तनामनात चैत्रपालवी

0
35
  • डॉ. सोमनाथ कोमरपंत

सहस्रावधी वर्षे लोटली. गतिमान कालचक्रानुसार जीवनशैली बदलत गेली. निसर्गसृष्टीवर, पर्यावरणावर बऱ्याच प्रमाणात आघात झाले; तरीदेखील अभिजात सौंदर्याचे नित्यनूतन उन्मेष येथील निसर्गाने प्रकट केले आहेत.

सृष्टीमध्ये ऋतुमानानुसार दिसून येणारे रंगविभ्रम डोळ्यांना आल्हाद देतात. तनामनाला सुख देतात. षड्रसांची नांदी ही नित्यनेमानं चाललेली असते. आपण मुक्त मनानं आणि उघड्या डोळ्यांनी तिच्या अंतरंगाचा आस्वाद घ्यायला हवा. फाल्गुन संपतो. चैत्र सुरू होतो. सृष्टीतील हा लावण्यमहोत्सव असतो. ‘चैत्र हा खरा वसंतात्मा आहे, मधुमास आहे, ऋतुराज वसंताचं स्पंदन पावणारं हृदय आहे’, असं दुर्गाबाई भागवतांनी ‘ऋतुचक्र’मध्ये म्हटलेलं आहे. खरं आहे ते. पण आपल्या भारतातील प्रत्येक ऋतू हा बहारीचाच असतो. शिशिरात पानगळ होते खरी; पण काही वृक्षांच्या, झाडांच्या बाबतीतच ते खरं असतं. सरत्या शिशिरातदेखील फुलून येणारे, बहरून येणारे वृक्ष, वनराजी असतातच की! भावी कालातील सृजनाचं दृढ आश्वासन घेऊन तो येतो. वसंतागमनाची वर्दी देतो. या संधिकालातील सृष्टीचं गुणवैभव किती वर्णावं? रूप-रस-गंधादी संवेदनांनी भारून टाकणारं हे विश्व अनुभवताना डोळ्यांचं पारणं फिटतं. त्याचं प्रतीकात्म रूप म्हणजे होलिकोत्सव.
चैत्र ही संज्ञा चेतोहारी… चैतन्यमय… पौर्णिमेच्या सुमारास चंद्र चित्रा नक्षत्रात असल्यामुळे चैत्र हे नाव दिले असावे असे तज्ज्ञ सांगतात. चैत्र शुद्ध प्रतिपदा हा शालिवाहन शकाचा वर्षारंभ… वसंत ऋतूचाही हा प्रारंभ… चैत्र हे नाव घेताच त्याच्याशी निगडित असलेल्या चैत्रमास, चैत्रावली, चैत्रांगण, चैत्रगौर आणि चैत्रपुनव या संज्ञा फेर धरून नाचायला लागतात. आनंदोर्मी उचंबळून येतात… रानावनांतील ‘उक्शी’च्या गेंदेदार फुलांप्रमाणे… उक्शीचा उत्सव हे वसंतोत्सवाच्या शुभागमनाचं प्रतीकात्म चिन्ह आहे. त्या फुलांच्या रंगात अभिजातता आहे, मार्दव आहे… उक्शी ही उर्वशीच जणू!

चैत्रमासाविषयी कविजनांना ममत्व वाटते. या चैत्रालीच्या उत्सवात ते मनानं समरस होतात. बाकीबाब बोरकर यांनी आपल्या एका कवितासंग्रहाला ‘चैत्रपुनव’ हे नाव देऊन ते चिरस्मरणीय करून ठेवलंय… ऋतुराज वसंताचं वर्णन करताना ज्ञानदेव म्हणतात ः
जैसे ऋतुपतीचें द्वार। वनश्री निरंतर
वोगळे फळभार। लावण्येंसी॥
कविकुलगुरू कालिदासानं भारतवर्षातील ऋतुवैभवाचं वर्णन करणारं ‘ऋतुसंहार’ हे अप्रतिम काव्य लिहिलं. ही गुंफण किती कलात्म आहे? किती रसमधुर आहे? याचा आस्वाद मुळातून घ्यायला हवा. ग्रीष्मवर्णनानं सुरुवात करून त्याची परिणती त्यानं वसंतऋतुवर्णनात केलीय.
सहाव्या सर्गाच्या शेवटी तो म्हणतो ः
मलयपवनविद्धः कोकिलालापरम्यः
सुरभि-मधुनिषेकाल्लब्धगन्धप्रबन्धः।
विविधमधुपयूथैर्‌‍ वेष्ट्यमानः समन्ताद्भवतु
तव वसन्तः श्रेष्ठकालः सुखाय॥
कालिदासाला भारतीय भूमीच्या विविधतेने विनटलेल्या सौंदर्याचं भान होतं… सांस्कृतिक संचिताचं भान होतं. निर्मितिशील प्रतिभावंत हा द्रष्टा असतो. भूत-वर्तमान-भविष्य यांच्यातील सीमारेषा पुसून टाकून अक्षय शब्दशिल्प तो निर्माण करतो. सहस्रावधी वर्षे लोटली. गतिमान कालचक्रानुसार जीवनशैली बदलत गेली. निसर्गसृष्टीवर, पर्यावरणावर बऱ्याच प्रमाणात आघात झाले; तरीदेखील अभिजात सौंदर्याचे नित्यनूतन उन्मेष येथील निसर्गाने प्रकट केले आहेत. महाकाव्याचे सर्ग त्याच्यावर रचले जावेत अशी ही सस्यश्यामला भूमी आहे.
भारतभूमीचं हे आगळं-वेगळं गुणवैशिष्ट्य कोणकोणत्या घटकांमुळे निर्माण झालेलं आहे?
भारतभूमी हे एक द्वीपकल्प… तिची भू-सीमा 15,200 किलोमीटर असून सागरी सीमा सुमारे 6,100 किलोमीटर आहे. हिच्या पश्चिमेस अरबी समुद्र, पूर्वेस बंगालचा उपसागर व दक्षिणेस हिंदी महासागर आहे. कर्कवृत्त (23.5 अंश उत्तर) आपल्या देशाच्या मध्यातून जाते. 82.5 अंश पूर्व हे रेखावृत्त देशाच्या जवळजवळ मध्यातून जाते. आशियाच्या या उपखंडात विविध प्रकारची भूवैशिष्ट्ये अनुभवायला मिळतात. उत्तरेकडे पर्वतीय प्रदेश आहे. काश्मीर हा निसर्गसमृद्ध, नयनमनोहर प्रदेश आहे. उत्तर भारतात मैदानी प्रदेश, राजस्थानात वालुकामय प्रदेश, पूर्व-पश्चिम सागरकिनारी मैदानी प्रदेश. मैदानी प्रदेशांत नद्यांनी निर्माण केलेले त्रिभुज प्रदेश. नर्मदा नदीच्या उत्तरेकडे पठारी प्रदेश आहेत. नर्मदेच्या दक्षिणेकडील भागात सह्याद्रीच्या रांगा, सातपुडा पर्वत, पूर्वघाट, निलगिरी पर्वत, बैतूलचं पठार, दख्खनचं पठार, तेलंगण पठार व म्हैसूरचं पठार. तसेच गंगा, यमुना, सिंधू, नर्मदा, तापी, ब्रह्मपुत्रा, झेलम, चिनाब, रावी, सतलज, बियास (व्यास), कृष्णा, कावेरी, तुंगभद्रा आणि गोदावरी व त्यांच्या असंख्य उपनद्या यांनी मिळून भारतीय भूमीला विपुल प्रमाणात जलस्रोत पुरविले आहेत. शेतजमीन, वन, पर्जन्यमान, हवामान आणि भूस्वरूप इत्यादी बाबतीत अनुकूलता लाभली तर नैसर्गिक साधनसंपत्तीत भर पडते. भारतीय भूमीचे अक्षांश-रेखांश आणि पर्यावरणीय संदर्भ ध्यानात घेतले तर तिची समृद्धी उमजून येईल. ‘दुर्लभं भारते जन्म।’ असे म्हणतात ते यासाठीच. शिवाय समृद्ध शुभसंचिताची जोड या भूमीला मिळालेली आहेच.

व्यास, वाल्मिकी, कालिदास आणि त्या परंपरेतील प्रज्ञावंत व प्रतिभावंत या संचिताचे महान भाष्यकार आहेत. कालिदासाने तर हिमालयाची महत्ता वर्णन करीत असताना नैसर्गिक संपदेबरोबरच तेथे अस्तित्वात असलेल्या वनौषधींचाही आवर्जून उल्लेख केलेला आहे. प्रतिभावंताची सर्वंकष दृष्टी आणि सम्यक जीवनांगांचा विचार म्हणतात तो हाच!


ऋतुचक्राच्या संदर्भात भारतीय जीवनसंचिताचा विचार करताना आपण प्रत्यही अनुभवत असलेल्या गोमंतप्रदेशाला विसरून कसे चालेल? गोमंतकाच्या सृष्टिवैभवाचा अनेकांनी रसिकतेनं गुणगौरव केलेला आहे. गतिमान काळात ऱ्हस्व दृष्टीच्या सर्व संहारक शक्तींनी डोकं वर काढल्यामुळं या स्वप्नकळेचं अनुपम सौंदर्य लाभलेल्या भूमीवर सर्वतोपरी प्रहार होत आहेत. बोरकर-कारे यांच्या कवितेत वर्णन केलेला गोमंतक आज राहिलेला नाही. शेतजमीन उजाड झालेली आहे. डोंगर उजाड झालेले आहेत. किनारे आपले राहिलेले नाहीत. वृक्षसंहार मोठ्या प्रमाणावर होत आहे.


पण वसंतागमाच्या या पर्वणीच्या कालात निसर्गाच्या कुशीत भ्रमंती करणे हा एक आनंदानुभव आहे. मांडवी-जुवारीची जलपात्रं जोपर्यंत तुडुंब तृप्तीने वाहत राहतील तोपर्यंत येथील सृष्टिसौंदर्याला झळ पोचणार नाही. सर्वत्र बहरलेले आम्रवृक्ष, काजूची झाडे, लेकुरवाळे फणस, कोकमवृक्ष, अननसाच्या बागा आणि कर्दळीबने ही गोमंतकाची शान आहेत. कुळागरातील नारळी-पोफळी आणि तेथील विविधांगी वृक्षवैभव अजूनही नेत्रांना आल्हाद देणारे आहे. सत्तरीच्या वनप्रदेशातील सागवान, मार्ट, किनळ, नाणा, कोसंब, सप्तपर्णी, अर्जुन, शिडम, अशोक, पांगारा, शाल्मली आणि घोटिंग हे भव्य वृक्ष आकाशाशी हृदयसंवाद करताना दिसतात. वाढत्या शहरीकरणामुळे अलीकडे मुक्त मोकळं आकाश अनुभवणं हे दुरापास्त झालेलं आहे. या पार्श्वभूमीवर महादईच्या काठाकाठाने परिक्रमा करीत असताना येथील वर्धिष्णू झाडांची पोपटी लालस पावली पाहणे, कोसंबाच्या झाडावरील किरमिजी पावली पाहणे ही अनिर्वचनीय आनंदाची अनुभूती आहे. ‘झाडांनी’ हा तृतीयान्त अनेकवचनी शब्दप्रयोग असलेला दुर्गम भूभाग वसंतागमाच्या काळात मित्रांसमवेत पाहायला मिळाला. चारं, चुन्ना, करवंदी आणि अन्य झुडपांनी व्यापलेला हा गर्द हिरवा प्रदेश… अनेक पक्ष्यांच्या मंजुळ रवानं, चिवचिवाटानं गजबजलेला, चैतन्यमय झालेला हा प्रदेश… वसंताचं वैभवलेणं अंगाखांद्यावर मिरवणारा हा प्रदेश… निसर्ग आणि माणूस यांचे जैविक नाते मनावर बिंबवणारा हा प्रदेश! याही दिवसांत सह्याद्रीच्या डोंगरकपारीत कष्टपूर्वक हिरवा पट्टा निर्माण करणाऱ्या शेतकऱ्यांच्या हातांची अभंग जिद्दही इथेच अनुभवायला मिळाली. महादईच्या कुशीत!