गेल्या दोन महिन्यांत नवीन 20 ई-चार्जिंग स्टेशन्स बसवून जोडण्यात आली असून, पुढील तीन महिन्यांत ई- चार्जिंग स्टेशनची संख्या आणखी वाढविली जाणार आहे. सरकारची ईव्ही अनुदान योजना सुरळीतपणे सुरू आहे, अशी माहिती वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी पत्रकारांशी बोलताना पर्वरी येथे काल दिली.
बार्देश तालुक्यातील विजेची समस्या सोडविण्यासाठी वीज उपकेंद्रांचा दर्जा वाढविण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती देखील ढवळीकर यांनी दिली.
वीज खात्याने वीज पायाभूत सुविधा सुधारण्याकडे लक्ष दिले आहे. गेल्या दोन वर्षांत 5,000 कोटी रुपयांच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. वीज पायाभूत सुविधा सुधारण्याची काही कामे पूर्ण झाली असून काही कामे सुरू आहेत, असेही मंत्री ढवळीकर यांनी सांगितले.
वीज खात्याने स्मार्ट मीटर बसविण्याच्या कामाला गती दिली असून, निविदा प्रक्रियेचे काम पूर्ण झाले आहे. निविदांची आता छाननी करून पुढील कार्यवाही केली जाणार आहे, असेही ढवळीकर यांनी सांगितले.