तामिळनाडूत भाजपची ‘पीएमके’सोबत युती

0
15

>> पीएमके लोकसभेच्या 10, तर भाजप 29 जागा लढवणार

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने काल तामिळनाडूत पट्टाली मक्कल काची (पीएमके) पक्षासोबत युती केली. तसेच भाजपने तामिळनाडूतील जागावाटपालाही अंतिम रूप दिले आहे. त्यानुसार पीएमके पक्ष लोकसभेच्या 39 पैकी 10 जागा लढवणार आहे, तर भाजप 29 जागा लढवणार आहे.

भाजपाने 19 एप्रिलला तामिळनाडूमध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी पीएमकेसोबत युती केली. भाजपचे तामिळनाडू अध्यक्ष के. अन्नामलाई आणि पीएमके अध्यक्ष डॉ. एस अंबुमणी रामदास यांच्यात यासंदर्भात चर्चा झाली.
पट्टाली मक्कल काचीची स्थापना 1989 मध्ये डॉ. एस. रामदास यांनी केली होती. अंबुमणी रामदास सध्या राज्यसभा सदस्य आहेत. ते 2019 मध्ये बिनविरोध निवडून आले होते. अंबुमणी रामदास हे अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये आरोग्यमंत्री होते. ते धर्मपुरी मतदारसंघातून खासदार म्हणूनही निवडून आले होते.

खरे तर, तामिळनाडूमध्ये भाजपकडे एखादा मोठा सहकारी पक्ष नाही. अशा परिस्थितीत भाजपने तामिळनाडूमध्ये पीएमके सोबत युती केली आहे. पीएमके हा एक वन्नियार समाजाचे प्रभुत्व असलेला पक्ष आहे आणि राज्यातील उत्तरेकडील काही जिल्ह्यात या पक्षाचा प्रभाव आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पीएमकेने सात जागांवर निवडणूक लढली होती. मात्र त्यांना फारसे मोठे यश मिळाले नाही. पीएमकेने 2021 मध्ये तामिळनाडू विधानसभा निवडणूक एआयएडीएमके सोबत आघाडी करून लढवली होती. त्यात त्यांनी पाच जागा जिंकल्या होत्या.