तिसवाडीतील पाणी पुरवठा दिवसभर ठप्प

0
101

ओपाजवळील जलवाहिनी फुटली
सोमवारी रात्री ओपा पाणी प्रकल्पापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावरील सुमारे ४०० मीटर लांबीची मोठी जलवाहिनी उसळून पडल्याने पणजी राजधानीसह तिसवाडी तालुक्यात पाणी पुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे बांबोळीतील गोमेकॉ इस्पितळाच्या पाणी पुरवठ्यावरही परिणाम झाला.
या प्रकारामुळे खात्याच्या अधिकार्‍यांची तारांबळ उडाली. मोठी जलवाहिनी असल्याने ती सिमेंटचा वापर करून पुन्हा बसवावी लागली. परवा पहाटेपर्यंत जलवाहिनी बसविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. पाण्याच्या प्रचंड दाबामुळे हा प्रकार घडला. खात्याच्या अधिकार्‍यांनी व कर्मचार्‍यांनी शिकस्त करून जलवाहिनी बसविण्याचे काम काल दुपारी उशिरा पूर्ण झाल्याची माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिली.
वरील बिघाडामुळे काल दिवसभर पाणी पुरवठा होऊ शकला नाही. सोमवारी रात्री वीज पुरवठाही खंडित होता. त्याचाही कामावर परिणाम झाला. रात्री उशिरापर्यंत पाणी सोडणे शक्य होणार असल्याने आज पहाटे पाणी मिळण्यास अडचण होणार नाही, असे अधिकार्‍यांनी सांगितले.