बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांच्या सुटकेसाठी अथक प्रयत्न सुरू
उत्तराखंडच्या उत्तरकाशीतील सिल्क्यारा बोगद्यात 41 मजूर अडकल्याच्या घटनेला काल 11 वा दिवस पूर्ण झाले; मात्र अद्याप त्यांना बाहेर काढण्यात यश आलेले नाही. बचाव कार्याची सर्वात मोठी आशा आता ऑगर मशीन आहे. बुधवारी ऑगर मशीनचे ड्रिलिंग यशस्वी झाले. ऑगर मशीनसमोर कोणताही अडथळा नव्हता. आत्तापर्यंत ऑगर मशिनद्वारे 27 मीटर खोदकाम करण्यात आले असून, बोगद्यात 800 मिलमीटर पाईप टाकण्यात आले आहेत. ऑगर मशीनसमोर कोणताही अडथळा आला नाही, तर बचाव कार्य 2-3 दिवसांत पूर्ण होऊ शकते, असे बचावकार्यात गुंतलेल्या तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
दिवाळीच्या दिवशीच म्हणजे 12 नोव्हेंबरला पहाटे 4 वाजता हा अपघात झाला होता. बोगद्याच्या प्रवेश बिंदूच्या 200 मीटरच्या आत 60 मीटर माती खचली आणि 41 मजूर आत अडकले. बचाव कार्यादरम्यान बोगद्यातून आणखी दगड पडले आणि त्यामुळे ढिगारा एकूण 70 मीटरपर्यंत पसरला. बोगद्यात अडकलेले मजूर बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशातील आहेत.
सोमवार-मंगळवारच्या मध्यरात्री येथे खोदकाम करण्यात आले. त्याचवेळी आत अडकलेल्या कामगारांनी मिठाची मागणी केली होती. ऑगर मशीनने ड्रिलिंग करण्याव्यतिरिक्त इतर बचाव योजनांवरही काम केले जात आहे.
ओडिशा आणि गुजरातमधून येणारी व्हर्टिकल ड्रिलिंग मशिनही गुरुवारी येण्याची अपेक्षा आहे. बोगद्याच्या बाजूने रस्ताही तयार केला जात आहे. यासाठी 10-12 दिवस लागण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर दांदलगाव बाजूकडून छोटे-मोठे स्फोट करून खोदकाम केले जात आहे. मात्र, येथून बोगदा तयार करण्यासाठी 30 ते 35 दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.