तंत्रज्ञान आत्मसात करण्यास भारतीय अग्रेसर तंत्रज्ञान आत्मसात करण्यास भारतीय अग्रेसर 

0
125

> साउंड डिझाइनर रेसूल फुकूटी यांचे मत

– कालिका बापट

‘अ रेनी डे’ भारतीय सिनेसृष्टीतली क्रांती

गोव्यातील राजेंद्र तालक यांचा ‘अ रेनी डे’ हा मराठी चित्रपट साऊंड डिझाइनींगच्या बाबतीतली भारतीय सिनेसृष्टीतली क्रांती म्हणावी लागेल, असे रेसूल फुकूटी यावेळी म्हणाले. पूर्ण चित्रपट हा केवळ पावसाच्या आवाजावर बेतलेला असून हा पहिलाच चित्रपट आहे जो या पध्दतीने केला आहे, असे फुकूटी म्हणाले. ज्यावेळी दिग्दर्शक राजेंद्र तालक आपल्याकडे आले तेव्हा या प्रकल्पाबाबत मला आश्चर्य वाटले. यावर खूप अभ्यास करावा लागला. खर्च तर अमाप आला. परंतु केवळ साऊंड डिझाइनींगच्या माध्यमाला महत्त्व दिलेला हा भारतीय सिनेसृष्टीतला एक चांगला चित्रपट आपण मानतो, असे ते पुढे म्हणाले.

भारतीय सिनेसृष्टी अत्यंत समृध्द असून आंतरराष्ट्रीय सिनेमांच्या तुलनेत आपणही आता पुढारलेलो आहोत. तसेच तंत्रज्ञान अवगत करणे, त्यावर प्रयोग करणे यातही आपण पुढेच असल्याचे मत साऊंड डिझाइनर रेसूल फुकूटी यांनी व्यक्त केले.  इफ्फीचाच अंतर्भाग असलेल्या ‘इफ्फी नेक्स्ट जेन’ या उपक्रमांंतर्गत आयोजित केलेल्या ‘स्कील स्टुडिओ’ कार्यक्रमात साऊंड डिझाइनर रेसूल फुकूटी आणि अमृत प्रितम यांनी उपस्थितांना सिनेमात साऊंडचे महत्त्व याविषयावर मार्गदर्शन केले. साऊंड डिझाइनींग हा सिनेमाचा महत्त्वाचा भाग असून ज्याप्रमाणे माणसाला ऐकता आलेच पाहिजे त्याचप्रमाणे सिनेमात साऊंड डिझाइनींग हे पाहिजेच, असे यावेळी बोलताना रेसूल फुकूटी म्हणाले. स्लमडॉग मिलीयोनेर या चित्रपटाच्या साऊंड मिक्सींग विभागात ऑस्कर प्राप्त केलेल्या रेसूल फुकूटी आणि अमृत प्रितम दत्त यांनी सिनेमात साऊंडचे महत्त्व या विषयावर बोलताना आपल्या कारकिर्दीतले काही अनुभवही कथन केले. ज्याप्रमाणे भारतीय सिनेमात कलाकारांना महत्त्व असते तेवढे सिनेमाचाच भाग असलेल्या इतर तंत्रज्ञ व कलाकारांना महत्त्व दिले जात नसे. काळाप्रमाणे आमचेही आता चांगले दिवस आले आहेत. कलाकारा एवढा जरी आमचा सन्मान होत नसला तरी आमच्या कामाची दखल घेतली जाते. आणि भारतीय सिनेमा सृष्टीत एवढीच ती कमतरता भासते.

उलटपेक्षा आपण विदेशी चित्रपटांच्या तुलनेत फारच पुढारलेलो आहोत, असे रेसूल फुकूटी यावेळी म्हणाले. गेल्या पंधरा वर्षांच्या कारकिर्दीत रेसूल फुकूटी यांनी साऊंड डिझाइनींग क्षेत्रात कमालीचा बदल केला आहे. त्यामुळे आज या विभागाला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. रेसूल फुकूटी पुढे बोलताना म्हणाले, भारतीय कला आणि संस्कृतीचे वैभव इतर विदेशी कलांपेक्षा अधिक समृध्द आहे. परंतु त्या मानाने ते वाखाणले जात नाही किंवा त्यात नाविन्यता किंवा त्याला प्रभावीपणे त्या मानाने मांडली जात नाही. ज्याप्रमाणे विदेशात म्युझिक अकादमी आहेत. चित्रपटांबरोबरच संगिताला, आवाजाला, तंत्रज्ञानाला महत्त्व दिले तर आपली सिनेसृष्टी हॉलिवूडच्याही पुढे जाईल. मी तर म्हणतो, आम्ही कुठेच मागे नाही आहोत. परंतु काही त्रुटी आहेत त्या स्वीकारून त्यात बदल तर नक्कीच केले पाहिजे. भारतीय सिनेसृष्टी ही नृत्य, नाटक व संगीतावर बेतलेली. त्यामुळे या कलांच्या पारंपरिकतेचा अधिक प्रभाव आपल्या चित्रपटांवर पडला जातो. आज विश्वभर अनेक फिल्म महोत्सव होतात. त्यात आपण भारतीय सहभागी होतो. तेव्हा कलांची देवाण घेवाण होते. विदेशी चित्रपटांचा अभ्यास केला जातो. चित्रपटात काय असावे, काय नसावे ते पाहिले जाते त्यामुळे आपला चित्रपट आज उंची गाठू लागला आहे. भारतीय सिनेसृष्टी समृध्द आहे असे सांगतानाच त्यातील त्रुटीही लक्षात घ्यायला हव्यात. आपल्या सिनेमांच्या परंतरेत पार्श्वसंगीत फार असायचे. झाडामागून, बागेत नृत्य करीत गाणे म्हणणे हे आपल्याच सिनेमा सृष्टीत आहे. एखादा भावूक, दुखी प्रसंग असला तरी गाणे असायचे हा आपलाच भारतीय ट्रेंड आहे. हळूहळू आता सारे बदलू लागले आहे. संगीत असावे, परंतु ते काळानुरूप, प्रसंगानुरूप असावे या मताचा मी, आजची पिढी देखील आहे, असेही पुढे रेसूल फुकूटी म्हणाले.

अमृत प्रितम यांनी साऊंड डिझाइनींगच्या तंत्रज्ञानाविषयी माहिती दिली. साऊंड डिझाइनिंग अंतर्गत खूप लोकांचा सहभाग असतो, जे आपली वेगवेगळी भूमिका पार पाडतात असे त्यांनी यावेळी सांगितले. साऊंड डिझाइनर हा चित्रपट निर्मितीतला महत्त्वाचा भाग असल्याचे सांगताना ते म्हणाले. चित्रीकरणावेळी वेगवेगळे आवाज नैसर्गिकरीत्या रेकॉर्ड होतात. ते आवाज चित्रपटाला साजेलच असे नसते. तेव्हा संपादन करून त्या आवाजावर संस्कार केले जातात. प्रसंगी चित्रपटाला लागणारा आवाज कृत्रिमरीत्या तयार केला जातो, असेही ते पुढे म्हणाले.

रेसूल फुकूटी म्हणाले, ज्याप्रमाणे एखादा शिल्पकार मूर्ती बनवताना नको असलेला दगड कोरून शिल्प तयार करतो, त्याचप्रमाणे साऊंड डिझाइनरही तेच काम करतो. परंतु इथे टाकलेल्या दगडाचाही वापर होतो असे मी म्हणेन. चित्रीकरणावेळी रेकॉर्ड झालेला आवाज सिनेमेटोग्राफीला पूरक असा तयार केला जातो, असे रेसूल फुकूटी यावेळी म्हणाले. स्कील स्टुडिओ या विभागात चित्रपट निर्मितीचे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांबरोबरच फिल्म संबधित कलाकारही सहभागी होतात. रेसूल फुकूटी आणि अमृत प्रितम यांनी आपल्या अनुभवातील किस्से यावेळी कथन केले. तामिळ, मल्याळम, मराठी, हिंदी अशा भाषांमधील चित्रपटांना या द्वयींनी साऊंड डिझाइनींग केले आहेच त्याचबरोबर हॉलिवूडच्या चित्रपटांसाठीही त्यांनी काम केले आहे. गजनी, मुसाफिर, ट्राफिक सिग्नल अशा अनेक चित्रपटांसाठी या दोघांनी काम केले आहे. फुकूटी यांनी केरळातील भव्य दिव्य असा महोत्सवांचा महोत्सव समजला जाणारा ‘त्रिसूर पूरम’ हा माहितीपट तयार केला आहे. याविषयी बोलताना ते म्हणाले, हा महोत्सव म्हणजे भारतीय संगीताचा वारसा आहे. तो योग्य तर्‍हेने जतन करण्याच्या उद्देशाने आपण या माहितीपटाची निर्मिती केली असल्याचे ते म्हणाले. आपल्या कामाविषयी बोलताना ते म्हणाले, आपण अगदी मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेलो आहोत त्यामुळे कलेसाठी काम करणार्या तरुणांची तळमळ आपण जाणतो. जरी मी आज आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करीत असलो तरी प्रादेशिक चित्रपटांनाही आपण तेवढेच महत्त्व देतो, असे ते यावेळी पुढे बोलताना म्हणाले.