आम्ही तैवानच्या लोकशाहीचे समर्थक

0
22

>> नॅन्सी पेलोसी नाव न घेता चीनला इशारा

अमेरिकन संसदेच्या अध्यक्षा अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांनी त्यांच्या तैवान भेटीदरम्यान राष्ट्राध्यक्ष त्साई इंग-वेन आणि इतर खासदारांची भेट घेतली. या बैठकीपूर्वी पेलोसींनी तैवानच्या संसदेला संबोधित केले. तसेच त्यांनी चीनला नाव न घेता इशारा दिला. कितीही विरोध होऊ द्या, आम्ही थांबणार नाही. आम्ही तैवानच्या लोकांसोबत आहोत. आम्ही तैवानच्या लोकशाहीचे समर्थक आहोत, असे त्या म्हणाल्या. दरम्यान, या भेटीनंतर नॅन्सी पेलोसी दक्षिण कोरियाकडे रवाना झाल्या आहेत.

चीनचा इशारा धुडकावून लावत नॅन्सी पेलोसी मंगळवारी रात्री उशिरा तैवानमध्ये दाखल झाल्या होत्या. पेलोसी यांनी तैवानच्या संसदेत सांगितले की, जगातील सर्वात स्वतंत्र समाजांपैकी एक म्हणून आम्ही तैवानचे कौतुक करतो. तैवानने कोरोनाविरुद्धच्या लढाईत एक आदर्श ठेवला आहे. त्याच वेळी, तैवान-अमेरिका मैत्रीचा आम्हा सर्वांना अभिमान आहे. अमेरिकेला तैवानमध्ये शांतता हवी आहे. आम्हाला तैवानसोबत देवाणघेवाण वाढवायची आहे, असे पेलोसी म्हणाल्या.

पेलोसी यांच्या तैवान भेटीवरून चीन चांगलाच संतापला आहे. आम्ही अमेरिकेच्या कोणत्याही चिथावणीला तोंड देण्यासाठी तयार आहोत आणि आमच्या प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्यास सक्षम आहोत, असा इशारा चीनने दिला आहे.