे अत्यंत गुह्य व पवित्र शास्त्र मी तुला सांगितले. हे जाणल्याने मनुष्य बुद्धिमान व कृतकृत्य होतो.
खरेच, अर्जुन किती भाग्यवान की स्वतः पूर्णपुरुषोत्तम भगवंताने त्याला हे सर्व सांगितले. तर आपणसुद्धा भाग्यवान ठरू जर आम्ही अभ्यास केला तर!
कथाकार सांगतात त्याप्रमाणे- कुरुक्षेत्रावरील महायुद्ध संपले. पांडवांना राज्य मिळाले. धर्मराज राजा झाला. त्यानंतर श्रीकृष्ण परत द्वारकेला जायची तयारी करीत होते. तेव्हा अर्जुनाने त्यांना म्हटले- आपण जी गीता सांगितली ज्यामुळे माझा विषाद जाऊन मी युद्धाला प्रवृत्त झालो. माझा मोहदेखील नष्ट झाला. मी म्हटले, – ‘‘करिष्ये वचनं तव’’ (गीता १८ः३)
पण त्यावेळी तू दिलेल्या ज्ञानाचा व उपदेशाचा आस्वाद मी घेऊ शकलो नाही. आता सगळे कसे स्थिरस्थावर, शांत वातावरण आहे. अशा वेळी मला ते सर्व पुन्हा एकदा सांग.
बरोबरच आहे अर्जुनाचे. कारण तणावाच्या दबावाखाली असताना व्यक्तीला काय व किती समजणार?
अशावेळी भगवंत उत्तर देतात ते आश्चर्यकारक आहे. – ‘‘ज्यावेळी मी गीता सांगितली तेव्हा मी स्वयं भगवान होतो. आता मी देवकीनंदन कृष्ण आहे. म्हणून मी काहीदेखील सांगू शकत नाही.
हेदेखील गूढच आहे. अप्रतिम उत्तर आहे. गीतेतील अनेक श्लोक हृदयगम्य आहेत. काही श्रेष्ठ असे- - ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः |
मनः षष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति ॥ (१५.७) - माझाच सनातन अंश मनुष्यलोकी जीवाचे रूप धारण करून प्रकृतीत (शरीरात) असलेली मनादी सहा इंद्रिये (मन व ज्ञानेंद्रिये) यांना ओढून घेतो.
- सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टोमत्तः स्मृतिर्ज्ञानमपोहनं च |
वेदैश्च सर्वैरहमेव वेद्योवेदान्तकृद्वेदविदेव चाहम् ॥ (१५.१५) - मी सर्वांच्या हृदयात राहणारा आहे. स्मृती, ज्ञान आणि विस्मरण ही मजपासून होतात.
- असे श्लोक वाचले की मनाला गुदगुल्या व्हायला हव्यात. पण आपण हे श्लोक श्रद्धापूर्ण, भावपूर्ण होऊन वाचतो का? मग भावार्थ व आध्यात्मिक अर्थ कसा काय समजणार?
या श्लोकांचा थोडातरी अर्थ समजला तर व्यक्तीला जाणीव होईल-
१. ‘मी’ कोण आहे?
२. माझ्या हृदयात कोण वास करतो?
ह्यामुळे पुढे समजेल- - दुसरा कोण आहे?
- माझे शरीर मंदिरासारखे पवित्र आहे. तिथे दगडाचा ईश्वर नाही तर खराखुरा ‘आत्मारूपी’ देव आहे जो परमात्म्याचा अंश आहे.
आपल्या सर्व थोर संतांना याची जाणीव होती. म्हणूनच संतशिरोमणी तुकाराम महाराज म्हणतात- * देह हे मंदिर. - तीन साध्या, सोप्या शब्दांनी ‘तुकोबांनी जीवनाचे तत्त्वज्ञान सांगितलेय. पण ते तर फक्त एक अशिक्षित वाणी होते. त्यांना त्यावेळच्या तथाकथित ज्ञानियांनी छळले. त्यांची गाथाच इंद्रायणीत फेकून दिली. आख्यायिकेप्रमाणे श्रीसरस्वती देवींनी ती परत वर आणली. खरे म्हणजे हे प्रतीकरूपात आहे. त्याचा गर्भितार्थ असा की – तुकारामाची भजनं व गाथेतील श्लोक बहुतेक सामान्य लोकांना तोंडपाठ होती. अनेकवेळा जनता ती भजने म्हणत असत. लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे –
- सरस्वतीदेवीने एका पवित्र आत्म्याला दिलेले ज्ञान असे कुणीही स्वार्थी मानव नष्ट करू शकत नाही. तुकाराम म्हणूनच म्हणतात-
‘‘वेदांचा अर्थ तो आम्हासि ठावा,
इतरांनी वहावा भार’’
खरेच, अशी चरित्रे वाचली की लगेच- ‘‘तेथे कर माझे जुळती’’. कारण इथे अध्यात्माची प्रचिती येते.
सारांश – समुद्राच्या तळाशी जाऊन अशी ज्ञानरत्ने घेऊन यायची सवय प्रत्येकाने करायला हवी- निदान योगसाधक भक्तांनी तरी!
आपण प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्वविद्यालय यांच्या मताप्रमाणे काही रहस्यांचा उलगडा करीत होतो. - रामायणात वानरांनी सेतू बांधण्यासाठी मदत केली. एक एक दगड समुद्रात ते टाकत होते. अर्थातच दगड खोल पाण्यात जायचे. मग त्यांना सांगण्यात आले की दगडावर ‘श्रीराम’ लिहा व मग रामाचे नाव घेऊन पाण्यात टाका. आणि काय आश्चर्य!- दगड तरंगू लागले. बघता बघता सेतू तयार झाला. त्यांच्या मताप्रमाणे हे वानर म्हणजे आपण विकारांनी भरलेले मानव आहोत. त्यामुळे माकडांसारखे आम्ही विध्वंसच करतो. अशा वानरांना एकत्र करून श्रीरामाने ज्ञानयुक्त शक्तीदल बनवले. ज्ञानसेतु बनवला. त्यांनी रावणराज्य व मायारूपी प्रभावाचा नाश केला.
अशा या वानरांचे काही सेनापती होते-
१) अंगद – जो स्थिर वृत्ती आणि बुद्धीचा तो अंगद. एकदा पाय रोवून राहिला की कितीही वादळवारे आले तरी न हलणारा.
म्हणून कथेत सांगतात की रावणाच्या दरबारात अंगद पाय रोवून उभा राहिला. मोठमोठ्या शक्तिशाली राक्षसयोद्ध्यांना तो हलवणे अशक्यप्राय होते.
२) हनुमान – हा तर त्यांचा प्रमुख सेनापतीच होता. शिवाय तो अत्यंत बुद्धिमान होता.
मनोजवं मारुततुल्यवेगं
जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् |
वातात्मजं वानरयुथमुख्यं
श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ॥
- मनासारखा वेग व वायूसारखी गती असलेला, जो परम जितेन्द्रिय व बुद्धिमानात श्रेष्ठ आहे त्या पवननन्दन, वानरसमूहांचा प्रमुख असलेल्या श्रीरामदूत हनुमंताला मी शरण जातो.
या चार ओळींच्या श्लोकात कितीतरी भावार्थ, गर्भितार्थ, आध्यात्मिक अर्थ भरलेला आहे. त्याच्या हृदयात तर ‘रामसीता’ होतेच. असे म्हणतात की श्रीरामाचे मंदिर असले तर त्यासोबत हनुमंताचेपण मंदिर असते पण हनुमंताचे मंदिर असले तर तिथे श्रीरामाची मूर्ती असेलच असे नाही. किती भावपूर्ण गोष्ट आहे ही! आपण बोध घेतो का? हेच श्रेष्ठ, उच्च, भक्तशिरोमणी आहेत.
दर शनिवारी अनेक भक्त मारुती मंदिरात जाऊन देवाच्या डोक्यावर शेंदूर व तेल घालतात. हनुमान जयंतीला ‘सुंठ-साखर’ असलेला नैवेद्य ग्रहण करतो. चांगले आहे. भगवंताची आठवण तरी ठेवतो.
थोडे खोलात शिरलो तर जीवनाचे सार्थक होईल, ही जाणीव ठेवूया का? कर्मकांडाचा भावार्थ समजू या.
……………………………….
फोटो- अंगद- रावणाच्या दरबारात; रामशिला समुद्रात टाकताना; हनुमान