डोह

0
868
  • मीना समुद्र

काही व्यथा मनाच्या तळाशी गाडलेल्या असतात. त्या उकरून उफाळून वर काढू नयेत. माणसाला माणूस म्हणून पुन्हा जगण्याला आपणही अबोल राहून मदत करीत बळ द्यावे. कवितेच्या डोहात आशयाचे पाणी किती किती खोल गेलेले असते तशाच डोहमनाची ही कविता!

प्रत्येक डोहाचा तळ गाठायलाच हवा असे नाही
एखादा डोह असू द्यावा अथांग…
-आजचे अत्यंत लोकप्रिय- विशेषतः युवाप्रिय- कवी, गझलकार वैभव जोशी यांची ‘मी-वगैरे’ संग्रहातली ‘डोह’ ही कविता वाचली आणि साहित्यातले, कवितेतले वाचलेले आणि ऐकिव डोह मनासमोर आले अन् त्यांनी मन डहुळून गेले. त्यातल्या काही लाटा प्रकाशित, आनंदी तर काही काळोख्या, नैराश्य आणणार्‍या.
त्यातली पहिली आठवली ती दा. अ. कारे यांच्या ‘झुळुक’ कवितेतली डोहाविषयीची ओळ. कवीला वार्‍याची सानुली मंद झुळूक होऊन स्वैरपणे मन नेईल तिकडे जावे असे वाटते. कधी बाजारात, कधी नदीच्या काठी, कधी राईत, कधी पडक्या वाड्यापाठी… मुक्तपणे वाहणार्‍या या झुळकेला झाडावर आकुळपिकुळ झालेल्या बकुळीची फुले शिंपायची आहेत ती डोहात!
शिंपावी डोही फुले बकुळीची सारी
गाळुनी जांभळे पिकली भुळभुळ तीरी
असे म्हणून कवी डोहाचे स्तब्ध पाणी सुगंधाने आणि फुले शिंपण्याच्या हालचालीने जागे करू इच्छितो, हलवू इच्छितो, छोटे छोटे आनंदतरंग पाहू इच्छितो.
बालकवींची ‘औदुंबर’ ही कविता अतिशय छोटेखानी. पण तिच्यात आशयाचा डोह सामावलेला. ऐलतटावर, पैलतटावर हिरवाळी लेवून बसलेल्या दोन किनार्‍यांमधून वाहणार्‍या झर्‍याच्या काठावर वसलेले ते चार घरांचे गाव, आणि ती पायवाट…
पायवाट पांढरी तयातुन अडवी तिडवी पडे
हिरव्या कुरणामधुन चालली काळ्या डोहाकडे
हा डोह मात्र काळोखा. पण तो काळोख, तो काळिमा कवीला ‘गोड’ वाटतो. कारण त्याच्या पाण्यात पाय टाकून त्याचा तो एकांत, ती शांतता अनुभवत ‘औदुंबर’ म्हणजे स्वतः निसर्गप्रेमी, एकांतप्रिय बालकवीच बसले आहेत जणू. हा डोह मात्र गूढ, गहन वाटतो.
तर कुसुमाग्रजांच्या कवितेत-
पाचोळ्यावर का ही सळसळ
कसली डोहावरती खळबळ
पाऊल वाजे रजनीचे का येताना जगती
असा एक उल्लेख आढळतो. नरसोबाच्या वाडीला नदीच्या पात्रात डोह आहे. तिथे अधूनमधून सुसरी-मगरी दिसतात, त्यामुळे त्या बाजूला पोहणे धोक्याचे आहे असे सांगतात.

अगदी आताआताच नामदेव कोळी यांच्या ‘काळोखाच्या कविता’ या पुस्तकाचा परिचय वाचताना ‘प्रत्येक सर्जनशील मनाच्या काळोख्या डोहातील अनाहत शब्द उजागर करणारी ही कविता’ असल्याचे मत व्यक्त केले होते. तेव्हा तो डोह काळोखाशी आणि मनाशीही संबंधित असल्याची साक्ष पटली होती.
डॉ. मृणालिनी यांचे पुस्तक ‘मनाचिये डोही’ याच शीर्षकाचे आहे आणि त्या मानसतज्ज्ञ असल्याने या मनाच्या काळोख्या डोहातील स्वानुभव चित्रे त्यांनी लेखांद्वारा रेखाटली आहेत.
संत तुकारामांनी वर्णन केलेला मनाचा डोह मात्र ‘आनंदाचे डोही आनंदतरंग’ उठविणारा आहे. आणि त्या आनंदाचे अंगही आनंदाचे आहे. डोहातल्या श्रद्धाभक्तीच्या उजेडात काळोख एकवटून ठाकल्यासारखी विठूची मूर्ती डोळ्यांसमोर उभी ठाकल्यावर त्या अनुभवाचे रूप सावयव आनंदाचेच असणार ना? ‘डोह’ म्हटल्यावर अगदी सहजतेने आठवलेल्या या ओळी, कविता! पण श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचा ‘डोह’ हा लेखसंग्रह वाचताना आपण त्या डोहाचेच जणू होऊन जातो. विस्मयाने त्यांच्या अनुभवात डुबक्या घेऊ लागलो. डोहाचे एक व्यक्तिमत्त्वच आपल्यापुढे साकार होते. डोहाभोवती गुंफलेल्या आठवणी लिहिताना ते म्हणतात, ‘ज्यांची भीती वाटे असे तीन डोह आमच्या नदीत होते. सटवाईचा, आमच्या घराजवळचा नि कड्याकडचा- गडद काळा, भीती वाटावा असा डोह.’ ‘पुढे पसरलेला प्रचंड डोह- डोहापलीकडे हिरव्या दाट झाडीने झाकलेले सामसूम दृश्य. काठच्या झाडीच्या गडद पारदर्शी सावल्या दोहोबाजूंनी एकमेकींना स्पर्शायला जवळ जवळ येतात.’ ‘डोहाचा वास असलेला आसमंत म्हणजे कुणी अतर्क्य शक्तीने समोर उभारलेले एक जिवंत चित्र होते.’ अशी डोहाची वर्णनेही येतात. या डोहातल्या सुसरी-मगरींची वर्णनेही अतिशय जिवंत, चित्रमय शैलीत त्यांनी साकार केली आहेत. त्या लहान मुलाच्या आठवणीतला घरापासचा डोह आपले कुतूहल चाळवतो आणि छोटेखानी असले तरी ते सारे लेख वाचून पुस्तक संपविल्याशिवाय आपल्याला खाली ठेववत नाही- इतके त्या डोहाचे आकर्षण वाटते.

डोह म्हणजे वास्तविक पाहता जलाशय. धरणीवर पावसाचं पडणारं पाणी हे तिथल्या नैसर्गिक, भौगोलिक परिस्थितीनुसार साठवले जाते, प्रवाहित होते किंवा भूमीत जिरते, मुरते. विहीर, धबधबा, तळी, नदी, सागर, झरा या प्रत्येक ठिकाणी पडणारी, वाहणारी पाण्याची रूपे. त्याच्या लाटा, तरंग, तुषार, भोवरे, थेंब हे सारे भूमीच्या स्थितीवर अवलंबून. तलाव, तळी, धरणं बांधीव असतात. जलाशयाचे पाणी समतल कधीच नसते. त्याला रुंदी आणि खोली असते; आणि जिथे ही खोली खूप जास्त असते तिथे डोह निर्माण होतो. उथळ पाण्याला खळखळाट असतो. पण डोहाचे पाणी अतिशय स्तब्ध, स्थिर, एकाच जागी साचून राहिलेले असते. ते डचमळत नाही. वार्‍याने किंवा त्यात निवांतपणे राहणार्‍या सुसरी-मगरींसारख्या जलचरांमुळे कधी ते हलते किंवा त्यांची हालचाल होईल तेव्हाच ते हलते. उसळणं, घुसळणं, खळबळाट हा फक्त त्यावेळीच होतो. ही पाणथळीची जागा, त्यामुळे भोवती निबिड अरण्य माजते. वृक्षवल्लरींनी डोह वेढलेला, त्यामुळे त्यावर नेहमी दाट काळोख साचल्यासारखा असतो. त्याचे पाणी नितळ कधीच असत नाही, ते काळेच दिसते ते त्याच्या खोलीमुळे आणि वृक्षवनस्पतींच्या सावल्यांमुळे. त्यामुळेच डोह गंभीर, गहनगूढ, अथांग वाटतो. त्याच्याबद्दल भीती वाटते आणि एक न संपणारे कुतूहलही. डोहात सात आसरा (अप्सरा) राहतात आणि त्याच्याजवळ गेलेल्या माणसांना त्या ओढून नेतात ते कधीही परत येत नाहीत, अशीही समजूत बर्‍याच ग्रामीण भागातल्या डोहाकाठी राहणार्‍या लोकांच्या मनात असल्याने त्यांना संतुष्ट ठेवण्यासाठी ‘परडी’ सोडली जाते. एरव्ही जलदेवतांना संतुष्ट राखण्यासाठी आपण नाणे टाकतो, नैवेद्य दाखवतो, पूजा करतो तसाच हा प्रकार. पण तो इथे भीतीपोटी केला जातो. जलचरांचा निवांत भंग झाल्यामुळे खरे तर असे होत असते.
वैभव जोशी यांच्या कवितेतला डोह मात्र मनाशी संबंधित वाटतो. मनोव्यापार असेच गूढ, अनाकलनीय, गंभीर, गहन असतात. तेव्हा प्रत्येक व्यक्तीचा डोह वेगळा. कितीही कुतूहल असले तरी सगळ्या गोष्टी उघड्या कराव्यात असे नाही. मौनात, गुप्ततेत, गूढतेतही एक सौंदर्य असते. ते अनाकलनीय असले तरी काही वेळा आपण अंतर राखून त्याला फक्त न्याहाळावं. कधी मन मोकळं झालंच, एखादं पान आपल्याकडे सरकलंच तर तटस्थतेने ते न्याहाळावं. त्याचा बाऊ करू नये. ज्या गोष्टी गुप्त राखायची तिचा बोभाटा करू नये. वाढवून तर मुळीच सांगू नये. त्या डोहाचा स्थायी भाव, त्याची गंभीरता, खोली, डामडौल न मिरवण्याची वृत्ती, शांत-स्थिर प्रकृती आणि प्रवृत्ती त्याला कुठून मिळाली याचा गंभीरपणे समंजस विचार आपणही करावा. दुष्ट, सुष्ट प्रवृत्ती, सुख-दुःख त्यालाही आहेच. दुःखावर, काळोखावर, नैराश्यावर बोट ठेवू नये. डोहाचा तळ असा कधीच गाठू नये. किंवा प्रत्येकाच्या मनातली प्रत्येक गोष्ट इतरांना कळलीच पाहिजे असे नाही. खूपशी आंतरिक ऊर्मी उसळते की दुसर्‍यांना ते गुपीत सांगावे. पण काही खाजगी गोष्टी जपू द्याव्या. आपल्याला कळल्या तर स्वतःशीच ठेवाव्या. जाणण्याच्या उत्सुकतेपायी कुणाच्या जीवनाची शांतता, स्थिरता बिघडवू नये. काही व्यथा मनाच्या तळाशी गाडलेल्या असतात. त्या उकरून उफाळून वर काढू नयेत. माणसाला माणूस म्हणून पुन्हा जगण्याला आपणही अबोल राहून मदत करीत बळ द्यावे. कवितेच्या डोहात आशयाचे पाणी किती किती खोल गेलेले असते तशाच डोहमनाची ही कविता!