तपासणीनंतरच ट्रॉलर्सना समुद्रात मासेमारीसाठी मिळणार परवानगी

0
18

>> एलईडी फिशिंगच्या पार्श्‍वभूमीवर निर्णय

समुद्रात मच्छिमारीसाठी जाणार्‍या प्रत्येक ट्रॉलरची यापुढे तपासणी करण्यात येणार असून, तपासणीनंतर त्यांना पास देण्यात येईल. हा पास दिल्यानंतरच या ट्रॉलर्सना मच्छिमारीसाठी समुद्रात जाता येईल, असे मत्स्योद्योगमंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी काल स्पष्ट केले.

मच्छिमारी ट्रॉलर्सची तपासणी केल्याशिवाय त्यांना समुद्रात जाऊ देऊ नये, असा उच्च न्यायालयाचा आदेश आहे. दोन दिवसांपूर्वी मालीम जेटीवरील एका ट्रॉलरमध्ये एलईडी दिवे सापडले. एलईडी दिव्यांद्वारे मासेमारी करण्यावर बंदी असतानाही ते नेण्यात येत होते; मात्र कारवाई करत ते जप्त करण्यात आल्याचे हळर्णकर यांनी सांगितले. आता कोणत्याही ट्रॉलरची तपासणी झाल्याशिवाय त्यांना मासेमारीसाठी समुद्रात जाता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.