राज्य निवडणूक आयोगाने पेडणे तालुक्यातील हळर्ण, कासारवर्णे आणि चांदेल-हसापूर या तीन ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून, या तीन पंचायतींची निवडणूक ९ डिसेंबर रोजी निवडणूक घेतली जाणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज २२ ते २९ नोव्हेंबरपर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत. या तीनही पंचायत क्षेत्रात शुक्रवार दि. १८ नोव्हेंबरपासून निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त डब्लू. व्ही. रमणमूर्ती यांनी दिली.
उमेदवारी अर्जांची छाननी ३० नोव्हेंबर रोजी केली जाणार असून, १ डिसेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेतले जाऊ शकतात. ९ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होईल आणि त्यानंतर ११ डिसेंबर २२ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. या निवडणुकीसाठी मतपत्रिकेच्या माध्यमातून मतदान घेतले जाणार आहे.