तिसर्‍या लाटेच्या मुकाबल्यासाठी सरकार सज्ज

0
127

>> मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची माहिती

>> बालरोगतज्ज्ञांना देणार प्रशिक्षण

कोविडची तिसरी लाट येणार असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिल्यानंतर या लाटेला तोंड देण्यासाठी सरकारने यापूर्वीच आवश्यक ती साधनसुविधा हाती घेण्याचे काम हाती घेतले आहे. या लाटेत लहान मुलांना संसर्ग होण्याचे प्रमाण जास्त असण्याची शक्यता लक्षात घेऊन कोविडग्रस्त मुलांवर उपचार कसे करावेत यासाठी राज्यभरातील बालरोग तज्ज्ञांना आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बालरोगतज्ज्ञांना प्रशिक्षण देणार
लहान मुलांवर उपचार कसे करावेत त्यासंबंधीचे प्रोटोकॉल एम्स तयार करीत असून त्यासंबंधीचे प्रशिक्षण राज्यातील बालरोग तज्ज्ञांना देण्यात येत असल्याचे ते म्हणाले. कोविडग्रस्त मुलांवर उपचार करण्यासाठी राज्यातील सरकारी तसेच खासगी बालरोग तज्ज्ञांची मदत घेण्यात येईल. गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील बालरोग विभाग कोविडग्रस्त मुलांवरील उपचारासंबंधीच्या एसओपीचे बालरोग तज्ज्ञांना प्रशिक्षण देणार आहे. कोविडग्रस्त मुलांवर उपचार करण्यासाठी जी औषधे लागतील तीही मागवण्यात आली आहेत.

तिसर्‍या लाटेत राज्यातील मुलांना मोठ्या प्रमाणात कोविडची बाधा झाली. तर त्यांच्यावर विनाविलंब योग्य प्रकारे उपचार करता यावेत यासाठी गोमेकॉतील सुपर स्पेशालिटी विभागाचे बाल विभागात रूपांतर करण्यात येईल. राज्यात १२० बालरोग तज्ज्ञ असून त्या सर्वांना उपचारासाठीचे आवश्यक ते प्रशिक्षण देण्याचे काम हाती घेण्यात येईल, असे सावंत यांनी सांगितले.

‘त्या’ महिलांच्या
लसीकरणास प्राधान्य

दोन वर्षांपेक्षा कमी वयाचे मूल असलेल्या व स्तनपान करणार्‍या मातांना तसेच ज्या मातांना गंभीर स्वरूपाचे आजार आहेत त्यांना लसीकरणात प्राधान्य देण्याचा सरकारने निर्णय घेतला असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. कोविड झालेल्या लहान मुलांवर उपचार करण्यासाठी जी जी वैद्यकीय उपकरणे लागतील तीही आणण्याचे काम चालू आहे.
तिसर्‍या लाटेच्यावेळी समुपदेशनाचे काम करण्यासाठी शिक्षण खाते, गोवा राज्य एडस् नियंत्रण सोसायटी तसेच महिला व बाल कल्याण खात्यातील समुपदेशकांची मदत घेण्यात येणार आहे.

गृहविलगीकरणात ठेवण्यात येणार असलेल्या मुलांच्या आरोग्याकडे बारीक लक्ष ठेवण्यात येणार आहे असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.
राज्यात आतापर्यंत कोविडची बाधा झालेल्या रुग्णांपैकी ११ टक्के रुग्ण हे १७ वर्षांखालील वयाचे होते. १८ वर्षांपेक्षा कमी वयोगटातील सात रुग्णांचा मृत्यू झालेला असून त्यांना अन्य गंभीर स्वरूपाचे आजार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

१८ ते ४४ वयोगटासाठी
ऑनलाइन नोंदणी नाही

१८ ते ४५ वयोगटातील लोकांना आता लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदणीची आवश्यकता नसून थेट लसीकरण केंद्रावर येऊन नोंदणी करून लस टोचून घेऊ शकतील अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
ज्यांना दुसरा डोस घ्यायचा आहे ते पहिला डोस घेतल्यानंतर ८४ दिवसांनंतर दुसरा डोस घेऊ शकतात असेही यावेळी सावंत यांनी स्पष्ट केले.

गोमेकॉतील सुपर स्पेशालिटी विभागातील ५५० खाटांपैकी ३९४ खाटा या कोविड रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यापैकी २८४ खाटा ह्या भरलेल्या असून ११० खाटा रिक्त असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

सरकारने टीका उत्सवाचे आयोजन करून १६८ केंद्रांवरून लोकांना लस दिली होती. आता त्यात आणखी २०-२५ केंद्रांची भर टाकून लोकांना लस देण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

जूनमध्ये ३६ हजार डोस
या घडीला राज्यात १८ ते ४४ या वयोगटातील लोकांसाठी असलेल्या कोविड लशींपैकी केवळ ६ हजार लशी शिल्लक असून अजून जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत लशीचे आणखी ३६ हजार डोस उपलब्ध होणार आहेत. त्याशिवाय सरकारने कोविड लशीचे उत्पादन करणार्‍या दोन वेगवेगळ्या कंपन्यांकडे पाच व दहा लाख लशींची ऑर्डर दिली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

बारावीच्या परीक्षेबाबत दोन दिवसांत निर्णय

इयत्ता बारावीच्या परीक्षेसंदर्भात सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नसून त्या संबंधी येत्या दोन दिवसांत कळवण्यात येईल असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल स्पष्ट केले.

कोविड महामारीच्या पार्श्‍वभूमीवर सरकारने दोन दिवसांपूर्वीच दहावी इयत्तेच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्या पार्श्‍वभूमीवर आता राज्य सरकार बारावी इयत्तेच्या परीक्षेबाबत काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

राज्य सरकारच्या इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत. काही शिक्षणतज्ज्ञांनी महामारीच्या काळ लक्षात घेऊन सरकारने परीक्षा रद्द करण्याचा घेतलेला निर्णय योग्य असल्याचे मत व्यक्त केले आहे. तर काही जणांनी या निर्णयावर टीका केली आहे.