तुम्ही सावरकर नव्हेच!

0
245

कॉंग्रेसचे पदभ्रष्ट युवराज राहुल गांधी यांनी दिल्लीतील रामलीला मैदानावरील भारत बचाव रॅलीमध्ये आपल्या भारतातील बलात्कारांसंबंधीच्या वादग्रस्त वक्तव्याबाबत माफी मागायला आपले नाव ‘राहुल सावरकर’ नसल्याचे सांगत पुन्हा एकदा कॉंग्रेसच्या सावरकरद्वेष्ट्या हीन राजकारणाची प्रचीती आणून दिलेली आहे. ते सध्या पक्षाची सगळी पदे सोडून नामानिराळे झालेले असले, तरी यापूर्वी वेळोवेळी सावरकरांचे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील योगदान नाकारत आलेल्या कॉंग्रेसचेच ते प्रतिनिधित्व करीत असल्याने त्यांच्या या कुजकट वक्तव्याचे आश्चर्यही वाटत नाही, परंतु कीव मात्र नक्कीच येते. सावरकरांच्या तथाकथित माफीनाम्याचे आजवर कॉंग्रेसने प्रचंड भांडवल केले. ते करीत असताना सावरकरांनी या देशासाठी ज्या खस्ता खाल्ल्या, जो असीम त्याग केला, जे असामान्य धैर्य दाखवले, ज्या हालअपेष्टा भोगल्या, त्यांच्याप्रती कणमात्र कृतज्ञता दाखविण्याचे सौजन्य त्यांच्या नेत्यांपाशी कधीच नव्हते. भले कृतज्ञ राहू नका, परंतु निदान कृतघ्नता तरी दाखवू नका! यापूर्वी याच पक्षाचे धुरीण म्हणवणार्‍या मणिशंकर अय्यरांनी अंदमानच्या सेल्युलर जेलवरील सावरकरांच्या स्मारकाच्या नावाची पाटी उखडून टाकण्याचा निव्वळ हलकटपणा केला होता. कृतघ्नपणाची ती केवळ हद्द होती. सावरकरांच्या तथाकथित माफीनाम्याची चिकित्सा इतिहास संशोधकांनी वेळोवेळी केलेली आहे. या कथित माफीनाम्याचे एवढे भांडवल करणार्‍या कॉंग्रेसला त्यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचे एवढे भय का वाटत असावे? स्वातंत्र्यानंतर दीर्घकाळ सत्ता उपभोगणार्‍या नेहरूंचे योगदान त्यापेक्षा कमी वाटेल म्हणून? नेताजी सुभाषचंद्र बोस, शहीद भगतसिंह, सावरकर आणि तमाम क्रांतिकारकांचे, इतकेच कशाला अगदी नेहरूंचे समकालीन स्वपक्षीय नेते सरदार पटेल, लालबहादूर शास्त्री वगैरेंचे आणि अनेकदा महात्मा गांधीजींचे योगदानही या नेहरू – गांधी घराणेशाहीमध्ये झाकोळलेलेच ठेवले गेले. पटेलांचा कणखरपणा, शास्त्रीजींचा साधेपणा याची भीती कॉंग्रेसलाच का बरे वाटत आली? या कोणत्या न्यूनगंडाने कॉंग्रेसी नेत्यांना ग्रासलेले आहे या प्रश्नाचे उत्तर भारतीय जनतेला अजूनही मिळालेले नाही. यशवंतराव चव्हाणांबाबतही इंदिरा गांधींना हीच भीती होती. शरद पवारांविषयीही सोनिया गांधींना हाच न्यूनगंड होता. स्वतःचे खुजेपण लपविण्यासाठी भोवतीच्या उत्तुंग माणसांना खुजे लेखायची हास्यास्पद धडपड काही माणसे करीत असतात. राहुल यांच्या वक्तव्याची जातकुळी याच प्रकारची आहे. राहुल गांधी यांनी आपण कोणाविषयी बोलतो आहोत, ते बोलण्याची आपली पात्रता आहे का याचा किंचित जरी विचार केला असता तरी सावरकरांविषयी असे अतिशय कुजकट व अवमानास्पद बोलण्याची त्यांची मुळात प्राज्ञा झाली नसती. सावरकरांना पन्नास वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा झाली. त्यातली अनमोल दहा वर्षे अत्यंत कष्टप्रद अशी शिक्षा भोगत त्यांनी अंदमानच्या इवल्याशा कोठडीमध्ये काढली. सावरकरांची मार्सेलिसमधील त्रिखंडात गाजलेली उडी असो अथवा अंदमानच्या काळ्या पाण्यावर त्यांनी सोसलेले हाल असोत, दिसते ते केवळ असामान्य धैर्य. साक्षात् शब्दप्रभू असलेले अटलबिहारी वाजपेयी पुण्यातील एका कार्यक्रमात सार्थ उद्गारले होते, ‘‘सावरकर म्हणजे तेज, सावरकर म्हणजे तप, सावरकर म्हणजे त्याग, सावरकर म्हणजे तत्त्व, सावरकर म्हणजे तर्क, सावरकर म्हणजे तारुण्य, सावरकर म्हणजे तीर आणि सावरकर म्हणजे तलवार!’’ त्यांच्या या एकेका शब्दामध्ये सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाचा एकेक पैलू सामावलेला आहे. सावरकरांच्या माफीनाम्यांचे एवढे भांडवल जे लोक करीत आले आहेत, त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्याला जाण्यापूर्वी पुरंदरचा तह करून आपले २३ गडकिल्ले मोगलांच्या हाती देण्याचे उचललेले धोरणीपणाचे पाऊलही पळपुटेपणाचे होते असे म्हणायचे आहे काय? की अफझलखानाचा कोथळा शिवाजी महाराजांनी विश्वासघाताने काढला असे म्हणायचे आहे? गनिमी काव्याची नीती कोणती आणि पळपुटेपणा कोणता हे ओळखण्यासाठी मुळात आपली सारासार विवेकबुद्धी शाबूत असावी लागते. राहुल गांधी आणि बुद्धी यांचा काही संबंध आहे असे मुळात कधीच दिसत नाही हा भाग वेगळा. सावरकरांचे संपूर्ण वाङ्‌मय वाचाल तर त्यामध्ये दिसते केवळ धगधगते राष्ट्रप्रेम. ‘तुजसाठी मरण ते जनन, तुजवीण जनन ते मरण | तुज सकल चराचर शरण’ म्हणत आपल्या अवघ्या आयुष्याची आहुती स्वातंत्र्ययज्ञामध्ये देणार्‍या सावरकरांना हिणवण्याची पात्रता अंगी येण्यासाठी राहुल यांनी देशासाठी आजवर असा कोणता त्याग केला आहे? साध्या निवडणुकीतील एका पराभवाने जे आपली पक्षातील सर्व पदे सोडून चालते झाले, जणू संन्यासच घेतला, अशा पळपुट्याने सावरकरांविषयी कुत्सित बोलणे म्हणूनच कीव आणणारे आहे. त्यांच्यावर माफी मागण्याची वेळ आली आहे ती अर्वाच्य विधानामुळे. त्याचा संबंध सावरकरांच्या कथित माफीनाम्याशी जोडणे हाच मुळात विनोद आहे. राहुलजी, खरेच तुम्ही सावरकर नव्हेच नव्हे!!