तज्ज्ञ समितीकडून रात्रीच्या संचारबंदीची शिफारस

0
29

>> रुग्णसंख्या १ हजारांवर गेल्यास शाळांचे वर्ग बंद

वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात रात्रीच्या वेळी संचारबंदी लागू करावी, अशी शिफारस राज्य सरकारच्या कोविड तज्ज्ञ समितीने राज्य कृती दलाला केली आहे. कोविड तज्ज्ञ समितीच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तसेच राज्यातील कोरोना रुग्णांचे सरासरी प्रमाण ३.५ टक्के किंवा सक्रिय रुग्णांची संख्या १ हजारांपेक्षा जास्त झाल्यास शाळांचे वर्ग बंद करावेत, अशी सूचनाही करण्यात आली आहे.

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे, तर दुसर्‍या बाजूलाच कालच राज्यात आमिक्रॉनचा पहिला रुग्ण आढळून आलेला आहे. या पार्श्‍वभूमीवर तज्ज्ञ समितीची बैठक सोमवारी घेण्यात आली. या बैठकीनंतर राज्य कृती दलाला महत्त्वाच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

हॉटेलमध्ये राहणार्‍या सर्वांची आरटी-पीसीआर पद्धतीने कोविड तपासणी करावी. कोरोनाबाधितांचे आठवड्यांतील सरासरी प्रमाण ३.५ टक्क्यांपेक्षा जास्त झाल्यास हॉटेल आणि रेस्टॉरंट ५० टक्के क्षमतेने चालविण्याची सूचना करावी. कार्यक्रमांसाठी सभागृहातील उपस्थिती मर्यादा ५० टक्के एवढी करावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

कोरोनाबाधितांचे सरासरी प्रमाण ७.५ टक्क्यांपेक्षा जास्त झाल्यास आणि सक्रिय रुग्णांची संख्या ३ हजारांपेक्षा जास्त झाल्यास पर्यटनाशी संबंधित सर्व व्यवहार बंद करावेत. तसेच राज्यातील कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण १५ टक्क्यांपेक्षा जास्त झाल्यास सर्व व्यवहार बंद करावेत, अशा सूचना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोविड तज्ज्ञ समितीने
केलेल्या विशेष सूचना :

वाढत्या कोरोना रुग्णांमुळे रात्रीची संचारबंदी लागू करा
हॉटेलमधील सर्वांची आरटी-पीसीआर चाचणी करा.
सक्रिय रुग्णसंख्या १ हजारांवर गेल्यास विद्यालयांचे वर्ग बंद करावेत.

एका आठवड्यात कोरोनाबाधितांचे सरासरी प्रमाण ३.५ टक्क्यांपेक्षा जास्त झाल्यास हॉटेल, रेस्टॉरंट ५० टक्के क्षमतेने चालवावेत. कार्यक्रमांसाठी सभागृहातील उपस्थिती ५० टक्के करावी.

सक्रिय रुग्णांची संख्या ३ हजारांवर गेल्यास पर्यटनविषयक सर्व व्यवहार बंद करावेत.
कोरोनाबाधितांचे प्रमाण १५ टक्क्यांपेक्षा जास्त झाल्यास राज्यातील सर्व व्यवहार बंद करावेत.

राज्यात ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण

>> १७ तारखेला ब्रिटनमधून गोव्यात आलेल्या ८ वर्षांच्या मुलाला लागण

देशातील अनेक राज्यांत ओमिक्रॉनचे रुग्ण सापडत असले तरी आतापर्यंत राज्यात कोरोनाच्या ओमिक्रॉन प्रकाराचा एकही रुग्ण आढळला नव्हता. मात्र अखेर राज्यात ओमिक्रॉनचा शिरकाव झाला असून, ब्रिटनमधून गोव्यात आलेल्या एका ८ वर्षांच्या मुलाला ओमिक्रॉनची लागण झाल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. राज्यात नाताळ आणि नववर्षाची धामधूम सुरू असताना ओमिक्रॉनचा रुग्ण आढळून आल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे.

आरोग्य मंत्री विश्‍वजीत राणे यांनी काल सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली. राज्यात हळूहळू कोरोना रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे. तसेच सक्रिय रुग्णांची संख्या देखील साडेचारशेच्या वर पोहोचली आहे. त्यात ओमिक्रॉनचा रुग्ण आढळल्याने नागरिकांच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे. डिसेंबर महिन्याच्या १७ तारखेला एक ८ वर्षांचा मुलगा ब्रिटनमधून गोव्यात आला होता. त्या मुलाच्या स्वॅबचा नमुना ओमिक्रॉनच्या तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आला होता. सोमवारी आरोग्य खात्याला त्याच्या स्वॅबचा अहवाल प्राप्त झाला, त्यातून सदर मुलगा ओमिक्रॉनबाधित आढळून आला आहे.
गोवा विमानतळावर येणार्‍या प्रवाशांची कोविड तपासणी केली जात आहे. कोविडबाधित आढळून येणार्‍या प्रवाशांच्या स्वॅबचे नमुने ओमिक्रॉनच्या तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविले जातात. आतापर्यंत विदेशातून आलेल्या २८ जणांच्या स्वॅबचे नमुने पुणे येथे पाठविण्यात आले आहेत. त्यातील आठ ते नऊ जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. प्राप्त झालेल्या अहवालांपैकी बहुतेक अहवाल निगेटिव्ह आहेत, तर काही नमुन्यांचे अहवाल अजून प्राप्त झालेले नाहीत.

आरोग्य खात्याकडून नागरिकांच्या सुरक्षेसाठी योग्य पावले उचलण्यात येत आहे. केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून ओमिक्रॉनबाबतची स्थिती हाताळली जाणार आहे, असे आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी स्पष्ट केले आहे.

नवे ६७ कोरोनाबाधित

राज्यात गेल्या चोवीस तासांत नवीन ६७ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील कोरोनाबाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण ३.९९ टक्के एवढे आहे.

गेल्या चोवीस तासांत नवीन १६७८ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यातील ६७ नमुने बाधित आढळून आले. राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असून, सक्रिय रुग्णांची संख्या ४६५ एवढी झाली आहे. कोरोना बळींची एकूण संख्या ३५१९ एवढी आहे.
राज्यात गेल्या चोवीस तासांत आणखी ५१ जण कोरोनामुक्त झाले असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.७९ टक्के एवढे आहे. कोरोनाची लक्षणे जाणवल्याने २ बाधितांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.

आठवड्यातील कोरोना स्थिती
तारीख नवे रुग्ण सक्रिय रुग्ण

२० डिसेंबर २७ ३९६
२१ डिसेंबर ३२ ३८८
२२ डिसेंबर ४३ ३९२
२३ डिसेंबर ५४ ४२९
२४ डिसेंबर ६७ ४५३
२५ डिसेंबर ६० ४६१
२६ डिसेंबर २५ ४४९
२७ डिसेंबर ६७ ४६५