प्रबोधोत्सव दिव्यत्वाचा

0
381
  •  अंजली आमोणकर
    (पणजी)

तुळशीचे एक पान देवाच्या समकक्ष बसण्याचे सामर्थ्य ठेवते. तुळशी विवाहाचा अर्थ विश्वव्यापक सत्तेला वृक्षातील चेतनेची करूण हाक असा होतो. या विवाहामागचा गर्भितार्थ लक्षात घेतला पाहिजे. हा विवाह पृथ्वीचे सुख समृद्धी, भरपूर पाऊस, चांगले पीक यासोबतच लोककल्याणाची आस असा होतो.

‘व्हडली दिवाळी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या ‘तुळशीच्या लग्ना’ला, घरातीलच एक कन्या मानून, घरातील तुळशी वृंदावनाची, तुळशीचे रोप असलेल्या कुंडीची गेरू व चुन्याने रंगरंगोटी केली जाते. त्यावर बोर, चिंच, आवळा (गोव्यात जिन्याची बडी/काठी – वर म्हणून) वगैरे खोचून ठेवतात. कुटुंबातील कर्ता माणूस स्नान करून तुळशीची व कृष्णाची पूजा करतो. तुळशीला नवीन वस्त्र पांघरतात व मांडव म्हणून उसाची खोपटी ठेवतात. पूजेचे उपचार समर्पण करून विष्णुला जागे करतात व त्यानंतर बाळकृष्ण व तुळस या दोघांमध्ये अंतरपाट धरून मंगलाष्टके म्हणून त्यांचा विवाह लावला जातो. कर्त्याने यानंतर तुळशीचे कन्यादान करावे व मंत्रपुष्प – आरती करावी असा संकेत आहे. घरच्या कन्येस श्रीकृष्णासारखा आदर्श वर मिळावा असा त्यामागील हेतू आहे. या विधीच्यावेळी तुळशीभोवती दीप आराधना करण्याची पद्धती आहे.
गोवा- दीव- दमण येथे तुळशीविवाह सार्वजनिकरीत्यासुद्धा साजरा होतो. सन् २०१७ मध्ये गोव्यात, तुळशीविवाहाचे पौरोहित्य महिलांनी केले आणि गोव्याच्या राज्यपालांनी तुळशीचे कन्यादान केले.

हा विवाह प्रबोधिनी एकादशीपासून करण्याची प्रथा आहे. भगवान विष्णु, कार्तिक महिन्यातील देवउठणी एकादशीला, संपूर्ण चार महिने झोपल्यानंतर उठतात. व तेव्हा त्यांचे लग्न तुळशीशी (वैजयंती) लावून देतात. हिंदू धर्मात ‘पापनाशिनी’ म्हणून तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारताच्या सर्व भागात, सर्व प्रांतात उगवणारी ही वनस्पती आहे. या उत्सवास ‘प्रबोधोत्सव’ असेही म्हणतात. तुळशीच्या लग्नानंतर हिंदू लोकांच्या विविहासंबंधित कार्यास सुरुवात होते. हिंदू परंपरेनुसार तुळशीच्या केवळ दर्शनाने, हजार गायी दान केल्याचे पुण्य लाभते. तिच्या पानावरचे उदक मस्तकावर धारण केले तर गंगास्नानाचे पुण्य लाभते आणि मरतेवेळी अंगावर तुळशीपत्र असेल तर ती व्यक्ती वैकुंठास जाते असे मानण्यात येते. काही ठिकाणी तुळशीचे कन्यादान केल्यावर यथाविधी विवाहहोम करण्याचाही प्रघात आहे. पूर्वी कार्तिक शुद्ध द्वादशीस, तुलसीविवाह झाल्यावर जे पदार्थ वर्ज्य केले असतील ते पदार्थ ब्राम्हणाला दान देऊन मग खायला सुरू करण्याची प्रथा आहे.

तुळशीचे लग्न दरवर्षी कार्तिक शुद्ध द्वादशीस लावले जाते. त्या संबंधातील कथा पद्म पुराणात आहे, ती अशी की जालंधर नावाचा महाप्रतापी व असाधारण योद्धा राक्षस होऊन गेला. त्याने आपल्या पराक्रमाने दैत्यांना जिंकून वैभव प्राप्त केले आणि आपल्या भाईबंद दैत्यांना सुखी केले. त्याची वृंदा नावाची पत्नी महापतिव्रता होती. तिच्या पुण्याईमुळे जालंधर त्रिभुवनात अजिंक्य ठरत होता. पुढे देव व दैत्य यांच्यात युद्ध होऊन देवांस गतायु व्हावे लागले तेव्हा विष्णुने जालंदरास कपटाने हरवायचे ठरवले. जालंदराचे रूप घेऊन वृंदेपुढे तो मरून पडला. वृंदा शोक करू लागली. तेव्हा एका कपटी साधुने त्यांस जिवंत केले. वृंदा आनंदाने त्याच्याशी संसार करू लागली व तिचे पातिव्रत्य भंगले. जालंधर युद्धात मरण पावला. हे सर्व कळताच वृंदेने अग्निकाष्ठ भक्षण केले. विष्णुलाही आपण कपटाने एका साध्वीचा नाश केला याचे वाईट वाटले. विष्णुचे दुःख निवारण्याकरता पार्वतीने, वृंदेच्या राखेवर तीन झाडे लावली. तुळस, आवळा व मालती. त्यातील वृंदेप्रमाणे तुळस ही सर्वगुणसंपन्न आहे. विष्णूस ती प्रिय झाली. श्रीविष्णुस तुळस अतिप्रिय म्हणून तिला ‘हरिप्रिया’ म्हणतात. पुढे वृंदा हिनेही द्वापार युगात रुक्मिणीच्या रुपाने अवतरून विष्णुचा अवतार जो श्रीकृष्ण त्यास कार्तिक शुद्ध द्वादशीला वरले. अशा प्रकारे हिंदू लोक रुक्मिणी-कृष्ण विवाह तुळशी विवाह विधीच्या रूपाने त्यादिवशी दरसाल साजरा करतात.

हिंदू पुराणांप्रमाणे तुळशीला ‘विष्णुप्रिया’पण म्हणतात. आणखी एक आख्यायिका तुलसी-विवाहाबाबत प्रसिद्ध आहे. …
कांची नगरीत कनक नावाचा राजा होता. त्याला नवसाने एक मुलगी झाली. तिचे नाव किशोरी होते. तिची पत्रिका पाहून ज्योतिषाने सांगितले- जो तिच्याशी विवाह करेल त्याच्या अंगावर वीज पडून तो मरेल. एका ब्राह्मणाने किशोरीला द्वादशाक्षरी विष्णुमंत्र सांगितला. त्या मंत्राचा जप करावा, तुळशीची पूजा व कार्तिक शुद्ध नवमीला तिचा श्रीविष्णुशी विवाह लावावा असे व्रत सांगितले. ती त्याप्रमाणे करू लागली.
एकदा एका गंध्याने तिला पाहिले व तो तिच्यावर मोहित झाला. माळिणीच्या मदतीने स्त्रीवेष घेऊन त्या माळिणीबरोबर किशोरीकडे आला व फुलांची रचना करण्यात तरबेज म्हणून दासी म्हणून तिथे राहू लागला. कांची राजाचा पुत्र मुकुंदही किशोरीवर मोहीत झाला होता. तो सूर्याची खूप उपासना करायचा. सूर्याने स्वप्नात दृष्टांत देऊन सांगितले की तू किशोरीचा नाद सोडून दे. तिच्याशी विवाह करणारा वीज पडून मरणार आहे. मुकुंद म्हणाला तुझ्यासारख्या देवाला तिचे वैधव्य टाळता येईल. किशोरी मला लाभली नाही तर मी अन्न-पाणी वर्ज्य करून मरून जाईन. सूर्याने किशोरीच्या वडलांना दृष्टांत देऊन सांगितले की राजपुत्र मुकुंदाला तू आपली मुलगी दे. कनक राजाला हा विवाह मान्य करणे भाग पडले. कार्तिक द्वादशी ही लग्नाची तिथी ठरली. गंध्याला हे सर्व कळले. तो घाईने गेला व त्याने किशोरीचा हात धरला त्याबरोबर तो वीज पडून मेला. मग किशोरीचा विवाह मुकुंद राजपुत्राशी झाला.

तुळशीचे एक पान देवाच्या समकक्ष बसण्याचे सामर्थ्य ठेवते. तुळशी विवाहाचा अर्थ विश्वव्यापक सत्तेला वृक्षातील चेतनेची करूण हाक असा होतो. या विवाहामागचा गर्भितार्थ लक्षात घेतला पाहिजे. हा विवाह पृथ्वीचे सुख समृद्धी, भरपूर पाऊस, चांगले पीक यासोबतच लोककल्याणाची आस असा होतो. हा विषय म्हणजे संपूर्ण वैष्णवी चेतनेद्वारा पाहिलेले एक महास्वप्न आहे, ज्यात देव स्वतः खाली उतरतात व या पृथ्वीतलावरील अणुरेणुंना तेजाने प्रकाशमय करतात. तुलसी विवाहाचा सरळ अर्थ तुळशीच्या माध्यमातून देवांना आवाहन करणे असा होतो. तुळशीला केलेली प्रार्थना देवांपर्यंत पोहचते.

ह्या विवाहावर अ. ह. साळुंखे यानी प्रदीर्घ समिक्षाही ‘तुळशीचं लग्न- एक समीक्षा’ या नावानं लिहिली आहे. त्यात ते लिहितात- ‘‘आजच्या स्वार्थाची एखादी गोष्ट बहुजनांच्या मनात खोलवर रुजावी अशी वैदिकांची इच्छा असली की ते एक डाव टाकतात. ती गोष्ट ते बहुजनांमध्ये अत्यंत आदरणीय असलेल्या एखाद्या व्यक्तीकडून करवून घेतात. निदान त्या व्यक्तीच्या तोंडून ती वदवून घेतात वा तिची ओझरती का होईना मान्यता घेतात. ते जमले नाहीच तर तिच्या मृत्यूनंतर ती गोष्ट चक्क तिच्या नावावर खपवून देण्यासाठी प्रचाराचा धूमधडाका सुरू करतात. तुळशीच्या लग्नाचा विधी ही अशीच एक गोष्ट आहे. तुळस ही निःसंदिग्धपणे एका अनार्या, अवैदिक अशा पतिव्रता स्त्रीचे प्रतीक आहे. कोणा तरी आर्याने कपटाने तिचे शील- भ्रष्ट केले. तिने अग्नीत उडी घेऊन जीव दिला. आर्यांना मात्र तिचे शील भ्रष्ट करण्याचा क्षण हा आपल्या विजयाचा व अभिमानाचा वाटला. म्हणून त्यांनी तो क्षण- तुळशीच्या लग्नाचा क्षण म्हणून साजरा केला. तो विवाह बहुजनसमाजामध्ये रुजावा म्हणून त्या बलात्कारी पुरुषाचे आधी विष्णुशी व नंतर कृष्णाशी ऐक्य मानण्याची वैदिकांची चाल इतकी यशस्वी झाली की त्या समाजाने तो कलंकित क्षण – पवित्र सण म्हणून स्वीकारला…’’
ही समीक्षा खूपच एकतर्फी व अनार्याकडून हेतुपुरस्सर समाजात गदारोळ माजवण्याकरता लिहिलेली वाटते. कारण या कथा त्यांचे विश्‍लेषण सर्वच काही पुराव्यारहित आहे. आपल्या पुराणांमध्ये ज्या कथा सापडतात त्या त्या रचनाकारांची कल्पनाशक्ती वाटते. त्यामुळे अजूनही जे ‘मिथक’ या विशेषणाने प्रसिद्ध असलेल्या या कथांना जेव्हा ठोस पुरावे उपलब्ध नाहीत तेव्हा त्यांच्या समीक्षेलाही काही अर्थ उरत नाहीत. ‘मग पुराणे खोटी का’- हा वादही निघू शकतो. तो तात्पुरता बाजूला ठेवून, वर्तमानात धर्म, घर, कुटुंब, समाज यांना जोडून ठेवणार्‍या या आनंददायी सोहळ्याची आपण कास धरून ठेवूया. त्या रोपट्याची औषधी गुणवत्ता लक्षात घेऊया.