- – सिद्धेश्वर सा. नाईक,
मुळगाव
आश्चर्यच आहे नाही का! सांगली, मिरज, महाराष्ट्राचा कानाकोपरा, गोवा, राजस्थान, अंदमान अशा ठिकाणी विखुरलेले आम्ही सगळे… गेली तीस वर्षे ना कुणाचा कुणाला थांगपत्ता, आणि आता तीस वर्षांनी सगळेजण एकत्र भेटणार आहोत!
आश्चर्यच आहे नाही का! सांगली, मिरज, महाराष्ट्राचा कानाकोपरा, गोवा, राजस्थान, अंदमानला विखुरलेले आम्ही सगळे. गेली तीस वर्षे ना कुणाचा कुणाला थांगपत्ता, आणि आता तीस वर्षांनी सगळेजण एकत्र भेटणार आहोत!
त्यावेळी आम्ही अंबाबाई तालीम संस्था, बी. पी. एड्. कॉलेज, मिरजमध्ये शिकत होतो. कॉलेजचे ते दिवस! बरेच जण आपले गाव-घर सोडून एका वेगळ्या राज्यात आपल्या भावी आयुष्याच्या सुवर्णकाळाची स्वप्ने उराशी बाळगून शिक्षणाचा पुढील टप्पा गाठत होतो.
कॉलेजमधल्या मुला-मुलींचा तोच उत्साह, मौज-मस्ती, धिंगाणा, सहल, शिबीर… आणि शारीरिक शिक्षण म्हटले की खेळ, धावपळ, स्पर्धा आणि बरेच काही आले. कॉलेजात जसे वेगवेगळ्या शैलीचे, नावाजलेले, चित्रकार, हिरो, चॉकलेट हिरो, मॉडेल्स, उत्कृष्ट खेळाडू असतात तसेच इथे पण, सहज आकर्षित करणारे संजय हीरेकर, अविनाश धस, राजू कदम, अर्जुन पाटील, मोहन शिरसागर, चारुदत्त जगताप, अजय, मुन्ना तसेच माया सिंदगी, प्रीती गौतम, वसुधा साळुंखे, रोहिणी काकडे सुपेकर, छायल ईदाते व बरेच जण आज पण हुबेहूब तसेच आठवतात. हरेकाने आपापल्या कलागुणांना वाव देत आपापल्या क्षेत्रात नावलौकिक मिळवत त्या कॉलेजच्या एका वर्षाचा पूर्ण आनंद घेतला होता. प्रत्येकाचा सहभाग एकमेकांना बरेच काही सांगून गेला. एक वर्ष कसे सरले ते समजलेच नाही.
आम्हा सगळ्यांमध्ये एकच उत्साहाचे वातावरण होते. त्यावेळचे आमचे वर्गमित्र श्री. रमेश तवडकर आज गोवा विधानसभेचे सभापती आहेत. तवडकर आणि मिरज कॉलेजच्या प्राध्यापक वर्गाच्या प्रयत्नाने आम्ही सगळे तीस वर्षांनी पुन्हा गोव्यात भेटणार आहोत.
हो. सगळ्यांच्या कानी ही बातमी पडली. सर्व मित्रमैत्रिणींमध्ये तोच उत्साह अन् आतुरता निर्माण झाली. आणि उत्कंठा वाढत गेली… व्हॉटस् ऍप ग्रुप झालाच होता, त्यात उरलेल्यांचा शोध घेऊन जोडण्याचे काम सुरू झाले. प्राध्यापकांनी सर्व नव्वद जणांची नामावली काढून ग्रुपवर टाकलीच होती. चार-पाच दिवस फोनाफोनी चालू होती, फेसबुक किंवा इतर माध्यमांतून शोध घेणे सुरू झाले. लग्नानंतर नाव बदलून गेलेल्या वर्गमैत्रिणींचा शोध घेणे बरेच कठीण गेले.
हां… एकत्रीकरणाचे पक्के झाले २८ आणि २९ मे २०२२. स्थळ सभापती श्री. रमेश तवडकर यांची बलराम शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्था, आमोणे, काणकोण. बलराम शिक्षण संस्था आणि आजूबाजूचा परिसर सजू लागला. बॅनर्स, सजावट, स्वच्छता…
प्रवास सुरू झाल्याच्या खुणा दिसू लागल्या. कार, बस, रेल्वे, विमान जसे जमेल तसे… २७ लाच एक-एका मित्राचे सहकुटुंब येणे सुरू झाले. स्वत: वर्गमित्र सभापती श्री. रमेश आणि सौ. सविता वहिनी सर्व मित्रांच्या स्वागतासाठी हजर होत्या. भेटून विचारपूस करीत होत्या.
सकाळी नाष्टा झाल्यावर स्वागत समारंभ झाला. चर्चा, गाठीभेटी, कार्यक्रम… आमच्या बॅचचे मानाचा तुरा ठरलेले गोवा विधानसभेचे सभापती श्री. तवडकर आणि त्यांच्या यशाची मानकरी सौ. सविता रमेश तवडकर यांचा प्राध्यापकांच्या हस्ते सत्कार करताना सर्वांचा आनंद गगनात मावेनासा झाला. अशी कोणी कल्पनाही केली नव्हती की आपल्यामध्ये खेळणारा, रोज बरोबर चहा-जेवण करणारा आमच्यापैकी एक गोवा विधानसभेच्या सभापतीपदी विराजमान होणार आणि आम्ही तीस वर्षांनी एकत्र भेटून आनंदोत्सव साजरा करणार! तीस वर्षांच्या अंतरामुळे सगळ्या गोष्टींना बरेच महत्त्व जाणवत होते.
कॉलेजचे प्राध्यापक श्री. निवृत्ती भैरत, श्री. अशोक काले, श्री. जनक टेकाले, श्री. वाटवे सर, श्री. झाडबुके सर, श्री. प्रकाश कावले सर तसेच यजमान वर्गमित्र श्री. दीपक आमोणकर, विलास पालकर, श्री. अनिल कामत व श्री. सिद्धेश्वर नाईक यांचा उत्साही वातावरणात सपत्नीक गौरव करण्यात आला.
सभापती श्री. रमेश तवडकर यांची आमचेच इतर दोन वर्गमित्र श्री. दीपक आमोणकर व सौ. वैशाली दीपक पाटील आमोणकर यांनी घेतलेली मुलाखत फारच रंगली. श्री. रमेश त्यावेळी एक चांगल्यापैकी फुटबॉल, कबड्डी व हाडाचे खो-खोपटू होते. इतर खेळांत पण त्यांनी प्रावीण्य मिळविले होते. आपल्या सुभाषचंद्र बोस संघाला खेळताना भल्याभल्यांना धूळ चारत संघाला विजयी केल्याचे बर्याच जणांनी यावेळी सुतोवाच केले. काणकोणपासून मिरज ते गोवा विधानसभेचे सभापतीपदापर्यंतची वाटचाल म्हणजे श्रम, त्याग आणि समाजकार्याची मिसाल वाखाणण्याजोगी होती हे मुलाखती दरम्यान समजले.
संध्याकाळच्या वेळी सर्व जमलेल्या सत्तावन्न मित्र-मैत्रिणींनी आपले मनोगत व्यक्त करताना कॉलेजमधले ऋणानुबंध आणि सुख-दु:खाचे क्षण कथन करताना कधी चार तास निघून गेले ते समजलेच नाही.
काणकोण दर्शन, समुद्रकिनारे, विधानभवन दर्शन इत्यादी करत करत दोन दिवस सगळ्यांनी एकमेकांशी मनसोक्त चर्चा केली. श्री. रमेश यांच्या बलराम शिक्षण संस्थेच्या उभ्या असलेल्या वास्तूकडे एक नजर फिरवून, एकमेकांना परत भेटण्याची इच्छा व्यक्त करत जड अंतःकरणाने वर्गमित्रांचा निरोप घेतला आणि आपल्या घरचा प्रवास सुरू केला.