>> चारजण जखमी, राज्यात अपघाताचे सत्र सुरूच
राज्यातील रस्ता अपघातांची मालिका अद्यापही सुरूच आहे. शनिवारी व रविवारी राज्यात तीन ठिकाणी तीन वेगवेगळे अपघात झाले. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून चारजण जखमी झाले आहेत. कुठ्ठाळी सांकवाळ मार्गावर शनिवारी अपघात झाला. मोले येथे राष्ट्रीय महामार्गावर एक तसेच गणेशपुरी म्हापसा येथे खोदलेल्या रस्त्यामुळे एक अपघात झाला. या तीन अपघातांतील मोले व शिवोलीतील अपघात हे काल रविवारी झाले.
कुठ्ठाळी-सांकवाळ येथे एकाचा मृत्यू
मुरगाव तालुक्यातील कुठ्ठाळी – सांकवाळ येथील राष्ट्रीय मार्ग 17 वर शनिवार दि. 13 रोजी झालेल्या दोन दुचाकींच्या अपघातात एका दुचाकीचालकाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातातील इतर दोघा जखमींवर गोवा वैद्यकीय महाविद्यालयात बांबोळी येथे उपचार सुरू आहेत. वेर्णा पोलिसांनी साकवाळ दुचाकी वाहन अपघाताचा पंचनामा करून दुचाकीचालक मंगल (35) यांचा मृतदेह मडगाव येथील हॉस्पिसियो इस्पितळात उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे.
सांकवाळ राष्ट्रीय मार्ग 17 वर शनिवारी रात्री 10.30 वा. कुठ्ठाळीतून वास्को येथे आपल्या दुचाकी होंडा साईनवरून जात असताना समोरून वास्कोहून कुठ्ठाळीच्या दिशेने येत असलेल्या होंडा ॲक्टिवाची समोरून धडक बसली. या अपघातात होंडा साईनचे चालक मंगल यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्यामागे बसलेले शैलेंद्रकुमार चौधरी हे जखमी झाले. तसेच ॲक्टिवा दुचाकीचालक ललित हे या अपघातात जखमी झाले. दुचाकी अपघातातील दोघा जखमींना पोलिसांनी व स्थानिकांनी त्वरित उपचारासाठी तिसवाडी बांबोळी येथील गोमेकॉत दाखल केले. मृत दुचाकीचालक मंगल यांच्या मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवचिकित्सेसाठी मडगाव हॉस्पिसियो इस्पितळात पाठवून दिला आहे. मंगल हे मूळ झारखंडमधील असून ते मोपा येथे मजूर म्हणून काम करत होते. या अपघाताची पुढील चौकशी वेर्णा पोलीस निरीक्षक डायगो ग्रेसियस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
गणेशपुरीत एक जखमी
गणेशपुरी म्हापसा येथे रस्ता खोदलेला असल्यामुळे काल रविवारी दुचाकीला अपघात झाला. या स्वयंअपघातात दुचाकीचालक ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावरही उपचार सुरू आहेत.
मोलेत ट्रकची दुचाकीला धडक
मोले येथील राष्ट्रीय महामार्गावरील एका धोकादायक वळणावर ट्रक आणि दुचाकी यांच्यात अपघात झाला. वळणावर दुचाकीला ट्रकने धडक दिल्यामुळे मोटारसायकल चालक व त्याच्यामागे बसलेली आणखी एक व्यक्ती असे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात जखमी झालेल्यांना त्वरित गोमेकॉत दाखल केले असून त्यांच्यावर तिथे उपचार सुरू आहेत. या अपघातात दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे.