हरवलेली पणजी

0
12
  • शरत्चंद्र देशप्रभू

सत्तरी पार केलेल्या पिढीने त्यावेळची पणजी अनुभवली. लाल मातीचे रस्ते, बैलगाड्यांच्या चाकांचे आवाज, टांग्याच्या घोड्यांची टपटप… आम्ही राहत असलेल्या परिसरातील त्याकाळच्या महान व्यक्ती आज हयात नाहीत. गतिमान युगात त्यांच्या कार्याची दखल सोडाच, पण संदर्भ पण दिले जात नाहीत.

वर्तमानपत्रांचे आकर्षण अजून जुन्या पिढीत टिकून आहे. रविवारच्या पुरवण्या वाचनीय असतात; परंतु प्रासंगिक वाचनामुळे अन्‌‍ इतर व्यावहारिक व्यवधानांमुळे या पुरवण्या अन्‌‍ प्रमुख सदरे विलंबाने वाचली जातात. असाच एक रविवारचा ‘नवप्रभा’ वाचताना एका छोट्या बातमीने लक्ष वेधून घेतले. विष्णू रामचंद्र सावंत या रायबंदर येथील वृद्ध व्यक्तीचे देहावसान झाल्याचे वेचक शब्दात नमूद केले होते.

माझ्या दृष्टीने या बातमीला फार मोठे मूल्य होते. 1952 साली पणजीतील मध्यवर्ती जागेतील एका जुन्यापुराण्या घरात आमचे वास्तव्य होते. वरच्या मजल्यावर आमचे बिऱ्हाड, तर खाली विविध आस्थापने. त्यांतलीच एक ‘कार्पेंटरी’ सावंत बंधूंची. हे आमचे शेजारी. आम्ही मुले लहान. त्याकाळी चित्रपटाचे आकर्षण पण अफाट. यामुळे या तिन्ही सावंत बंधूंचे आम्ही राज- शम्मी- शशी कपूर असे नामकरण करून टाकले होते. कालांतराने शेवटचा भाऊ प्रभाकर यांचे साम्य शशी कपूरपेक्षा विश्वजित या नटाशी जुळत असल्यामुळे त्याचे पुनर्नामांतरण ‘विश्वजित’ असे दिनदिक्कत करून टाकले. या कार्पेंटरीच्या समोर आमच्यासारखेच एक दुमजली पिवळ्या रंगाचे घर होते. तळमजल्यावर पिंटो कुटुंबीयांचे वास्तव्य होते, तर माडीवर मोराईश कुटुंब. पिंटो कुटुंबीय म्हणजे नवरा-बायको, मध्यमवयीन बहीण अन्‌‍ मुले- सुझी, सविता, ज्यो, जेरी अन्‌‍ सँड्रा. माडीवर कोंकणीप्रेमी अंतोनियू मोराईश, त्यांचे वृद्ध वडील अन्‌‍ तीन बहिणी राहत. त्याकाळी आजच्यासारखे शेजाऱ्यांकडील संबंध औपचारिक नव्हते. संबंध घनिष्ठ नसले तरी आपुलकीचा ओलावा जाणवत होता. नजर भिडल्यावर एक-दोन मिनिटांचे संभाषण झाल्याशिवाय पाऊल पुढे पडत नसे. दोन्ही माड्यांमध्ये अंतर कमी अन्‌‍ वाहनांची वर्दळ पण कमी. यामुळे आमच्या खिडक्या अन्‌‍ मोराईश यांची फुलझाडांच्या कुंड्यांनी व्यापलेली गॅलरी, यामुळे खुल्या आवाजात संभाषणच काय पण साऱ्याच विषयांवर चर्चा घडत. खासगी लपवण्यासारखे काहीच नव्हते.

कार्पेंटरीच्या समोर एक निळ्या अन्‌‍ सफेद रंगाचे घर होते. साऱ्याच घरांना रंग पिवळा, निळा किंवा किरमिजी. या समोरील घरात एक वृद्धा राहत होती. प्रभाकर सावंत आपली सायकल या घराला टेकवत यावरून जोरदार भांडणे. सायकलीवर मूत्रसिंचन पण होत असे. प्रभाकर पण आक्रमक स्वभावाचा. कार्पेंटरीत कॅथलिक समाजासाठी शवपेट्या करण्याचे पण काम चालू असे. भांडण विकोपाला गेल्यावर कजाग म्हातारीसाठी शवपेटीचा उल्लेख. शिव्यांचा भडिमार अन्‌‍ कुणाच्या तरी मध्यस्थीने तात्पुरती शस्त्रसंधी. विजय प्रभू पार्सेकर देसाई यांचे पण या घरात अल्पकाळ वास्तव्य होते. विजयने या खाष्ट बाईशी कुठल्या वकिली डावपेचानी मात केली देव जाणे! कपेलच्या उजव्या बाजूला देसाई कुटुंबीय. यांची पणजी मार्केटमध्ये दुकाने होती, अजून आहेत. यांना ‘भजेकर’ असे का संबोधीत माहीत नाही. पायाने अधू असलेला सावळो शिंपी शिवणकामात तरबेज! दुरून दुरून गिऱ्हाइके या कळकट टेलरिंग आस्थापनात येत ते सावळ्यामध्ये कसब पारखूनच.

नंतरच्या काळात ती वृद्धा वारली आणि त्या जागेवर एक नवी इमारत आली. मोराईश, देसाई राहत असलेल्या जागेत उंच इमारती आल्या. सावळो टेलरने शिवणकामाला रामराम ठोकून कुंडईकरनगरच्या जवळपास जनरल स्टोअर उघडला. परंतु सावंतची कार्पेंटरी मोडकळीस आलेल्या घरात अजून चालूच आहे. मुक्तीपूर्व काळात असलेल्या या कार्पेंटरीला पणजी शहराइतकाच जुना इतिहास आहे. आम्ही वर बिऱ्हाड करण्यापूर्वी पोर्तुगीजकाळात येथे युरोपियन लोकांचे वास्तव्य होते. त्यांच्या अरेरावीला तोंड देत ही कार्पेंटरी अबाधित राहिली. आमच्या बालपणीच्या आठवणीत या कार्पेंटरीचे काम तेजीत होते. श्रीकांत नावाचा एक सुतार होता. याचे वास्तव्य तेथेच. रात्री फळकुटावर तर्रर्र होऊन झोपणे अन्‌‍ ‘तेरा मेरा प्यार मगर…’ हे सिनेगीत बरळत सभोवती राहणाऱ्यांची झोपमोड, हा त्याचा सततचा कार्यक्रम! त्याकाळी कोणी त्याच्या वाटेला जात नसत. किंबहुना रहिवाशांना तो एक मनोरंजनाचा विषय होत असे. काहीकाळ काम केल्यावर त्याला बडतर्फ करण्यात आले. आपल्यावरचा अन्याय निस्तरण्यासाठी तो मजूर आयुक्तालयात पण गेल्याचे स्मरते. सावंतबंधू यांच्या बहिणीच्या यजमानाने पण येथे निष्ठेने काम केले. बडेजाव न दाखवता. कालांतराने भावाभावांत वितुष्ट आले अन्‌‍ या कार्पेंटरीचा ताबा प्रभाकर सावंत यांच्याकडे आला. मार्केटमधील दुकान कै. विष्णू सावंत यांच्याकडे आले. नव्या जमान्यात पण या कार्पेंटरीने आपल्या सुबक कामामुळे नाव राखले.
या कार्पेंटरीच्या विरुद्ध बाजूला एक चिंचोळी गल्ली होती, जिचे तोंड दुसऱ्या बाजूच्या हमरस्त्यावर होते. या गल्लीत पण कितीतरी कुटुंबे होती. चंदन नायक नावाचा एक छोटा मुलगा आमच्या दुसऱ्या पिढीतील मुलांबरोबर खेळायला यायचा. याचे ध्येय होते क्रिकेटीअर व्हायचे अन्‌‍ झाला चित्रकार! ही गल्ली आम्हाला आठवते ती नेत्रतज्ज्ञ डॉ. अलका प्रभुदेसाईंच्या क्लिनिकमुळे. हे क्लिनिक बिऱ्हाडाजवळ असल्यामुळे वयोवृद्ध माणसांना त्याचा फार मोठा उपयोग होत असे. शिवाय जिना चढण्याचे कष्ट नव्हते.

आम्ही राहत असलेल्या बिऱ्हाडांच्या मागे पण घरमालकाच्या दोन इमारती होत्या. एक अजून आहे. करमळकर नाईक कुटुंबांच्या बैठ्या घराला लागूनच एक इमारत होती. येथे दळवी कुटुंबीय राहायचे. या दळवी कुटुंबीयांच्या मुलांशी आमचा स्नेह जुळला होता. याचे वडील पट्टीचे नाट्यरसिक. सुप्रसिद्ध कोंकणी कवी माधव बोरकरांचे पण यांच्याकडे येणे-जाणे होते. करमळकर कुटुंबातील व्यक्ती व्यापार तसेच शासकीय सेवेत. यातला एक सदस्य सेनादलात काम केलेला. यास्तव कॉलेजात असताना एन.सी.सी.त त्याला उच्च पद आपोआप लाभले होते. या दोन्ही ठिकाणी आता अद्ययावत इमारती आल्या. परंतु मागच्या रस्त्यावरची म्हणजे ‘डेल्मन’ हॉटेलजवळची इमारत जुन्याच स्वरूपात आहे. येथे पोलीस अधिकारी दुआर्तचे वास्तव्य होते. त्याचा मुलगा आर्मांद आमच्या कनिष्ठ बंधूचा वर्गमित्र. गोरापान, हसऱ्या चेहऱ्याचा. ‘पाखला’ म्हणून संबोधले की त्याचा गोरा चेहरा रागाने लालबुंद होत असे. शिवाय हा हौशी मुष्टियोद्धा. यामुळे सवंगड्यांना या पाखल्याची कळ काढण्याची ऊर्मी दाबून ठेवावी लागत असे. या इमारतीच्या विरुद्ध बाजूला कै. गोपीनाथ चांदेलकरांचे भुसारी दुकान होते. त्या काळच्या व्यापार, व्यापारी अन्‌‍ गिऱ्हाइकांचा एक समान दुवा दृगोच्चर होत असे. तो म्हणजे, परंपरागत सुशेगादपणाचा. आता या चांदेलकरांच्या मुलांनी लोणचे, पापड, मसाला या धंद्यात फार मोठी झेप घेतली आहे.

चॅपेलच्या उजव्या बाजूला देसाईंच्या घरानंतर कै. भालचंद्र निगळ्ये यांचे दुमजली निवासस्थान होते. या निवासस्थानात पेडण्यातील कितीतरी मुले शालेय शिक्षणासाठी राहिली. कालांतराने या घराचे रूपांतर ‘त्रिमूर्ती’ या हॉटेलमध्ये झाले. भालचंद्र निगळ्ये यांना शास्त्रीय संगीत ऐकण्याची आवड होती. या घराच्या जवळपासच भाटकर बंधूंचा वाडा होता. यातले वै. मधू भाटकर यांनी दीर्घकाळ गोवा मेडिकल कॉलेजमध्ये सेवा बजावली. या वाड्याचे पण काळसुसंगत रूपांतर इमारतीत झाले. या रांगेतील विरुद्ध बाजूला नाईक, शिरोडकर, सरदेसाई यांची घरे होती. नाईक यांचा टेलरिंग व्यवसाय असावा. शिवाय यांच्या घरातली एक वृद्ध व्यक्ती इलेक्ट्रिसिटीचे पण छोटेमोठे काम करत असे. या घरातील शीला व गीता यांची आमच्या बहिणीशी मैत्री होती. बऱ्याच काळानंतर गीता ही मला सचिवालयात भेटली. चांगल्या हुद्यावर कार्यरत होती. शिरोडकर यांचा सुवर्णालंकार करण्याचा व्यवसाय होता. त्यामुळे साहजिकच कान टोचणे पण यात आले. धोतर-कोट पेहेरावातले शिरोडकर यांनी आमच्या छोट्या बहिणींचे अलगद कान टोचल्याचे स्मरते. आता या कामासाठी अद्ययावत वैद्यकीय सुविधा पण उपलब्ध आहेत. परंतु त्याकाळचा आपुलकीच्या वातावरणात साजरा होणारा सोहळा आगळाच! या शिरोडकर कुटुंबातील एक व्यक्ती ‘टाइम्स ऑफ इंडिया’ या नामांकित वृत्तपत्र समूहात कार्यरत होती. त्याकाळी वर्तमानपत्राच्या कुठल्याही हुद्यावर काम करणाऱ्याला समाजात मानसन्मान लाभत असे. या व्यवसायाला वलयच तसे होते. शिरोडकर यांच्या शेजारीच प्रभाकर सरदेसाई राहत. यांचे तीर्थरूप कै. संभाजी सरदेसाई धेंपो उद्योग समूहात उच्चपदावर होते. यांचा त्याकाळी रुबाब आगळाच! यांच्या शेजारीच नेवरेकर कुटुंबीयांचा वाडा होता. मर्तो अन्‌‍ नारो नेवरेकर म्हणजे त्यावेळचे बडे असामी. या नारो (कदाचित नारायण) नेवरेकरांचा पणजीच्या जनरल पोस्ट ऑफिसजवळ फोटो स्टुडिओ होता. यांचे चिरंजीव दिलीप नेवरेकर देना बँकेत कार्यरत होते. याच बँकेत संगीतरत्न नेवरेकरांच्या घरातील आणखीन एक नेवरेकर देना बँकेत सर्वोच्च पदावर पोचले होते. हे डॉ. प्रसाद नेवरेकर यांचे ज्येष्ठ बंधू. दिलीप नेवरेकर आमच्या घरासमोरून रोज देना बँकेत जाताना दिसायचे. अलीकडेच त्यांचे निधन झाले. यांच्या वाड्याचे रूपांतर इमारतीत बऱ्याच वर्षांपूर्वी झाले होते. पणजीच्या प्रत्येक चौरस मैलाला फार मोठा इतिहास आहे. परंतु हा इतिहास उलगडणाऱ्या, विश्लेषण करणाऱ्या अन्‌‍ रसिकतेने ऐकणाऱ्या व्यक्ती हव्यात.

मुक्तीपूर्व अन्‌‍ मुक्तीनंतरची पणजी सत्तरी पार केलेल्या पिढीने अनुभवली. लाल मातीचे रस्ते, बैलगाड्यांच्या चाकांचे आवाज, टांग्याच्या घोड्यांची टपटप, सायकलीच्या ‘कापिन्य’ हे सारे आता इतिहासजमा झाले. आम्ही राहत असलेल्या परिसरातील त्याकाळच्या संदर्भात महान व्यक्ती आज हयात नाहीत. गतिमान युगात त्यांच्या कार्याची दखल सोडाच, पण संदर्भ पण दिले जात नाहीत. भौतिक प्रगतीच्या विस्फोटात आत्मीयता, सहृदयता, संवेदक्षमता, साधनसुचितेला वाव नसतो. दिवंगत व्यक्तीनी दिलेल्या योगदानाचेही विस्मरण होते. नियतीचे, जीवनाचे रहाटगाडगे चालूच राहते. यासंदर्भात कविवर्य भा. रा. तांबे यांची प्रत्ययकारी शब्द ओठी फुलते-
जन पळभर म्हणतिल हाय हाय
मी जाता राहील कार्य काय?