ड्रग्ज प्रकरणात दीपिका, सारा, श्रद्धा यांना समन्स

0
305

>> अमली पदार्थविरोधी पथकाकडून होणार चौकशी

अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, रकुलप्रित सिंह आणि श्रद्धा कपूर यांना समन्स बजावले आहे. दीपिकाची मॅनेजर करिष्मा, डिझायनर सिमॉन खंबाटा आणि सुशांतची मॅनेजर श्रुती मोदी यांनाही चौकशीसाठी बोलावले आहे.

श्रुती मोदी, सिमॉन खंबाटा आणि रकुलप्रित सिंह यांना आज दि. २४ रोजी चौकशीसाठी हजर व्हावे लागणार आहे. दीपिका पदुकोणला उद्या दि. २५ रोजी तर सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांना दि. २६ सप्टेंबरला हजर होण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहे. एनसीबीने यापूर्वी या प्रकरणात १८ जणांना अटक केली आहे.
बॉलिवूडमध्ये ड्रग्जची पाळेमुळे खणून काढण्याच्या दृष्टीने एनसीबीने कारवाई सुरू केली आहे. सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाच्या तपासातून हे अमली पदार्थांचे जाळे समोर आले आहे. आता या प्रकरणात आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, रकुल प्रित सिंह आणि श्रद्धा कपूर यांना एनसीबीने समन्स बजावले आहे. दरम्यान अभिनेता सुशांत सिंह राजपूतची एक्स मॅनेजर जया साहा हिने अमली पदार्थविरोधी पथकाकडून होणार्‍या चौकशीत मोठा खुलासा करताना अभिनेत्री श्रद्धा कपूरसाठी ऑनलाइन सीबीडी ऑईल मागवल्याची कबुली दिली. त्याचप्रमाणे तिने सुशांतसिंह राजपूत, रिया चक्रवर्ती, दिग्दर्शक मधू मंटेना वर्मा आणि स्वत:साठी सीबीडी ऑईल मागवल्याचा खुलासा केला. एनसीबीने चौकशीदरम्यान तिचे श्रद्धासोबतचे व्हॉट्स ऍप चॅट समोर दाखवले आणि सीबीडी ऑईलबद्दल प्रश्न विचारला. त्यावर ते चॅट खरे असून श्रद्धा कपूरला सीबीडी ऑईल पुरवल्याची कबुली जयाने दिली.

दीपिका पदुकोण गोव्यात
दरम्यान, अमली पदार्थप्रकरणात अभिनेत्री दीपिका पदुकोण व तिची मॅनेजर करिश्मा सध्या गोव्यात आहेत. दीपिका सध्या गोव्यात एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी गोव्यात असून मागच्या आठवड्यात दीपिका गोव्यात आली आहे. तिच्यासोबत करिश्माही आलेली आहे. दरम्यान, सारा अली खान हीसुद्धा गोव्यात असून साराच्या आईचे अमृता सिंह हिचे घर गोव्यात आहे. तिथे सारा ही सध्या वास्तव्याला आहे.