तबलिगी कार्यक्रम; ९ जण आरोग्य खात्याच्या ताब्यात

0
149

गोवा पोलिसांनी नवी दिल्लीतील  धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या गोव्यातील नागरिकांचा शोध घेण्याचे काम हाती घेतले आहे. आत्तापर्यत ९ जणांनी या कार्यक्रमात सहभाग घेतल्याचे आढळून आले आहे. त्या नऊ जणांना आरोग्य खात्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे. त्यांना कोविड१९ ची बाधा अजूनपर्यंत झालेली नसल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

या सहभागींनी आरोग्य खात्याच्या ०८३२-२२२५५३८ किंवा २४११८१० या दूरध्वनी क्रमांकावर अथवा १०४ या मदत वाहिनीवर संपर्क साधावा असे आवाहन खात्याचे संचालक डॉ. जुझे डिसा यांनी केले आहे.

दरम्यान, निजामुद्दीन येथील संमेलनानंतर कोवीड-१९ची लागण झालेल्या देशातील तबलीग जमात कार्यकर्त्यांचा शोध घेऊन त्यांना अलगीकरण व विलगीकरणात ठेवण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचे काल केंद्र सरकारने एका पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

संपर्क साधण्याचे आवाहन

निजामुद्दीनमधील तबलिगी जमातच्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या गोव्यातील व्यक्तींनी आरोग्य खात्याशी त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन आरोग्य खात्याचे संचालक जुझे डिसा यांनी काल केले. या  कार्यक्रमात सहभागी झालेल्या अनेकांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. या पार्श्‍वभूमीवर आरोग्य खात्याने एक पत्रक जारी करून या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या गोव्यातील व्यक्तीनी स्वतःचे आणि राज्यातील सार्वजनिक आरोग्य हितासाठी त्वरित आरोग्य खात्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

नवी दिल्ली येथील निजामुद्दीनमधील तबलिगी जमातच्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या गोव्यातील व्यक्तींबाबत माहिती गोळा करण्याची सूचना सर्व पोलीस स्थानकांच्या पोलीस निरीक्षकांना करण्यात आली आहे. दरम्यान, केंद्र सरकारने गोवा सरकारशी चर्चा करून गोव्यातून नवी दिल्लीतील कार्यक्रमात सहभागी झालेल्या व्यक्तींबाबत माहिती मिळविण्याची सूचना केली आहे.

डिचोलीतून चारजण ताब्यात

दिल्ली येथील निजामुद्दीन सोहळ्यास गेलेल्या मुस्लिम वाडा डिचोली येथील ३ व गावकारवाडा येथील १ अशा चौघांना काल डिचोलीतून ताब्यात घेण्यात आले. त्यांना मये येथे विशेष देखरेखीखाली ठेवण्यात आल्याची माहिती डिचोली पोलीस निरीक्षक संजय दळवी यांनी दिली. दिल्ली येथील सोहळ्यास हे चौघे सहभागी झाले होते. अद्याप ते पॉझिटीव्ह आहेत की निगेटिव्ह या बाबत अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान या चार कुटुंबातील १७ जणांना काल तातडीने शोधून त्यांना घरातच राहण्याचा आदेश आरोग्य खात्याने जारी केला. त्यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर अधिक माहिती पुढे येणार आहे.