तवांगप्रश्‍नी भारताला अमेरिकेचा पाठिंबा

0
13

>> संसदेत पुन्हा गदारोळ, विरोधकांनी केला सभात्याग

तवांग सेक्टरमध्ये झालेल्या संघर्षाबाबत भारताला अमेरिकेने पाठिंबा व्यक्त केला आहे. भारताने युक्रेनच्या मुद्द्यावर रशियावर टीका करण्यास नकार दिला होता. तरीही अमेरिकेने भारताला पाठिंबा व्यक्त केला असल्यामुळे तो महत्त्वाचा मानला जात आहे.

दोन्ही देश संघर्षापासून त्वरित दूर झाल्याचे पाहून समाधान वाटत असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागाने, आम्ही आमच्या मित्रदेशांची सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या आमच्या वचनबद्धतेवर ठाम आहोत. भारताच्या परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याच्या प्रयत्नांना आमचा पूर्ण पाठिंबा असल्याचे म्हटले आहे.

संसदेत विरोधकांचा सभात्याग
अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीच्या मुद्द्यावरून बुधवारी लोकसभेत कॉंग्रेस आणि तृणमूल कॉंग्रेसच्या खासदारांनी सभात्याग केला. यावेळी संसदेत या प्रश्‍नावरून मोठा गदारोळ झाला. कॉंग्रेसच्या माजी अध्यक्ष आणि खासदार सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसच्या खासदारांनी सभात्याग केला. त्यासोबत तृणमूल कॉंग्रेसच्याही खासदारांनी सभात्याग केला. भारत-चीन सीमा मुद्द्यावर चर्चेची मागणी विरोधक करत होते.

कॉंग्रेसचे अधीर रंजन चौधरी यांनी, आम्ही भारत-चीन सीमा परिस्थितीवर चर्चेची मागणी करत असल्याचे सांगितले. यावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी, व्यवसाय सल्लागार समितीच्या बैठकीत यावर निर्णय घेतला जाईल असे सांगितले. मात्र सभागृहाचे कामकाज सुरू होताच, कॉंग्रेस आणि टीएमसीने निषेधार्थ सभात्याग केला आणि भारत-चीन सीमा मुद्द्यावर चर्चा होऊ न दिल्याचा सरकारवर आरोप केला. टीएमसी खासदार सुदीप बंदोपाध्याय यांनीही सभागृहात चर्चेची मागणी केली आणि म्हणाले की, त्यांच्या पक्षाचे सदस्य सरकारच्या वृत्तीच्या निषेधार्थ सभात्याग करत आहेत.

दरम्यान, मंगळवारीही विरोधी पक्षांच्या खासदारांनी विविध मुद्द्यांच्या निषेधार्थ लोकसभेतून सभात्याग केला होता. सभागृहाचे कामकाज सुरू होताच कॉंग्रेस आणि द्रमुकच्या खासदारांना काही मुद्दे उपस्थित करायचे होते. प्रश्‍नोत्तराच्या तासाला कॉंग्रेस, द्रमुक, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्ससह अन्य पक्षांच्या खासदारांनी प्रश्नोत्तराच्या तासात सभात्याग केला.

६००चिनी सैनिकांशी चकमक
‘चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी’चे सैनिक आणि भारतीय जवानांमध्ये चकमक झडल्याच्या वृत्ताला संरक्षण दलातील अधिकार्‍याने दुजोरा दिला आहे. चकमकीत भारतीय जवानांपेक्षा चीनचे सैनिकच अधिक जखमी झाले आहेत, असा दावा या अधिकार्‍याने केला आहे. भारतीय जवानांची ६०० चिनी सैनिकांशी चकमक झाली, असे सूत्रांनी सांगितले. चकमकीत काही भारतीय जवानांच्या हाता-पायांना गंभीर जखमा झाल्या असून त्यांच्यावर गुवाहाटी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

चिनी सैनिक आणि भारतीय जवानांमधील पूर्व लडाखमध्ये २०२०मध्ये झालेल्या चकमकीपूर्वी, चिनी तळ प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून खूप दूर होते. परंतु त्यानंतर मात्र चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या जवळ सरकण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आहे. गेल्या काही वर्षांत चीनने पश्चिम क्षेत्रात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचा भंग करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र पूर्व आणि मध्य क्षेत्रांमध्ये चीनच्या हालचाली वाढत असल्याचे अधिकार्‍यांनी याआधी सांगितले होते. भारत आणि चीनमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषा पश्चिम (लडाख), मध्य (हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड), सिक्कीम आणि पूर्व (अरुणाचल प्रदेश) क्षेत्रात विभागली गेली आहे.

गलवान नंतरची पहिलीच घटना
लडाखच्या गलवान खोर्‍यात १५ जून २०२० रोजी चिनी सैनिकांशी झालेल्या संघर्षांत २० भारतीय जवान शहीद झाले होते. त्यानंतरची अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे. भारत आणि चीन यांच्यात आतापर्यंत लष्करी पातळीवर द्विपक्षीय चर्चेच्या अनेक फेर्‍या झाल्या आहेत.

चीनला धडा शिकवा
अजमेर दर्गाच्या प्रमुख झैनुल अबदिन अली खान यांनी तवांगमधील संघर्षप्रकरणी भारताने चीनला बालाकोटप्रमाणे धडा शिकवावा, असे आवाहन केले आहे. खान यांनी चीनचा नेहमीचा त्रास टाळण्यासाठी थेट पाकिस्तानमधील बालाकोट येथे केलेल्या हवाई हल्लाप्रमाणे चीनवरही हल्ला करण्याचा सल्ला दिला.

  • अजमेर दर्गा प्रमुख