>> अफगाणिस्तानमध्ये सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग
तालिबानचा सहसंस्थापक मुल्ला बरादर हा अफगाणिस्तानमधील सरकारचे नेतृत्व करणार असल्याची माहिती तालिबानशी संबंधित सूत्रांनी काल दिली. यासंदर्भातील औपचारिक घोषणा लवकरच केली जाणार आहे. बरादर हा तालिबानच्या राजकीय कार्यालयाचे नेतृत्व करतो. त्याच्यासोबतच मुल्ला मोहम्मद याकूबकडेही मुख्य जबाबदारी दिली जाणार आहे. मुल्ला मोहम्मद याकूब हा तालिबानचा सहसंस्थापक व काही वर्षापूर्वीच मरण पावलेल्या मुल्ला ओमरचा मुलगा आहे. मोहम्मद अब्बास स्टानिकजईलाही सरकारमध्ये वरिष्ठ पद मिळण्याची शक्यता आहे. तालिबानचे सर्व वरिष्ठ नेते काबूलमध्ये दाखल झाले असून नवीन सरकारची घोषणा करण्याच्या अंतिम टप्प्यातील चर्चा सुरू आहे.
तालिबानने १६ ऑगस्ट रोजी काबूलमधील राष्ट्राध्यक्षांच्या राजवाड्यामध्ये प्रवेश करत संपूर्ण देशावर ताबा मिळवला. सध्या तालिबान पंजशीरच्या खोर्यात नॉर्दन अलायन्सशी संघर्ष करत असून हा प्रदेश वगळता संपूर्ण अफगाणिस्तानवर तालिबानचाच ताबा आहे.
नवीन सरकारमध्ये पवित्र आणि सुशिक्षित लोकांचा समावेश असे आणि मागील २० वर्षांपासून सरकारमध्ये असणार्यांना संधी दिली जाणार नाही, अशी माहिती कतारमध्ये तालिबानच्या राजकीय कार्यालयाचे उपप्रमुख शेर मोहम्मद अब्बास स्टानिकजईने दिली आहे.
अफगाणिस्तानमध्ये तालिबानने आपल्या सरकारचे स्वरूप कसे असेल, याची घोषणा केली आहे. तालिबानकडून जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार शुरा काउन्सिलच तालिबानचे प्रतिनिधित्व करेल आणि हे काऊन्सिलच देशाचे सरकार म्हणून काम पाहणार आहे. या सरकारमध्ये एकाही महिलेचा समावेश करण्यात आलेला नाही. शुरा काऊन्सिल ही तालिबानमधील ज्येष्ठ आणि अनुभवी मंडळी एकत्र येऊन तयार झालेली यंत्रणा असून त्यात तालिबानशी संबंधित आणि मुस्लिम धर्माशी संबंधित संस्थांचे महत्त्वाचे पदाधिकारी असतील. या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली सरकार चालेल.