चार लाखांचे मोबाईल जप्त
म्हापसा मासळी मार्केट जवळील चण्याच्या दुकानांच्या रांगेतील केवलपुरी गोस्वामी यांचे पुजा मोबाईल नामक दुकान गेल्या शुक्रवार दि. १९ रोजी मध्यरात्री फोडून आत प्रवेश करून आतील सुमारे ४ लाख ५० हजार रुपये किंमतीचे मोबाईल संच चोरट्यांनी चोरून नेले होते. याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी जिल्हा गुप्त पोलिसांच्या सहाय्याने सापळा रचून तिघा संशयित चोरट्यांना काल रविवार दि. ५ रोजी सकाळी अटक केली. त्यांच्याकडील ४ लाख रुपये किंमतीचे मोबाईल ताब्यात घेण्यात आले.
युन्नी बेनकर निसाद (रा. मडगाव, मूळ उत्तरप्रदेश), रामचंद्र बेनकर निसाद (रा. डांगी कॉलनी, म्हापसा, मूळ उत्तर प्रदेश) व फुलचंद्र सज्रू (रा. डांगी कॉलनी म्हापसा, मूळ उत्तर प्रदेश) अशी पकडण्यात आलेल्या संशयित चोरट्यांची नावे आहेत. दि. १९ रोजी पूजा मोबाईल दुकानाचे पुढील शटर्स वाकवून चोरट्यांनी आत प्रवेश केला व आतील दुकानातील काचांच्या फ्रेममध्ये ठेवलेले ६० हून अधिक मोबाईल संच चोरून नेले होते.
या वेळेपासून म्हापसा पोलीस चोरट्यांच्या मागावर होते. म्हापसा पोलीस निरीक्षक तुषार वेर्णेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रत्नाकर कळंगुटकर तसेच आल्विटो डिमेलो, केशव नाईक, सागर खोर्जुवेकर, सुशांत चोपडेकर, अनंत च्यारी, श्रीराम साळगावकर, विशाल नाईक, सतीश सावंत, अक्षय्य नाईक, बाबी या म्हापसा पोलीस स्थानकाच्या पोलिसांनी व जिल्हा गुप्त पोलिसांनी सापळा रचून चुन्नी निसाद याला मडगाव येथे तर रामचंद्र निसाद व फुलचंद्र सज्रू याला कोलवाळ येथे अटक केली.
पोलिसांनी काल पहाटे प्रथम चुन्नी याला अटक केली असता त्यांने रामचंद्र व फुलचंद यांची नावे सांगितली. त्या दोघांना कोलवाळ येथून पळण्याच्या तयारीत असताना अटक केली व त्याच्या खोलीतून ४ लाख रुपये किंमतीचे मोबाईल जप्त केले. त्याना न्यायालयात उभे केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.