तेजोमय सुरांचा गगनराज भास्कर

0
65
  • जनार्दन वेर्लेकर

माझ्या या लेखाची सुरुवात ‘परम पुरुष नारायण’ या बंदिशीच्या आठवाने सुरू झाली आहे. ही पारंपरिक बंदिश वझेबुवांना मिळाली ती साक्षात स्वामी विवेकानंद यांच्याकडून. डॉ. चैतन्य कुंटे यांच्याकडून ही दुर्मीळ, मौलिक माहिती मला मिळाली आणि मी थरारलो. परंपरेचा धागा असा चिवट असतो, म्हणून तर पूर्वसुरींचे स्मरण अनिवार्य.

‘परम पुरुष नारायण’ ही बंदिश, ‘वितरी प्रखर तेजोबल’ हे नाट्यपद आणि ‘गगन सदन तेजोमय’ हे चित्रपटगीत हा जणू एक त्रिवेणीसंगम. खरे तर आम्हा रसिकांना लाभलेला ‘स्वरमंगेशा’चा कृपाप्रसाद. मा. दीनानाथ आणि लतादीदींनी या स्वरसंगमाद्वारे ‘तिलककामोद’ या रागाचे स्वरशिल्प आत्मतेजोबलाने साकारले आहे, याची दिव्यत्वाची प्रचिती देणारा हा स्वराविष्कार. मास्टर दीनानाथ आणि त्यांच्या पंचप्राणांनी शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत आणि चित्रपटसंगीत यांत दुजाभाव, सरस-निरस, भेदाभेद स्वरमय जगात अमंगळ आहेत हे सिद्ध केले. वयाच्या अवघ्या ४१ व्या वर्षी मा. दीनानाथांची प्राणज्योत मालवली. त्यांचा उदयास्त मनाला चटका लावून गेला… कारण तो एका भव्योदात्त महानायकाचा ग्रीक शोकांतिकेसारखा करुण आणि दारुण होता. ‘आपुलें मरण पाहिलें म्या डोळा’ या तुकोबांच्या शब्दांचा आठव करून देणारा होता.

मा. दीनानाथांना ज्योतिष आणि रमलविद्या अवगत होती. इंदूरचे सुप्रसिद्ध ज्योतिषी शंकरशास्त्री घाटपांडे यांच्याकडे त्यांनी या विषयाचा शास्त्रोक्त अभ्यास केला होता. या विषयातील संस्कृत ग्रंथ त्यांनी अभ्यासले होते. तंतोतंत भविष्यकथन ते करायचे. एकदा दीनानाथ मुंबईत असताना त्यांना सांगलीहून तार आली की- ‘तुमच्या मुली लता व मीना देवीच्या आजाराने बिछान्यावर पडल्या आहेत, ताबडतोब या.’ या तारेमुळे भयभीत न होता त्यांनी प्रश्‍नकुंडली मांडून सांगितलं की, दोघींच्याही जिवाला धोका नाही, तेव्हा घाई कशाला? स्वतःचा मृत्यूही त्यांनी हसत हसत पण निश्‍चितपणे भोवतालच्या मंडळींना सांगितला होता. लता संगीतविश्‍वात तळपेल हे भविष्य त्यांनी वर्तवले होते.
आपले अल्पायुषी मरण त्यांना दिसत होते. ‘‘या वर्षी (१९४२) मला गंडांतर आहे. त्यातून पार पडलो तर पुढे वीस वर्षे कसली ददात नाही. पण पार पडलो तर ना!’’ हे भाकित त्यांनीच वर्तवले होते. एके दिवशी माईंना जवळ बोलावून कापर्‍या सुरात त्यांनी विचारलं, ‘‘बँकेत किती शिल्लक आहे?’’ त्यावर त्या उत्तरल्या, ‘‘असतील चारदोन रुपये! का बरे?’’ त्यावर दीनानाथ निश्‍चयी स्वरात म्हणाले, ‘‘होय का? तर मग एकदोन दिवसांत आम्हालाही सारे संपवून श्रीमंगेशाच्या पायाजवळ जायला हवे. आमच्याही आयुष्याचा अकौंट संपलेलाच आहे.’’

अखेर निरवानिरवीची वेळ आली. आपल्या लाडक्या कन्येला- लताला- त्यांनी जवळ बोलावले. तिच्या पाठीवर ममतेने हात फिरवला. अश्रुपूर्ण नेत्रांनी तिला समजावले- ‘‘लता, मी लाखो रुपये मिळवूनही तुम्हाला आज काही ठेवलेले नाही! कारण या निर्दयी व्यवहारी जगातले डावपेच मला कळले नाहीत. तुम्हाला आज मला काहीसुद्धा जरी ठेवता आले नाही तरीपण मी ज्या अमूल्य वस्तू तुला ठेवल्या आहेत, त्या म्हणजे हा माझा ‘तंबोरा’ आणि ही माझी ‘चिजांची वही’! या वस्तू तुजजवळ सतत राहू दे, म्हणजे तू माझ्याहीपेक्षा फार मोठी होशील.’’ बाबांच्या आशीर्वादाने आणि श्रीमंगेशाच्या कृपेने एका प्रेमळ पित्याची ही भविष्यवाणी सार्थ ठरली याचे आम्ही साक्षी आहोत. ‘ऍण्ड दी रेस्ट इज हिस्ट्री’ हे कौतुकोद्गार काढायला मा. दीनानाथांच्या पंचरत्नांच्या दुरून का होईना जवळ आहोत. आजही आम्हा रसिकांची सकाळ लतादीदींच्या स्वरांनी उजाडते आणि रात्र त्यांच्याच स्वरांनी आम्हाला कुशीत घेते.

श्रीमंगेशाचा अखंड नामजप हे मा. दीनानाथांचे सुखनिधान होते. तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना त्यांनी हसता हसता रडणारी आणि रडता रडता हसणारी गडकर्‍यांच्या ‘भावबंधन’ या नाटकातली ‘लतिका’ साकारली. ‘सकल चराचरीं या तुझा असे निवास’ हे लतिकेचे पद आळवताना त्यांच्या अंतरात श्रीमंगेशाचे स्मरण उचंबळून येई. तेजस्वी स्वर आणि मनस्वी स्वभावाच्या दीनानाथांचा भक्तिभाव यांचा मेळ जुळला आणि कोवळ्या वयातच ते प्रसिद्धीच्या, वैभवाच्या कीर्तिशिखरावर आरूढ झाले. वयाच्या सतराव्या वर्षी दादासाहेब परांजपे यांच्या प्रेरणेने व सक्रिय सहकार्याने मुंबईच्या उपनगरातील बोरीवली येथे २९ मार्च १९१८ रोजी त्यांनी ‘बलवंत संगीत मंडळी’ या स्वतःच्या नाट्यसंस्थेची स्थापना केली. ‘बलवंत’च्या मालक त्रिमूर्तीत (मा. दीनानाथ, कृष्णराव कोल्हापुरे, चिंतामणराव कोल्हटकर)- कंपनीच्या मिळकतीत- रुपयात दीनानाथ सात आणे, कोल्हापुरे पाच आणे, कोल्हटकर तीन आणे (एक आणा ‘बलवंत’ची गंगाजळी) अशी वाटेकरी होती. हा प्रयोग तारीख २९ मार्च १९१८ रोजी मुकुंदराव जयकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे एल्फिन्स्टन नाट्यगृहात झाला. त्यात दीनानाथांनी शकुंतलेची भूमिका केली. नाटक कंपनीच्या देखण्या गाणार्‍या ‘नायिके’ला बालगंधर्व त्या कंपनीची ‘लक्ष्मी’ म्हणत. दीनानाथ ‘बलवंत’ची लक्ष्मी म्हणून नाट्यक्षितिजावर तळपले.

चिंतामणराव कोल्हटकर यांनी आपल्या ‘बहुरूपी’ या आत्मचरित्रात दीनानाथरावांच्या नाट्यकर्तृत्वाचा आलेख मांडलेला आहे. ‘‘दीनानाथ यांनी केलेली गडकर्‍यांच्या ‘भावबंधन’मधील ‘लतिके’ची भूमिका म्हणजे त्यांच्या लौकिक आयुष्याचा उषःकाल होता. खरेशास्त्रीबुवांच्या ‘उग्रमंगल’मधील ‘पद्मावती’ म्हणजे प्रातःकाल व वीर वामनराव जोशी यांच्या ‘रणदुंदुभी’मधील ‘तेजस्विनी’ मध्यान्हीच्या तळपणार्‍या सूर्याप्रमाणे प्रकर्षाने डोळे दिपवणारी होती. प्रकर्षावस्थेतील स्वातंत्र्यवीरांच्या ‘संन्यस्त खड्‌गा’तील ‘सुलोचना’, नाट्याचार्य खाडिलकरांचा ‘धैर्यधर’ व विश्राम बेडेकरांचा ‘गौतम’ या त्यांच्या आणखी भूमिका सांगाव्या लागतील.’’
कोल्हटकर यथार्थपणे म्हणतात- ‘‘लतिका हा निसर्ग होता, पद्मीवती हा अभ्यास होता व तेजस्विनी ही साधना होती.’’
‘बलवंत’ने पहिल्यांदा ‘मानापमान’ सादर केलं ते हिंदी भाषेत.

नाट्याचार्य खाडिलकरांचे हे पहिले संगीत नाटक. मराठी ‘मानापमान’चे हक्क गंधर्व नाटक मंडळीकडे असल्यामुळे त्यांना ही तडजोड करावी लागली. हिंदी प्रयोग १९१८ च्या सप्टेंबर महिन्यात करण्यात आला. पुढे नऊ वर्षांनी मराठी ‘मानापमान’ सादर करून धैर्यधराची भूमिका दीनानाथांनी साकारली. बालगंधर्वांनी प्रथम रंगभूमीवर आणलेले ‘मानापमान’ आपल्या अद्वितीय गायनाने आणि श्रेष्ठ अभिनयाने महाराष्ट्राच्या हृदयावर चिरंतन ठसविले. धैर्यधराची ही भूमिका त्यांच्या क्षात्रतेजाला साजेशी होती. तडफदार-आक्रमक. गंधर्व संगीत मंडळीची चौकट मोडून दीनानाथांनी या नाटकाचा संपूर्ण कायापालट केला. खुद्द नाटककार खाडिलकरांनीही असे गौरवौद्गार काढले की, दीनानाथ करीत असलेला धैर्यधर खरोखरी माझ्या मनातलाच आहे. या नाटकातील पदांच्या गोविंदराव टेंबे यांनी दिलेल्या मूळ चाली बदलून त्यांनी त्यांना नवा आवेशयुक्त ढंग दिला. त्यांच्या आवाजाची फेकच मुळी अशी होती की जणू तळपती तलवार! त्यांची तान होती जशी वेगवान भिंगरी. त्यांचे दिव्य गायन ऐकताना सारे नाट्यगृह समाधी लावलेल्या योग्याप्रमाणे स्तब्ध होई. मर्मज्ञ नाट्यअभ्यासक गो. रा. जोशी यांनी एक मौलिक माहिती आपल्या ‘रवी मी हा चंद्र कसा’ या लेखात नोंदवली आहे, ती अशी- ‘‘दीनानाथराव जणू पैज मारूनच धैर्यधराच्या या भूमिकेत उभे राहिले. त्यांनी या भूमिकेचा वेगळा विचार केला. ती वेगळ्या पद्धतीने मांडली. वेशभूषेत बदल केला. दिसायचेही मोठे रुबाबदार. आधी सेनापती नि नंतर वनमालेचा प्रियकर. पूर्वी कुणी न गायलेले ‘रवि मी हा चंद्र कसा’ हे पद प्रथम ते गायले आणि त्यांनीच लोकप्रिय केले.’’
सावरकरांचे संगीत ‘संन्यस्त खड्‌ग’ हे ‘बलवंत’चे राष्ट्रभक्तीने ओथंबलेले दीनानाथांचे आवडते नाटक. या नाटकातील ‘सुलोचना’ साकारताना त्यांनी आपल्या दिव्य गाण्यातून तेजोबल देणार्‍या सावरकरांच्या नाट्यप्रतिभेला मानवंदना दिली. ‘शत जन्म शोधिताना’ हे पद ऐकले म्हणजे दोन उल्का आवेगाने एकमेकींवर आदळत आहेत असा भास होतो. त्यातील स्वर आणि शब्दांचे हे असे नाते आहे व ‘शतसूर्यमालिकांच्या दीपावली विझाल्या’ अशी वैश्‍विक अनुभूती सावरकरांच्या शब्दांतून अनुभवाला येते. गौतम बुद्धाच्या जीवनावरील या नाटकाचे नेपथ्य तेव्हा अभूतपूर्व असे होते. यातील ‘सुकतातली जगी या’ या पदातून मूळच्या शास्त्रीय चिजेला दीनानाथांनी प्रसंगोचित भावपूर्ण स्वरूप दिले.

बालगंधर्व आणि मा. दीनानाथ हे मराठी संगीत रंगभूमीच्या सुवर्णयुगाचे मानकरी. दोघांनाही एकमेकांच्या नाट्यगानप्रतिभेचा सार्थ आदर होता. त्यांच्यातील स्पर्धा निरोगी, मत्सरमुक्त होती. बालगंधर्वांचे हे उद्गार माझ्या या विधानांना पुरक वाटतात-
‘‘मी आणि केशवराव भोसले मराठी रंगभूमीवर पाय रोवून उभे ठाकलो असताना दीनानाथ आला. त्याने त्याचे स्वतःचे स्थान निर्माण केले आणि स्वतःचे तिरपांगडे, चमत्कृतीपूर्ण आणि असामान्य तयारीचे वेगळे गाणे गाऊन तो निघून गेला यातच त्याचा मोठेपणा आहे.’’
मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर अर्थात कृष्णामास्तर आणि दीनानाथराव यांची शाब्दिक जुगलबंदी अशीच मार्मिक आणि दोघांमधील दिलखुलास वृत्तीचा परिचय घडवणारी. ‘‘अरे दीना, तसं चांगलं वाटतं आहे सारं, पण तू जे राग मिक्स करतोस ना गाताना-’’
दीनानाथांनी मास्तरांना पुढे बोलू न देता फट्‌दिशी सांगितले- ‘‘हे बघ कृष्णा, मी जे राग मिक्स करतो ते माझ्या रक्तातच आहे. माझे मिक्स्ड ब्लड आहे. (वडील ब्राह्मण व आई मराठा), म्हणून तुला ते ‘कळायचं’ नाही आणि जमायचंही नाही.’’

दीनानाथांना शास्त्रीय संगीताची उत्तम जाण होती. त्यांचा अभिजात संगीताचा, पंजाबी ढंगाचा, गझल-ठुमरी या गानविशेषांचा आणि कथ्थक नृत्याचा व्यासंगही सखोल होता. पं. सुखदेव यांच्याकडून कथ्थक नृत्याची तालीम त्यांना लाभली होती. दीनानाथांचे सहकारी आणि ‘बलवंत’चे एक भागीदार कृष्णराव कल्हापुरे यांनी स्वतःकरिता नामवंत बीनकार मुरादखॉं यांचा गंडा बांधून त्यांना ‘बलवंत’ कंपनीत ठेवून घेतले होते. त्याचा फायदा कोल्हापुर्‍यांपेक्षाही दीनानाथास अधिक झाला. कुशाग्र दीनानाथांच्या संग्रहात आणखी काही आकर्षक रागरागिण्यांची, बंदिशींची भर पडली. मुरादखॉं दीनानाथांच्या आवाजीवर व गायनावर बेहद्द खूश असत. ते म्हणत- ‘‘अरे कोल्हापुरे, ऐसा लडका मेरे जिंदगी में मैने अभी तक नहीं देखा| इसका गला तो ऐसा है के, ये बिलकूल ही हवा तोडकर तीर जैसा बेदरकार जाता है, वैसा ही इसका गला निकलता है! तोबा-तोबा!’’
अशा स्वयंप्रकाशी दीनानाथांना गायनाचार्य वझेबुवांकडे शास्त्रीय संगीताची दीक्षा घेण्याची निकड भासली हे त्यांच्यात वसलेल्या शिष्योत्तमाचे आदर्श उदाहरण म्हणून आमच्यासमोर आहे. १९२६ या वर्षी ‘बलवंत’चा मुक्काम बेळगाव येथे होता. इथेच केशवराव भोसले, बापूराव पेंढारकर यांचे गुरू गायनाचार्य वझेबुवा यांच्याकडून दीनानाथांनी गायनगुरुत्वाची दीक्षा घेतली.
यासंदर्भात वझेबुवांना जेव्हा विचारले गेले तेव्हा ते आश्‍चर्यचकितच झाले आणि म्हणाले- ‘‘दीना, तू आता माझा गंडा बांधून घेणार म्हणजे काय करणार-? कारण बहुतेक गानविद्येचा लाभ तुझा तूच मिळवून राहिला आहेस आणि श्रीमद् जगद्गुरू कुर्तकोटींकडून तर ‘संगीतरत्न’ ही बहुमानाची पदवीही तू पटकावून बसला आहेस.’’
परंतु दीनानाथांनी ‘मला तुम्हीच गुरू हवे आहात’ असा आपला ठाम निर्धार व्यक्त केला. दीक्षा मिळाल्यानंतर या शब्दांत आपले समाधान व्यक्त केले- ‘आता माझ्या गाण्याला कोणी काहीही म्हणोत, पण माझ्या गाण्यावर मीच खूश आहे.’
दीनानाथरावांनी आपल्या अल्प कारकिर्दीत अनेक स्त्री-भूमिका केल्या. ‘उग्रमंगल’ नाटकात पद्मावतीच्या भूमिकेत त्यांच्या अभिनयाच्या पैलूवर नृत्याचा साज चढला. ते इतकी उत्तम भूमिका करीत नि इतके देखणे दिसत की खुद्द नाटककार वासुदेवशास्त्री खरे यांनी चिंतामणराव कोल्हटकरांना सांगितले की, ‘खेळ संपल्यावर दीनाची दृष्ट काढीत जा.’ गाण्याचा पंजाबी ढंग याच नाटकापासून दीनानाथांच्या गाण्यात आला आणि पुढे तो रुजला.

आज. मा. दीनानाथ हे नाव कानी आले की लगेच आठवण होते ती त्यांच्या पहिल्यावहिल्या उर्दू ‘ताज-ए-वफा’ या नाटकातील ‘कमला’, तसेच ‘पुण्यप्रभाव’ या नाटकातली ‘किंकिणी’, ‘लतिका’ (भावबंधन), ‘शिवांगी’ (राजसंन्यास), ‘सुलोचना’ (संन्यस्त खड्‌ग), ‘तेजस्विनी’ (रणदुंदुभी). दीनानाथांची ‘राजसंन्यास’मधील शिवांगी पाहिल्यावर त्या वेळचे कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजचे व्युत्पन्न प्रिन्सिपॉल डॉ. बाळकृष्ण म्हणाले होते- ‘मी राजा असतो तर अर्धे राज्य शिवांगीला देऊन टाकले असते.’
‘रणदुंदुभी’ तर जवळजवळ एकट्या तेजस्विनीचे- म्हणजे त्यांचेच नाटक. वझेबुवांचा गंडा दीनानाथांनी याच वेळी बांधला. तेव्हासुद्धा बुवा म्हणाले होते, ‘शिष्य मूळचाच तयार आहे, त्याची गानविद्या स्वयंभू आहे. मी फक्त गंडा बांधण्यापुरता त्यांचा गुरू!’
माझ्या या लेखाची सुरुवात ‘परम पुरुष नारायण’ या बंदिशीच्या आठवाने सुरू झाली आहे. ही पारंपरिक बंदिश वझेबुवांना मिळाली ती साक्षात स्वामी विवेकानंद यांच्याकडून. डॉ. चैतन्य कुंटे यांच्याकडून ही दुर्मीळ, मौलिक माहिती मला मिळाली आणि मी थरारलो. परंपरेचा धागा असा चिवट असतो, म्हणून तर पूर्वसुरींचे स्मरण अनिवार्य.

अल्पायुषी दीनानाथांच्या पंचरत्नांचे आजचे वयोमान असे ः लतादीदी (९१), मीनाताई (८९), आशाताई (८७), उषाताई (८५) आणि हृदयनाथ (८३). मा. दीनानाथांची पुण्याई अशी फळाला आली. त्यांना दीर्घायुष्य लाभलं. श्रीमंगेशाचा वरदहस्त या भावंडांवर आहे. हा आनंद आमच्या कुडीत न मावणारा. ‘इवलेसें रोप लावियलें दारीं| तयाचा वेलू गेला गगनावरी॥ मोगरा फुलला आहे- दरळलेला आहे.