तुये येथे अँटी-ड्रोन यंत्रणा निर्मिती कारखाना

0
7

>> राज्य सरकारचा झेन टेक्नॉलॉजी लिमिटेड कंपनीसोबत सामंजस्य करार; राज्यातील 800 जणांना रोजगार मिळणार

तुये-पेडणे येथील इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर (ईएमसी) मध्ये अँटी-ड्रोन सिस्टम मॅन्युफॅक्चरिंग युनिट स्थापन करण्यासाठी राज्य सरकारने झेन टेक्नॉलॉजी लिमिटेड या कंपनीसोबत काल सामंजस्य करार केला. झेन कंपनीकडून अंदाजे 50 कोटी रुपयांची प्रारंभिक गुंतवणूक करून अँटी-ड्रोन सिस्टम प्रकल्प उभारला जाणार असून, या उद्योगातून 800 जणांना रोजगाराची संधी मिळणार आहे. या कंपनीच्या प्रकल्पाचे काम दोन वर्षांत मार्गी लागणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी करारानंतर दिली.

राज्य सरकारने प्रकल्प आणि प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी झेन टेक्नॉलॉजीला जमीन दिली आहे. मुख्यत्वे अभियांत्रिकी, डिप्लोमा आणि आयटीआय विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण केंद्र सुरू केले जाईल. या कंपनीकडून प्रकल्प उभारणीचे काम पूर्ण होईपर्यंत मनुष्यबळ तयार करण्यासाठी युवकांना कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. झेन टेक्नॉलॉजी ही कंपनी प्रामुख्याने शस्त्रे आणि संबंधित संरक्षण उपकरणे आणि संरक्षण प्रशिक्षण प्रणालींसाठी उपकरणे उपलब्ध करीत आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

ईएमसी तुये येथील 45 भूखंड लघू उद्योगांसाठी आणि 15 भूखंड मोठे उद्योग उभारण्यासाठी ठेवण्यात आले आहेत. ईएमसीचा पहिला टप्पा सुरू झाला आहे आणि उद्योगांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे माहिती-तंत्रज्ञान खात्याचे मंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले.
या औद्योगिक वसाहतीमध्ये सुमारे 200 कोटी रुपयांची गुंतवणूक क्षमता आणि 2000 रोजगार क्षमता असलेले 4 सूक्ष्म स्तरावरील उद्योग आणि 2 मोठे उद्योग उभारण्याची प्रक्रिया सुरू आहे. तुये येथे आवश्यक पायाभूत सुविधा जलदगतीने तयार केल्या जात आहेत, असेही मंत्री खंवटे यांनी सांगितले.

राज्य सरकारचा ‘स्वयंपूर्ण ई-बाजार’ सुरू

राज्यातील महिला बचत गट, महिला मंडळ, हस्तकला कलाकारांनी तयार केलेल्या वस्तू, खाद्यपदार्थाच्या ऑनलाईन विक्रीसाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या ‘स्वयंपूर्ण ई-बाजार’ पोर्टलचा शुभारंभ मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते काल करण्यात आला.
या खास पोर्टलच्या माध्यमातून स्थानिक महिला बचत गट व हस्तकला कारागिरांनी बनवलेल्या वस्तूंची ऑनलाईन पद्धतीने विक्रीची सुविधा मिळणार आहे. राज्यातील 46 हजार बचत गट सदस्य आणि 12 हजार हस्तकारागिरांनी बनवलेल्या वस्तू आणि उत्पादनांना राष्ट्रीय व जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी ई बाजाराचा शुभारंभ केल्यानंतर बोलताना दिली.

राज्य सरकारच्या नियोजन व सांख्यिकी खात्याने तयार केलेल्या पोर्टलच्या माध्यमातून स्थानिकांची विविध उत्पादने ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली आहेत. आत्तापर्यंत 52 बचत गटांनी या उपक्रमांतर्गत सरकारकडे नोंदणी केली आहे आणि त्यांना उत्पादनांचे पॅकिंग आणि ऑनलाईन विक्री करण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण दिले जात आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत तांत्रिक शिक्षण संचालनालयाने शिक्षा कौशल्य फाउंडेशन या संस्थेशी एक सामंजस्य करार केला आहे. या शिक्षा कौशल्य संस्थेच्या माध्यमातून राज्यातील तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना व्हर्च्युअल पद्धतीने प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

बजेट मॅन्युअलचे प्रकाशन
यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते राज्य सरकारच्या बजेट मॅन्युअल प्रकाशन काल करण्यात आले. या मॅन्युअलचा उद्देश खर्च, कर्ज, कर इत्यादींच्या बाबतीत अधिकारी, सामान्य जनता, शैक्षणिक आणि विद्यार्थ्यांना अर्थसंकल्पाची चांगली समज देणे हा आहे. अर्थसंकल्प हा काही दिवसांत तयार केला जात नाही, तर अर्थसंकल्प तयार करण्यासाठी सहा महिने अगोदर तयारी करावी लागते, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.