…तर रेंट अ बाईक, कारच्या मालकांवरही कडक कारवाई

0
37

>> मुख्यमंत्र्यांचा इशारा; पर्यटकांकडून होणाऱ्या वाढत्या अपघातांची दखल

बेशिस्तपणे वाहने हाकली जात असल्याने राज्यात रस्ता अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. रेंट अ बाईक, रेंट अ कार भाडेपट्टीवर घेऊन चालविणाऱ्या अनेक पर्यटकांकडून वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. यापुढे रेंट अ कार किंवा बाईकच्या अपघातात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्या वाहनचालकाबरोबर भाडेपट्टीवर वाहन देणाऱ्या मालकावरही कडक कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कदंब वाहतूक महामंडळाच्या 43 व्या वर्धापनदिन सोहळ्यानिमित्त पणजी बसस्थानकावर आयोजित कार्यक्रमात बोलताना काल दिला.

राज्यात रेंट अ कार, बाईक वाहने भाडेपट्टीवर घेऊन चालवणाऱ्या बऱ्याच पर्यटकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन केले जात आहे. वाहने बेशिस्तपणे चालविली जातात. पर्यटकांच्या नियम उल्लंघनाचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. काही वेळी वाहन भाडेपट्टीवर घेतलेली व्यक्ती बेशिस्त वर्तन करून पलायन करतात. काही जणांकडे वाहन चालवण्याचा परवानाही नसतो. मात्र वाहने भाडेपट्टीवर देणाऱ्या वाहनमालकांकडून योग्य कागदपत्रे न घेताच वाहने भाडेपट्टीवर दिली जातात, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले.

पर्यटकांच्या बेशिस्त वाहन चालविण्याच्या प्रकारांना वाहनमालक तेवढेच जबाबदार आहेत. यापुढे वाहतुकीतील बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही. वाहन भाडेपट्टीवर घेतलेल्या वाहनचालकांकडून एखादा जीवघेणा अपघात झाल्यास त्या वाहनचालकाबरोबर वाहनमालकांवर कायदेशीर कारवाईचा विचार केला जात आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तसेच राज्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर वाहतूक खाते आणि वाहतूक पोलिसांकडून कडक कारवाई केली जात आहे, असेही ते म्हणाले.
राज्य सरकारकडून कदंब महामंडळ फायद्यात आणण्यासाठी सर्व प्रकारे प्रयत्न करीत आहे. त्यात कदंब महामंडळाचे वाहक, चालक व इतर कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. कदंब महामंडळ हे सेवा देणारे महामंडळ आहे. योग्य प्रकारे कामकाज केल्यास तोट्यातील महामंडळ नफ्यात आणले जाऊ शकते. राज्यातील वाहतुकीत सुधारणा घडवून आणण्यासाठी माझी बस योजना राबविली जात आहे. या योजनेतील बसगाड्यांवर कदंबाचे वाहक नियुक्त करण्यावर विचार केला जात आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
कदंब महामंडळाकडे सुमारे 200 बसगाड्यांची कमतरता आहे. चांगले उत्पन्न मिळणाऱ्या आंतरराज्य प्रवासी मार्गावर त्यामुळे कमी बसगाड्या चालवाव्या लागतात. नवीन 200 बसगाड्या खरेदीसाठी मुख्यमंत्र्यांचे सहकार्य आवश्यक आहे. कदंब महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाच्या पगारातील फरकाच्या रकमेच्या प्रश्नावर तोडगा काढावा, अशी मागणी उल्हास तुयेकर यांनी केली.
या कार्यक्रमाला वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो, कदंब महामंडळाचे अध्यक्ष तथा आमदार उल्हास नाईक तुयेकर, वाहतूक खात्याचे संचालक राजन सातर्डेकर, कदंबाचे व्यवस्थापकीय संचालक डेरिक नेटो व इतरांची उपस्थिती होती.

तिजोरी भरण्यासाठी दंडात्मक कारवाई नाही
राज्यातील रस्त्यांची स्थिती चांगली असल्याने भरधाव वाहने हाकली जातात. भरधाव, बेशिस्त आणि मद्याच्या नशेतील वाहतुकीमुळे रस्ता अपघातांचे प्रमाण वाढले आहे. वाहतूक खाते आणि वाहतूक पोलिसांनी बेशिस्त वाहतुकीला आळा घालण्यासाठी दंडात्मक कारवाईची मोहीम तीव्र केली पाहिजे. बेशिस्त वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई केल्यास पोलीस, वाहतूक खात्याच्या अधिकाऱ्याकडून सतावणूक केली जात असल्याचा आरोप केला जातो; मात्र वाहतुकीत शिस्त आणण्यासाठी दंडात्मक कारवाई करणे आवश्यक आहे. सरकारची तिजोरी भरण्यासाठी दंडात्मक कारवाई केली जात नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.