…तर ‘रेंट-अ-कार’चा परवाना रद्द : वाहतूकमंत्री

0
0

>> 12 अपघातप्रवण क्षेत्रांची दुरुस्ती लवकरच हाती; अधिकाऱ्यांना निर्देश

एकच ‘रेंट-अ-कार’ दोन वेळा गंभीर अपघातास कारणीभूत ठरल्यास त्या कारचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी एका बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काल दिली. तसेच, आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राज्यातील 12 अपघातप्रवण क्षेत्रांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

राज्यातील वाढत्या वाहन अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूकमंत्र्यांनी वाहतूक, सार्वजनिक बांधकाम, जिल्हाधिकारी व इतर संबंधित खात्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक येथे काल घेतली. या बैठकीत राज्यात वाढते अपघात रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना हाती घेण्याचे निर्देश देण्यात आले.

सार्वजनिक बांधकाम खात्याला लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पहिल्या टप्प्यात 12 अपघातप्रवण क्षेत्रांची सुधारणा करण्याच्या कामाचे आदेश जारी करण्याचा निर्देश दिले आहेत. राज्यातील इतर 31 अपघातप्रवण क्षेत्रांच्या दुरुस्तीच्या कामाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची सूचनाही केली आहे, असे गुदिन्हो यांनी सांगितले.

राज्यात ‘रेंट-अ-कार’च्या बेशिस्तपणाला लगाम घातला जाणार आहे. एकाच रेंट अ कारने दोनदा गंभीर अपघात केल्यास त्या कारचा परवाना रद्द केला जाणार आहे. रेंट अ कारच्या मालकांकडून पडताळणी न करता कार भाड्याला दिल्या जात असून, वाहतूक नियमांचे उल्लंघन केले जात आहे. रेंट अ कारला स्पीड गव्हर्नर बसविण्यात आले की नाहीत? याची तपासणी करण्याची सूचना वाहतूक खात्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना करण्यात आली आहे, असेही गुदिन्हो यांनी सांगितले.

‘जीएमआर’कडून दबाव तंत्राचा वापर
जीएमआर या कंपनीकडून दाबोळी विमानतळावरील आंतरराष्ट्रीय विमानसेवा मोपा विमानतळाकडे वळविण्यासाठी दबाव तंत्राचा वापर केला जात आहे, असा आरोप माविन गुदिन्हो यांनी केला. दरम्यान, सोमवारीच कतार एअरवेजने जूनपासून मोपा विमानतळावरून सेवा देणार असल्याचे जाहीर केले होते.

91 ठिकाणी गती तपासणीसाठी कॅमेरे बसवणार
राज्यभरात 91 ठिकाणी वाहनांची गती तपासणीसाठी कॅमेरे बसविण्याची योजना आहे. सध्या दोनापावल ते बांबोळी या मार्गावर वाहनांची गती तपासणी करणारे कॅमेरे बसविण्यात आले आहेत, असेही वाहतूकमंत्र्यांनी सांगितले.