तिसवाडीचा पाणीपुरवठा चार दिवस बंद

0
142

>> कुर्टीत महामार्गाची संरक्षक भिंत कोसळून जलवाहिन्या फुटल्या

कुर्टी – केरये – खांडेपार येथे राष्ट्रीय महामार्गाची संरक्षक भिंत कोसळल्याने पाण्याचा पुरवठा करणार्‍या ९०० मिमी आणि ७५० मिमी अशा दोन प्रमुख जलवाहिन्या फुटल्याने राजधानी पणजीसह तिसवाडी तालुक्यातील बांबोळी, रायबंदर, ओल्ड गोवा, सांत आंद्रे, सांताक्रुझ, ताळगाव, बाणस्तारी, माशेल, कुंभारजुवा आदी भागातील पाणी पुरवठा कालपासून खंडीत झाला आहे. या दोन्ही जलवाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी चार दिवस लागणार आहेत. त्यामुळे पाणी पुरवठा खंडीत झालेल्या भागात टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दीपक पाऊसकर यांनी या प्रतिनिधीशी बोलताना काल दिली.

पणजी ते बेळगाव या राष्ट्रीय महामार्गावरील कुर्टी केरये खांडेपार येथील नव्याने बांधण्यात आलेली संरक्षक भिंत गुरूवारी सकाळी कोसळल्याने पाण्याचा पुरवठा करणार्‍या दोन्ही मुख्य जलवाहिन्यांची नासधूस झाली आहे. या नासधूस झालेल्या जलवाहिन्यांची तात्काळ दुरुस्ती करणे शक्य नाही. जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी पहिल्यांदा संरक्षक भिंत्तीचे बांधकाम करणे आवश्यक आहे. संरक्षक भिंत उभारण्यासाठी जास्त कालावधी लागणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री पाऊसकर यांनी बांधकाम खात्याच्या अधिकार्‍यासमवेत भिंत कोसळलेल्या जागेची पाहणी केली असून ती बांधण्यासाठी जलदगतीने पाऊल उचलण्याची सूचना केली आहे.
जलवाहिनी बदलण्याचे काम लवकर होऊ शकते. परंतु, राष्ट्रीय महामार्गाची कोसळलेली संरक्षक भिंत तातडीने बांधण्याचे काम कठीण आहे. संरक्षक भिंत जलदगतीने बांधण्यासाठी दोन – तीन पर्यायांवर विचार करून तिच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. केरये खांडेपार येथे शेताच्या बाजूला असलेल्या सध्याच्या मुख्य जलवाहिन्य रस्त्याच्या दुसर्‍या बाजूने डोंगराळ भागातून घालण्याचे काम हाती घेतले जाणार आहे, असेही मंत्री पाऊसकर यांनी सांगितले.

दरम्यान फोंड्याचे आमदार रवी नाईक यांनी राष्ट्रीय महामार्गाची कोसळलेली संरक्षक भिंत आणि जलवाहिनीची पाहणी केली आहे. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे संरक्षक भिंत कोसळली आहे, असा आरोप आमदार नाईक यांनी केला.
या दोन्ही जलवाहिन्यांतून तिसवाडी तालुका आणि फोंडा तालुक्यातील काही भागात पाण्याचा पुरवठा केला जातो. त्यामुळे राजधानी पणजीसह बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय, संरक्षण दलाची आस्थापने व इतर भागात पाण्याचा पुरवठा बंद राहणार आहे.

पणजी आणि आसपासच्या भागात टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जाणार आहे. हा परिसर मोठा असल्याने सर्वच भागांना योग्य प्रमाणात टँकरचे पाणी उपलब्ध होणे कठीण आहे. पाणी पुरवठ्यासाठी खासगी टँकरची मदत घ्यावी लागेल, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाच्या अधिकार्‍याने दिली.