तिळामळ येथे रस्ता अडवल्याने तणाव

0
107

केपे (न. प्र.)
तिळामळ येथे रस्त्यावर कुंपण व फाटक घालून रस्ता अडवल्यामुळे या भागात तणावाची स्थिती निर्माण झाली, सदर रस्ता कुडचडेचे माजी आमदार व माजी कायदामंत्री डॉमनिक फर्नांडिस यांच्या घराकडे जातो. केपेचे उपजिल्हाधिकारी रोहित कदम, मामलेदार प्रतापराव गावकर, पालिका अधिकारी दर्शनी देसाई यांनी त्वरित घटनास्थळी जाऊन रस्ता मोकळा केला. केपेचे नगराध्यक्ष दयेश नाईक, शेल्डेचे सरपंच प्रमोद देसाई, उपसरपंच मारिया फर्नांडिस, पालिका अभियंता नितीन कोठारकर, पालिका कर्मचारी, पोलीस कर्मचारी, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंते, कर्मचारी यानी त्वरित घटनास्थळी धाव घेतली.
यावेळी जमीन मालक जेम्स फर्नांडिस यंनी सांगितले की, हा रस्ता बांधताना भूसंपदन कायद्याअंतर्गत जमीन संपादित केली नाही. या जमिनीचा मोबदला आपल्याला मिळाला नाही यामुळे हा रस्ता बेकायदा ठरतो. त्यामुळे आपण हा रस्ता अडवला आहे. आपण काही प्रमाणात जमीन लोकांना येण्या-जाण्यासाठी सोडली असल्याचे श्री. फर्नांडिस यांनी सांगितले. श्री. फर्नांडिस यांनी आपण आरटीआय चौकशी करून सार्वजनिक बांधकाम खात्याला पत्र पाठवून चौकशी केली असता सदर रस्त्याचे भू संपादन केले नसल्याचे पत्र आपल्याला खात्याकडून आल्याचे सांगून त्यांनी पत्राची पत्र अधिकार्‍यांना दाखवली.
यावर सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंत्यांनी सदर जमीन संपादित करण्यात आल्याचे सांगितले व सदर पत्र नजरचुकीने पाठवले गेले असल्याची माहिती दिली. जमीन संपादन किंवा जमीन मालकांकडून दानपत्र घेतल्याशिवाय रस्त्याचे काम सुरू करता येत नसल्याची माहिती दिली. या रस्त्याच्या दुतर्फा श्री. फर्नांडिस यांनी कुंपण उभारून रस्त्यावर दगड घालून कवाथे लावले. यामुळे तणाव निर्माण झाला. केपेचे नगराध्यक्ष दयेश नाईक, शेल्डेचे सरपंच प्रमोद देसाई, उपसरपंच मारिया फर्नांडिस यांनी स्वत: उपस्थित राहून दोन्ही बाजूच्या लोकांशी चर्चा करून शांतता राखली.