तिसर्‍या महायुद्धाची दुंदुभी?

0
104
  • कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त)

उत्तर कोरियाच्या दक्षिण कोरियावरील आण्विक दबावामुळे किंवा त्याच्या एकंदर आण्विक मुजोरपणामुळे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप यांनी प्रिएम्टिव्ह स्ट्राईक करायचे ठरवले तर युद्ध अटळ आहे…

सततच्या क्षेपणास्र चाचण्या आणि अण्वस्त्र परीक्षणे यांमुळे उत्तर कोरिया आणि त्या देशाचा हुकूमशहा किम जोंग सध्या चर्चेत आहे. अलीकडेच किमने ‘व्हासांग १५’ या आंतर खंडीय क्षेपणास्त्राचे सङ्गल परीक्षण केले. हे क्षेपणास्त्र १३ हजार कि. मी. पल्ल्याचे आहे. त्यामुळे उत्तर कोरिया आणि अमेरिकेमधील युद्ध संभावना वाढली आहे.

उत्तर कोरियाने १५ सप्टेंबरच्या क्षेपणास्त्र परीक्षणानंतर जवळपास ७४ दिवसांनी म्हणजेच २९ नोव्हेंबर रोजी त्याच्या ‘‘व्हासांग १५’’ प्रणालीच्या आंतर खंडीय क्षेपणास्त्राचे सफल परीक्षण केले. या क्षेपणास्त्रात, शत्रूच्या रडारवर येउनही लवकर ओळखण्यास कठीण अशी न्यू मोबाईल सॉलिड फ्युएल सिस्टीम वापरण्यात आली असली तरी यावर किती वजनाचे ‘वॉरहेड’ होते हे गुलदस्त्यातच आहे.

उत्तर कोरियाची राजधानी प्यॉंन्ग्यांगजवळ असलेल्या केंद्रामधील मोबाईल लॉंचरवरून डागण्यात आलेले हे क्षेपणास्त्र, आकाशात ५३ मिनिटांचे उड्डाण करून ४,४७५ किलोमीटर उंच गेले आणि ९५० किलोमीटर्सचा समांतर पल्ला गाठल्यावर जपान सागरामधील एक्सक्ल्युझिव्ह इकॉनॉमिक झोनच्या उत्तरेतील हांशू बेटावरच्या ओमोरीवरून उड्डाण करत तेथून फक्त १५० किलोमीटर दूर समुद्रात पडले. संरक्षणतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार जर क्षेपणास्त्र विवक्षित उंचीवरून सरळ रेषेत गेले असते तर त्याने किमान १३,००० किलोमीटरचा पल्ला सहजपणे गाठत न्यूयॉर्क व वॉशिंग्टन डीसी सह संपूर्ण अमेरिकेला कवेत घेतले असते.

दक्षिण कोरियाने देखील १००० किलोमीटरवर अचूक मारा करणारी क्षेपणास्त्रे (प्रिसिजन स्ट्राईक मिसाइल) डागून आपण कोणत्याही प्रकारच्या क्षेपणास्त्र मार्‍याला तोंड देण्यास सज्ज आहोत हे दाखवून दिले. मात्र उत्तर कोरियाच्या या क्षेपणास्त्राला तोंड देण्यास जपान असमर्थ आहे. चीनचा सांग ताओ हा वरिष्ठ राजनितीज्ज्ञ २९ नोव्हेंबर रोजी उत्तर कोरियाला समजावण्यासाठी गेला होता. मात्र तरीही क्षेपणास्त्र परीक्षण झाल्यामुळे उत्तर कोरिया आता चीनला सुद्धा जुमानत नाही हे स्पष्ट झाले आहे. त्याचप्रमाणे अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप यांच्या धमक्या, संयुक्त राष्ट्र संघाने घातलेले कठोर प्रतिबंध आणि उत्तर कोरियाला एकटे पाडण्याच्या अनेक योजना देखील या पुंड देशाच्या क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाला आळा घालू शकत नाहीत, हे देखील जगाला कळून चुकले आहे. उत्तर कोरियाचे हे परीक्षण गुआम बेटाच्या दिशेने न झाल्यामुळे आणि त्याने पॅसिफिक महासागरावर अण्वस्त्र स्फोट न केल्यामुळे त्यांच्यावर त्वरित अमेरिकन आक्रमक मारा झाला नाही. उत्तर कोरियाच्या दक्षिण कोरियावरील आण्विक दबावामुळे किंवा त्याच्या एकंदर आण्विक मुजोरपणामुळे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप यांनी प्रिएम्टिव्ह स्ट्राईक करायचे ठरवले तर युद्ध अटळ आहे.

स्टिव्हन्स इन्सिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीच्या अलेक्स वेलर्सन यांच्या मते, आण्विक क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे प्रत्येकी किमान नऊ लाख लोक मृत्युमुखी पडून १५ लाखांपेक्षा जास्त लोकांना गंभीर आण्विक जखमांना तोंड द्यावे लागू शकते. त्यामुळे युद्धाचा पर्याय स्वीकारण्याऐवजी सर्वप्रथम उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र विकास परीक्षण आणि अमेरिका व दक्षिण कोरियाने आपले समन्वयी युद्धाभ्यास (जॉईंट मिलिटरी एक्सर्साइझेस) एकसाथ थांबवले पाहिजे. त्यानंतर दोन्हीही देशांनी एकमेकांचे सार्वभौमत्व आणि सुरक्षेला धक्का लागेल अशी कोणतीही सामरिक कारवाई न करता विश्‍वासाचे वातावरण तयार केले पाहिजे असा मतप्रवाह अमेरिकेत निर्माण होतो आहे..

जर डोनाल्ड ट्रंप उत्तर कोरियाविरूद्ध प्रतिबंध युद्ध (प्रिव्हेन्टिव्ह वॉर) करणार असतील तर मारेकरी पाठवून, गनिमी हल्ल्याद्वारे किंवा डर्टी बांबच्या माध्यमातून त्या देशाच्या सर्वोच्च अधिकार्‍यांची हत्या करणे हा एक पर्याय असू शकतो. मात्र तसे झाल्यास तेथील जनता उत्तर कोरियन राजवटीमागे खंबीरपणे उभे राहून किम जांगच्या वाचलेल्या सहकार्‍यांना अमेरिका आणि दक्षिण कोरियावर आण्विक प्रतिहल्ल्यासाठी बाध्य करतील. त्याऐवजी १९८१ मधील ओसिराक, इराकच्या आण्विक भट्टीवरील इस्त्रायली हल्ल्यासारखा आकस्मिक हल्ला अमेरिका करू शकते. पण उत्तर कोरियाची स्थिती इराकसारखी नाही. उत्तर कोरियाची जमीन आणि पहाडांमधील गुंफांमध्ये लपवून ठेवलेली, किमान तीन डझनांच्यावर कार्यकारी अण्वस्त्रे (युझेबल न्युक्लियर वेपन्स) आणि घनइंधन असणारी क्षेपणास्त्रे गुफांमधून सहजगत्या बाहेर येणार्‍या मोबाईल लॉंचर्सवरून क्षणार्धात डागली जाऊ शकतात.

अमेरिकेने आक्रमणाचा पर्याय निवडल्यास उत्तर कोरिया त्याच्या तैनात तोफा आणि रॉकेट लॉंचर्सद्वारे दक्षिण कोरियाची राजधानी सिओल, जपान आणि गुआम बेटाला भाजून काढेल. दक्षिण कोरियात २ लाख, जपानमध्ये ४० हजार आणि गुआम बेटावर आठ हजार अमेरिकी सैनिक तैनात आहेत. अशा क्षेपणास्त्र हल्ल्याला तोंड देण्यासाठी दक्षिण उत्तर कोरियन सीमेवर अमेरिकन टर्मिनल हाय अल्टिट्युड एरिया डिफेन्स मिसाईल सिस्टीम तैनात केली गेली आहे. अर्थात सरतेशेवटी अमेरिकन आणि दक्षिण कोरियन सेना उत्तर कोरियावर निःसंशय कब्जा करतील; पण तोवर किमान १५ ते १८ लाखांपेक्षा जास्त नागरिकांना जीव गमवावा लागून सर्वात मोठा नरसंहार झालेला असेल.

उत्तर कोरियाकडे सात हजार गनिमी सैनिकांसह किमान १० लाख कार्यरत सैनिक, ६ लाख अर्धसैनिक, १००० लढाउ विमाने, ५ हजार रणगाडे, १६ हजार तोफा, ३.५ हजार स्क्वॅड आणि इतर लांब पल्ल्यांची क्षेपणास्त्रे आणि ७६ पाणबुड्यांसमवेत २०९ लढाऊ समुद्री जहाजे आहेत. जनरल मार्क हर्टलिंगनुसार अमेरिकेला काही आठवडे सतत हवाई हल्ले केल्यानंतरच उत्तर कोरियाच्या आर्टिलरी आणि मिसाइल्सना काबूत आणता येईल. आधी १९५३ मध्ये राष्ट्रपती हॅरी एस ट्रमनने आणि दुसर्‍यांदा ८२ नाविकांसह अमेरिकन स्पाय शिप, यूएसएस प्युएब्लोला आपल्या ताब्यात घेतल्यावर त्यांना सोडवण्यासाठी १९६८ मध्ये राष्ट्रपती लिंडन बी जॉन्सनने उत्तर कोरियावर आण्विक हल्ला करण्याचा निर्णय घेतला होता. दोन्ही वेळा आण्विक हल्ल्याला बळी पडता पडता थोडक्यात वाचल्यामुळे उत्तर कोरियामध्ये सर्वत्र द्विअर्थी संसाधनीय बांधकामे झालेली आहेत. अण्वस्त्र मार्‍याला आणि बॉम्बवर्षावाला सक्षमरित्या तोंड देण्यासाठी प्रत्येक चौक, इमारत आणि रस्त्यांवर, किंबहुना जागोजागी शत्रूचे हवाई हल्ले तसेच तोफा/क्षेपणास्त्रांपासून बचावासाठी डीप कॉंक्रीट अंडर ग्राउंड शेल्टर्स बांधण्यात आली आहेत. प्रत्येक संसाधनीय इमारतींना मोठी ब्लास्ट डोअर्स आणि विंडोज् बसवलेली आहेत. रशियन देखरेखीत तयार झालेले देशातील सर्व मेट्रो मार्ग आणि महत्त्वाच्या संसाधनेय इमारती किमान १५-३५ मीटर जमिनीत असतात. उत्तर कोरिया आणि अमेरिकेमधील युद्ध संभावना फार मोठी आहे.