अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे काल न्यूयॉर्कमधील मॅनहेटन न्यायालयात हजर झाले. न्यायालयात हजर होताच ट्रम्प यांना पोलिसांनी अटक केली. न्यूयॉर्क ग्रँड ज्युरीने ट्रम्प यांच्यावर ॲडल्ट स्टार प्रकरणात फौजदारी खटला चालवण्यास मान्यता दिली आहे. 2016च्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूक प्रचारात आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. हे प्रकरण पॉर्न स्टारशी संबंधित आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे पॉर्न स्टार असलेल्या स्टॉर्मी डॅनियल्ससोबत अफेअर असल्याचा आरोप आहे आणि ही माहिती लपवण्यासाठी त्यांनी 2016 मध्ये डॅनियल्सला 1,30,000 डॉलर दिल्याचा आरोप आहे. येथे मुद्दा पैसे देण्याचा नसून कोणत्या माध्यमातून पैसे देण्यात आले आहे, त्यासंदर्भात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. अशा प्रकारे गुन्हेगारी आरोपांना सामोरे जावे लागलेले ट्रम्प हे अमेरिकेच्या इतिहासातील पहिले राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. ट्रम्प यांच्यावर फसवणुकीच्या 30 पेक्षा जास्त गुन्ह्यांचा आरोप आहे.