‘विश्वकर्मा’च्या लाभार्थ्यांना ई-बाजार योजनेत सामावून घेणार

0
30

>> मुख्यमंत्र्यांची माहिती; दसऱ्याच्या मुहुर्तावर सरकारच्या ई-बाजार सेवेचा शुभारंभ

काल विजयादशमी अर्थात दसऱ्यानिमित्त पर्वरीतील मंत्रालयात आयोजित एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सरकारच्या ई-बाजार सेवेचा शुभारंभ करण्यात आला. केंद्र सरकारच्या विश्वकर्मा योजनेचा लाभ घेऊ पाहणाऱ्यांनाही या ई-बाजार योजनेत सहभागी करून घेण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. केंद्राच्या विश्वकर्मा योजनेखाली राज्यातील 18 प्रकारच्या पारंपरिक व्यावसायिकांना लाभ मिळणार आहे. या सर्वांना ह्या ई-बाजार सेवेत सहभागी करून घेण्यात येणार असल्याने हे व्यवसायिकही आपली उत्पादने भारतभरात विकू शकतील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
सरकारचा ई-बाजार 1 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे. त्यासाठीच्या साईट्स सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.

चतुर्थीच्या वेळी सरकारने केवळ चतुर्थीपुरता ई-बाजार सुरू केला होता. आणि हा ई-बाजार कायमस्वरूपी सुरू केला जात असून, तो यापुढे चालूच राहणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
ह्या ई-बाजार योजनेत सहभागी होण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण काही जणांना यापूर्वीच मिळालेले आहे. त्याशिवाय आता मोठ्या संख्येने जे लोक ह्या योजनेचा लाभ घेऊ इच्छित आहेत, त्यांना अन्न आणि औषध प्रशासनाकडून आवश्यक तो परवाना कसा मिळवावा, खाद्यपदार्थांचे पॅकेजिंग कसे करावे, यासह अन्य सर्व प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

खाद्य, कला संस्कृतीला चालना
महिला स्वयंसेवा संस्था, तसेच वैयक्तिकरित्या महिलांना व पुरुषांनाही या ई-बाजार सेवेत सहभागी करून घेतले जाणार आहे. ह्या ई-बाजार सेेवेमुळे राज्यातील खाद्य संस्कृती व कला संस्कृती यांना मोठी चालना मिळणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

5 दिवसांचे प्रशिक्षण अन्‌‍ 1 लाखाचे कर्ज
या योजनेत सहभागी होणाऱ्या व्यावसायिकांना सरकार 5 दिवसांचे आवश्यक ते प्रशिक्षण देईल. नंतर त्यांना अगदी माफक व्याजदरात 1 लाख रुपयांचे कर्ज सरकार देईल. हे कर्ज घेऊन व्यवसाय सुरू केल्यानंतर घेतलेले कर्ज एकदा फेडले की त्यांना नंतर आणखी 2 लाख रुपयांचे कर्ज मिळू शकेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.