तिबेटियन नागरिकांची वास्कोत चीनविरोधात मूक निदर्शने

0
89

>> पाच जणांना अटक व सुटका

 

तिबेटवर चीनने आपले वर्चसव गाजविणे चालूच ठेवलले असून त्याचा निषेध करण्यासाठी अनेक तिबेटी नागरिकांनी अनेक ठिकाणी धरणे कार्यक्रम आखून मूक निदर्शने केली. वास्कोतील तिबेटियन नागरिकांनी कालपासून स्वतंत्रपथ मार्गावरील जोशी चौकात धरणे धरले व चीनचा निषेध केला. येथील जोशी चौकात उभारलेल्या शेडमध्ये त्यांनी हातात फलक घेऊन व छातीवर लावून चीनविरुद्ध मूक निदर्शने केली. मात्र पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली नाही. दरम्यान दाबोळी विमानतळावर चीन विरोधी निदर्शने करताना वास्को पोलिसांनी पाच तिबेटी नागरिकांना अटक केली. यात तीन महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे. दाबोळीत कडक सुरक्षा व्यवस्था असतानाही तिबेटी नागरिकांनी चीनविरुद्ध निदर्शने करण्याचे पाऊल उचलले. या पाचही निदर्शकांना पोलिसांनी त्वरित ताब्यात घेऊन वास्को पोलीस स्थानकावर आणले. तेथे त्यांना अटक केली व नंतर त्यांची सुटका करण्यात आली.
वास्को आणि मडगाव या ठिकाणी तिबेटीयन नागरिकांना अटक करण्यात आली असून त्यांची न्यायालयीन आदेशानुसार न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. अटक केलेल्या सर्वांना सडा येथील उपकारागृहात ठेवले होते. यात दिल्ली, बेंगळुरू, मेंगलोर येथील विद्यापीठात शिकण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांचाही समावेश होता. ब्रिक्स परिषदेची सांगता झाल्यामुळे या सर्व नागरिकांची सुटका करण्यात आली.
ज्या ज्या ठिकाणी चीनी प्रमुखांचे कार्यक्रम असतात, त्या त्या ठिकाणी जाऊन तिथे तिबेटियन नागरिक चीनविरोधात निदर्शने करत असतात. सध्या मडगाव येथे ब्रिक्स परिषद गोव्यात सुरू होती. त्यावेळी चीने राष्ट्राध्यक्ष शी जीनपिंग हे आले होते. त्यामुळे त्यांचा निषेध करण्यासाठी तिबेटियन नागरिकांनी निदर्शने केली होती.