तालुका निवडणूक कार्यालयांत आज टपाली मतदान

0
146

राज्य विधानसभेसाठी गेल्या ४ फेब्रुवारी रोजीच्या निवडणूक प्रक्रियेसाठी तैनात केलेल्या कर्मचार्‍यांना टपाली मतदानासाठी (पोस्टल बॅलट) आज दि. १८ रोजी राज्यातील सर्व तालुकास्तरीय निवडणूक अधिकार्‍यांच्या कार्यालयांमध्ये सकाळी ९.३० ते संध्या. ५.३० या वेळेत सोय करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी वरील सर्व सरकारी कर्मचार्‍यांना आवाहन केले आहे की त्यांच्यापैकी ज्यांनी अजून टपाली मतदान केलेले नाही त्यांनी मोठ्या संख्येने संबंधित कार्यालयांमध्ये येऊन कोणाच्याही धमक्यांना बळी न पडता मुक्तपणे, सद्सद्विवेक बुध्दीने मतदान करावे.
राज्य विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील सरकारी नागरी व पोलीस मिळून सुमारे साडे सतरा हजार कर्मचार्‍यांना तैनात करण्यात आले होते. त्यांच्यासाठी ११ मार्चपर्यंत टपाली मतदान करण्याची मुभा देण्यात आली होती त्यानुसार आतापर्यंत सुमारे ६ हजार जणांनी या पध्दतीने मतदान केले आहे. उर्वरीत कर्मचारी मतदारांसाठी तालुकास्तरीय निवडणूक अधिकार्‍यांच्या कार्यालयांमध्ये यासाठी सोय करण्यात आली आहे.
या कार्यालयांमधील ही सोय एखाद्या मतदान केंद्राप्रमाणेच असेल. यावेळी या ठिकाणी संबंधित मतदारसंघाचे उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी यांना उपस्थित राहून ही प्रक्रिया पाहण्याची मुभा असेल. मात्र त्यांना कोणत्याही प्रकारे मतदारावर प्रभाव पाडता येणार नाही. तसेच टपाल मतदान करणार्‍या कर्मचारी मतदारांची मतपत्रिका प्रमाणित तथा छाननी करण्यासाठी तेथे विशेष अधिकारी तैनात केले जाणार आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.

झालेले ‘पोस्टल बॅलट’
रद्द करावे : सुदिन

गोवा विधानसभा निवडणुकीतील पोस्टल बॅलट प्रश्‍नावर निर्माण झालेल्या गोंधळामुळे उमेदवार, निवडणूक अधिकारी व निवडणूक आयोग या सर्वांची बदनामी झाली असून संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आतापर्यंत झालेले पोस्टल बॅलट मतदान रद्द करावे व संबंधित तालुक्यातील निवडणूक अधिकार्‍यांच्या कार्यालयात सर्व निवडणूक कर्मचार्‍यांचे मतदान करून घेण्याची व्यवस्था करावी व त्यावेळी उमेदवारांच्या प्रतिनिधींना बोलवावे अशी मागणी आपण निवडणूक आयोगाकडे करीत असल्याचे मगो नेते सुदिन ढवळीकर यांनी सांगितले.
वरील मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी उमेदवार त्यांना आमिषे दाखवित येत असल्याची चर्चाही होत आहे. पैशांचे गैरव्यवहार होत असल्याचेही आरोप होत आहेत.

पोस्टल बॅलट : मतपत्रिकांबाबत
निवडणुकीवरील कर्मचार्‍यांच्या तक्रारी

निवडणुकीच्या कामावर असलेल्या अनेक कर्मचार्‍यांना मतपत्रिका देण्यास संबंधित अधिकारी टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी निवडणूक अधिकार्‍यांकडे येत असून काहींनी मतपत्रिका मिळविण्यासाठी संबंधित निवडणूक अधिकार्‍यांकडे मागणी पत्रेही सादर केल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.
काही कर्मचार्‍यांनी निवडणूक अधिकार्‍यांच्या कार्यालयात येऊन तोंडी तक्रारी केल्या होत्या. त्यांना तेथील अधिकार्‍यांनी संबंधित अधिकार्‍याकडे संपर्क करण्यास सांगितल्याचे कळते. यासंबंधी अतिरिक्त निवडणूक अधिकारी नावती यांना विचारले असता, अद्याप आपल्यासमोर लेखी तक्रारी आलेल्या नाहीत. त्या जिल्हाधिकार्‍यांकडे पोचल्या असाव्यात असे सांगितले. बालभवनमधील एका कर्मचार्‍याने वरील प्रकरणी संबंधित म्हणजे पेडणे तालुक्यातील निवडणूक अधिकार्‍याकडे तक्रार केल्यानंतर त्यांना तातडीने मतपत्रिका उपलब्ध करून दिल्याचे कळते. निवडणूक कामावर १७ हजार ५०० कर्मचारी होते. पैकी आतापर्यंत सुमारे ७ हजार कर्मचार्‍यांनी ‘पोस्टल बॅलट’ माध्यमातून मतदान केल्याचे निवडणूक अधिकार्‍यांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार यापूर्वीच्या निवडणुकांच्यावेळी निवडणूक कामावर असलेले कर्मचारी मतदानानंतर आपल्याला मतपत्रिका मिळावी म्हणून प्रयत्न करणार्‍या कर्मचार्‍याचे प्रमाण बरेच कमी असायचे. यावेळी प्रत्येकजण प्रयत्न करीत आहेत.
काही उमेदवारांनीही अशा कर्मचार्‍यांचा शोध घेवून आपल्याला मत मिळावे म्हणून प्रयत्न चालविले आहेत. याप्रकरणी आर्थिक व्यवहारही होत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्याने निवणूक अधिकार्‍यांनी संबंधितांवर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे. परंतु अशा बाबतीत पुरावे सापडणे कठीण असल्याचे सांगण्यात येते. ङ्गपोस्टल बॅलटफच्या माध्यमातून ११ मार्चपर्यंत मतदान करण्यास मुभा आहे, अशी माहिती नावती यांनी दिली.