डोळ्यांखालील काळी वर्तुळं

0
30
  • डॉ. मनाली पवार
    (सांत इनेज, पणजी)

काळ्या वर्तुळांचा डोळ्यांवर अथवा दृष्टीवर कोणताही परिणाम दिसून येत नाही. चेहर्‍यावर मात्र याचा परिणाम दिसतो. म्हणून योग्य ती कारणं जाणून डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत. सोबत सतत मोबाइलचा वापर असेल व अन्नही पोषक नसेल तर ही डोळ्याखालील काळी वर्तुळं नक्कीच वाढत जाणार.

डोळे हे सौंदर्याचे प्रतीक आहे व हे सुंदर जग पाहण्याचे एक महत्त्वाचे ज्ञानेंद्रिय आहे. एखाद्या व्यक्तीचा चेहरा खुलवण्यासाठी सुंदर डोळ्यांबरोबरच पापण्या व डोळ्यांखालील भागही तितकाच सतेज हवा. परंतु आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रचंड ताणतणावात माणसं जगत आहेत. त्याचप्रमाणे पौष्टिक आहाराचा अभाव व शांततापूर्ण झोपेचाही अभाव असल्याने काही व्यक्तींमध्ये डोळ्यांखालील त्वचेवर काळी वर्तुळं येण्याची शक्यता असते.
अशा पद्धतीच्या काळ्या वर्तुळांमुळे चेहर्‍यावरील सौंदर्य लोप पावते व ती व्यक्ती निस्तेज, थकलेली व प्रौढ दिसू लागते. याचा परिणाम मानसिकतेवरही होऊ शकतो. एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण होण्याची शक्यता आहे. समाजामध्ये मिसळणेही टाळले जाऊ शकते.
डोळ्यांखाली काळी वर्तुळं का येतात?…
शरीरातील पित्त, वात यांच्या अनुषंगाने जेव्हा रक्त धातूची दुष्टी होते तेव्हा त्वचेमध्येही दुष्टी उत्पन्न होते. डोळ्यांखाली येणारी ही काळी वर्तुळेही पित्त, वात व रक्त यांच्या दुष्टीनेच येतात. काळे वर्तुळं येण्याची अनेक कारणे आहेत. त्यांपैकी काही महत्त्वाची कारणे……

  • धावपळीची जीवनशैली
  • चुकीची आहार पद्धती
  • रात्रीचे जागरण
  • पित्त प्रकृती
  • पोट साफ न होणे
  • पांडू रोग (ऍनिमिया)
  • चहा-कॉफीचे अति सेवन
  • मानसिक ताण-तणाव
  • मोबाइल, कॉम्प्युटर व लॅपटॉपचा अति वापर
  • अधिक काळ उन्हात फिरणे
  • आनुवंशिकता
  • वाढते वय
  • जीवनसत्त्वांचा अभाव/ पोषक अन्नाचा अभाव
  • ऍलर्जी
  • धूम्रपानाची सवय
  • मिठाचे पदार्थ उदा. लोणचे, पापड, चटपटीत पदार्थांचे अतिसेवन.
  • जुनाट व्याधी

आजकाल सततच्या लॅपटॉप, मोबाइलच्या वापरामुळे तसेच टीव्हीमुळेही डोळ्यांवर अतिरिक्त ताण येतो. या अतिरिक्त ताणामुळे आपल्या डोळ्याखालील त्वचा पातळ होऊन तेथील वसा, मज्जा कमी झाल्याने रक्तवाहिन्या अधिक प्रमाणात दिसू लागतात व त्याठिकाणी त्वचेचा रंग बदललेला दिसून येतो.

  • डोळ्यांमध्ये काही संसर्ग असल्यास किंवा डोळ्याखालील त्वचेत रक्त साकळल्यासही काळी वर्तुळं जास्त दिसून येतात.
  • कृश व्यक्तीमध्ये पोषक अन्नाच्या अभावामुळे आणि शरीरामध्ये असलेल्या प्रथिनांच्या कमतरतेमुळे त्वचा पातळ व निस्तेज होऊन काळी वर्तुळं अधिक प्रमाणात दिसून येतात.
  • मानसिक ताण- तणाव म्हणजेच चिंता जे रसदुष्टीचे प्रमुख कारण आयुर्वेदात सांगितले आहे. शरीराचे पोषण करणारा आहाररस म्हणजेच रसधातू जर दूषित असेल तर अम्लरक्तादी धातूंचे पोषणही व्यवस्थित होत नाही व त्यामुळे शरीर व मानसिक थकवा जास्त प्रमाणात जाणवतो. परिणामी डोळ्यांखाली काळी वर्तुळं येण्याचे प्रमाणही वाढते.
  • प्रमाणापेक्षा जास्त श्रम केल्याने आपल्या शरीरातील वात व पित्त दोषाचे प्रमाण वाढून वातामुळे शरीरामध्ये रूक्षता आणि पित्तामुळे काळेपणा वाढतो.
  • पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना काळी वर्तुळं येण्याचे प्रमाण जास्त. पित्त म्हणजे उष्णता जेव्हा वाढू लागते तेव्हा त्वचेच्या रंगामध्ये बदल घडतो.
  • अतिरिक्त सौंदर्य प्रसाधनांच्या वापरानेही डोळ्याखाली काळी वर्तुळं येऊ शकतात.
  • आयुर्वेदानुसार उच्च रक्तदाब हा पित्त व रक्ताशी संबंधित असल्याने याचा संबंध नक्कीच काळ्या वर्तुळांशी आहे. जसजसे रक्तदाबाचे प्रमाण वाढत जाते तसतसे या वर्तुळाचे प्रमाणही वाढत जाते. म्हणूनच रक्तदाबावर नियंत्रण ठेवणेही गरजेचे आहे.
  • काळ्या वर्तुळांचा डोळ्यांवर अथवा दृष्टीवर कोणताही परिणाम दिसून येत नाही. चेहर्‍यावर मात्र याचा परिणाम दिसतो. म्हणून योग्य ती कारणं जाणून डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत. वेळीच उपचार न केल्यास याचा आकार व रंग वाढत जाण्याची दाट शक्यता असते. उदा. अपुर्‍या झोपेमुळे काळी वर्तुळं निर्माण झाली असतील आणि ही गोष्ट सतत अव्याहतपणे चालू असेल व सोबत सतत मोबाइलचा वापर असेल व अन्नही पोषक नसेल तर ही डोळ्याखालील काळी वर्तुळं नक्कीच वाढत जाणार.
    ही काळी वर्तुळं एखाद्या जुनाट आजाराची लक्षणे म्हणूनही दिसून येतात. तसेच पुढे होणार्‍या काही आजाराचे पूर्वरूप म्हणून ही वर्तुळं दिसतात. उदा. रक्तदाब, मधुमेह, थायरॉइड, मायग्रेन, मूत्रपिंडाचे आजार इत्यादी.

हे काही उपाय करून पहा….
१. जास्त पाणी पिणे
आयुर्वेदानुसार प्रकृती व ऋतुमानाप्रमाणे खाणे-पिणे असावे. जास्त पाणी पिणे म्हणजे तहान लागल्यावर योग्य प्रमाणात पाणी पिणे. तहान लागल्यावर अवरोध करू नये.
२. काकडी थंड असल्याने डोळ्यांच्या ठिकाणी असलेले पित्त शमण्यास नक्की फरक पडतो.
३. बदाम, चंदन बला, लाक्षादि तेलांसारख्या तेलाचा वापर करावा. रात्री डोळ्याभोवती तेलाने मालीश करावा.४. सी आणि ई-जीवनसत्त्वं असलेले अन्नपदार्थ म्हणजेच सर्व प्रकारची फळे आणि पालेभाज्या जसे की संत्र, टोमॅटो, मोसंबी, बीट, गाजर, आवळा, सूर्यफूल, बदाम, शेंगदाणे, भोपळा असे काही पदार्थ जेवणामध्ये असल्यास त्यातून मिळणारे पोषक घटक त्वचेचे आरोग्य ठेवण्यास नक्कीच मदत करतात.

५. डोळ्याखालील वर्तुळासाठी आयुर्वेद शास्त्रामध्ये अनेक प्रकारचे उपचार क्षुद्ररोगामध्ये वर्णन केले आहेत, त्यातील काही उपाय खाली दिले आहेत….

  • मंजिष्ठा चूर्ण १ चमचा घेऊन तिचा दुधात लेप करणे.
  • बदाम तेल दोन्ही जेवणाच्या मध्ये पोटातून १-१ चमचा घेतले तर उत्तमरीत्या फरक पडतो.
  • अंजना आणि मंजिष्ठा रात्री झोपताना १ कपभर गरम पाण्यात ३० मिनिटे भिजत ठेवून नंतर घेणे.
  • डोळ्यांवर दुधाची पट्टी ठेवणे.
  • जेवणानंतर रोज एक गाजर खाणे
  • डोळ्याभोवती चंदन पावडर + मंजिष्ठा + वाळा + सारीवा + यष्टीमधू यांचा गुलाबपाण्यातून लेप करणे.
  • बटाट्याचा रस रात्रभर डोळ्याभोवती लावून सकाळी थंड पाण्याने चेहरा धुतल्यासही फरक पडतो.
    हे सगळे उपाय कितीही घरगुती वाटले तरी वैद्याच्या सल्ल्यानेच करावेत. कारण प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते. तसेच औषधांचे गुणधर्मही वेगळे असतात.
    दैनंदिन आहार/विहार कसा असावा?…
  • सकाळी लवकर उठणे व रात्री लवकर झोपणे.
  • संपूर्ण अंगाला आठवड्यातून किमान एकदा तरी तेल लावणे.
  • वेळेवर जेवण करावे व आहारामध्ये भरपूर फळे, पालेभाज्या, दूध, तूप, लोणी यांचा समावेश करावा.
  • शिळे अन्न, बेकरीचे, आंबवलेले, मसालेदार, तेलकट आणि बाहेरचे अन्नपदार्थ खाणे टाळावे.
  • चहा- कॉफी, अल्कोहोल यांचे सेवन टाळावे.
  • उन्हात फिरताना गॉगल्सचा वापर करावा.
  • रोज सकाळी नाकामध्ये तीळ तेलाचे थेंब किंवा तुपाचे थेंब टाकावेत.
  • रसायनांनी युक्त सौंदर्य प्रसाधने, साबण, शाम्पू यांचा वापर टाळावा.
  • कोणताही ताण-तणाव न घेता पुरेशी विश्रांती नि झोप घ्यावी.
  • ओंकाराचा जप रोज ५-१० मिनिटे करावा.
  • योगासने आणि प्राणायाम यांचा नियमित अभ्यास करावा.
  • डोळ्यांचे व्यायाम करावेत.
  • टीव्ही, मोबाइल अथवा संगणकाचा अतिरिक्त वापर टाळावा.
  • जवळच्या वैद्याच्या सल्ल्याने वर्षातून एकदा पंचकर्माद्वारे शरीरशुद्धी करून घ्यावी.