तिसर्‍या कसोटीत रबाडा खेळणार

0
192
South Africa's bowler Kagiso Rabada,bowls against New Zealand's captain Kane Williamson, on the third day of their second cricket test match at Centurion Park in Pretoria, South Africa, Monday, Aug. 29, 2016. (AP Photo/Themba Hadebe)

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाचा केपटाऊन कसोटी खेळण्याचा मार्ग काल मोकळा झाला. पोर्ट एलिझाबेथ कसोटीनंतर सामना अधिकारी जेफ क्रो यांनी सुनावलेल्या शिक्षेला रबाडाने आव्हान दिले होते. रबाडाच्या या याचिकेवर सुनावणी करताना आयसीसीने त्याला लेव्हल २ मधून दोषमुक्त केले आहे. त्यामुळे रबाडा आता लेव्हल १ अंतर्गत दोषी असल्याचा निर्णय आयसीसीने दिला आहे. त्याबद्दल त्याच्या मानधनात २५ टक्के कपात करण्यात येणार आहे.

दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पोर्ट एलिझाबेथमध्ये झालेल्या दुसर्‍या कसोटीच्या दरम्यान रबाडाने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव स्मिथला बाद केले. त्यानंतर आनंदाच्या भरात रबाडाने अती आक्रमकपणा दाखवला आणि तो स्मिथच्या जवळ गेला. यादरम्यान रबाडाने स्मिथला भडकवण्याचाही प्रयत्न केला. रबाडाने जाणीवपूर्वक स्मिथला शारीरिक स्पर्श केल्याचा ठपका सामनाअधिकारी जेफ क्रो यांनी ठेवला होता.

या गैरवर्तनाबद्दल रबाडाच्या खात्यात ३ दोषांक जमा करण्यात आले होते. त्यामुळे रबाडाच्या दोषांकांची संख्या ८ झाल्याने त्याच्यावर दोन कसोटी सामन्यांची बंदी घालण्यात आली होती. आयसीसीच्या नियमानुसार २४ महिन्यामध्ये एका खेळाडूला मैदानावरील वर्तनामुळे ८ दोषांक मिळाल्यास आयसीसीकडून कारवाई करण्यात येते. गेल्या महिन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका संघामध्ये झालेल्या कसोटी मालिकेदरम्यान रबाडच्या डिमेरिट पॉईंटची संख्या ५ झाली होती. त्यावेळी रबाडाने टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवन बाद झाल्यानंतर त्याला ‘बाय बाय’चा इशारा केला होता. सामना अधिकार्‍यांनी सुनावलेल्या या शिक्षेच्या विरोधात रबाडाने आयसीसीकडे अपील केले होते.

या अपीलावर आयसीसीचे आयुक्त मायकल हेरोन यांच्यासमोर सोमवारी तब्बल ६ तास व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सुनावणी झाली. दक्षिण आफ्रिकेचे कायदा सल्लागार डाली पोफू यांनी रबाडाची बाजू मांडली. यावेळी कर्णधार फाफ ड्युप्लेसी संघ व्यवस्थापक मोहम्मद मुसाजी उपस्थित होते. हेरोन हे न्यूझीलंड रग्बी तसेच सांझार (द. आफ्रिका, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया व अर्जेंटिना) या रग्बीचे संचालक करणार्‍या संस्थेचे न्यायिक आयुक्त असून आयसीसीच्या वाद निवारण समितीचे सदस्य देखील आहेत. त्यांनी स्मिथला आपण जाणीवपूर्वक स्पर्श न केल्याचा रबाडाचा मुद्दा ग्राह्य धरला. त्याचे ३ पैकी २ दोषांक कमी करत २२ पासून होणार्‍या कसोटीत खेळण्याचा त्याचा मार्ग मोकळा केला.