…तर परदेशातून प्रशिक्षक आणणे कठीण

0
125

>> सिंधूने व्यक्त केले मत

कोरोना महामारी नियंत्रणात न आल्यास खेळाडूंना भविष्यात मोठा फटका बसू शकतो. ही महामारी कायम राहिली तर परदेशातून प्रशिक्षक आणणे कठीण होऊ शकते, असे मत भारताची स्टार महिला शटलर तथा जागतिक अजिंक्यपद स्पर्धा विजेती बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हिने व्यक्त केले.

ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या सिंधूने भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या नव्याने नियुक्त केलेल्या सहायक संचालकांशी ऑनलाईन सत्राद्वारे संवाद साधताना वरील मत व्यक्त केले.

भारतात आंतरराष्ट्रीय स्तरावर बरेच चांगले खेळाडू खेळलेले आहेत. परंतु कोविड-१९नंतर परदेशी प्रशिक्षकांना नोकरी देणे मिळणे कठीण होईल. त्यामुळे भारताच्या माजी आंतरराष्ट्रीय खेळाडूंना पुढे जाण्याची संधी कमीच असेल, असे सिंधूने सांगितले.

सिंधूने चॅम्पियन खेळाडू तयार करण्यासाठी सिंधूने पालक, प्रशिक्षक, प्रशासक यांचे असलेले महत्त्व यावर भर दिला. प्रशासकांना प्रत्येक खेळाडूचा प्रवास माहीत असणे अत्यावश्यक आहे. भारतीय खेळांचे भविष्य आपल्या सर्वांप्रमाणेच क्रीडा प्रशासनाच्या हाती असल्याचे सिंधूने सांगितले. प्रशासकांनी भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या सर्व विभागीय केंद्राना भेट देऊन खेळाडूंकडून त्यांच्या कामगिरीबद्दल माहिती करून घेतली पाहिजे. त्याच बरोबर त्यांच्या पालकांशी संपर्क साधणे आवश्यक आहे. पालकांचा सहभाग खूप महत्त्वपूर्ण आहे आणि आपल्याला त्यांच्याकडून अभिप्राय घेण्याची आवश्यकता आहे, असे सिंधूने सांगितले.