>> इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडने व्यक्त केल्या भावना
वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी संघात स्थान न मिळाल्यानंतर तडकाफडकी निवृत्ती स्वीकारून क्रिकेटला रामराम ठोकण्याचा विचार मनात डोकावला होता, असे इंग्लंडचा जलदगती गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याने काल रविवारी सांगितले.
३४ वर्षीय ब्रॉड याने विंडीजने जिंकलेल्या पहिल्या कसोटीत ‘अंतिम ११’मध्ये स्थान देण्यात आले नव्हते. इंग्लंडने जिंकलेल्या पुढील दोन्ही कसोटीत मिळून त्याने १६ बळी घेत संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला होता.
कसोटीसाठी ‘अंतिम ११’ जणांचा संघ जाहीर होण्यापूर्वी हंगामी कर्णधार बेन स्टोक्सने जेव्हा मला मी खेळणार नसल्याचे सांगितले त्यावेळी मला जबर धक्का बसला. पहिल्या पसंतीचा खेळाडू असतानादेखील स्थान नाकारण्यात आल्यामुळे मी निराश झालो व मनात निवृत्तीचा विचारही डोकावला, असे ब्रॉड म्हणाला. ब्रॉड याच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये १४० सामन्यांची नोंद आहे. त्याच्यापेक्षा अधिक बळी केवळ सहा जणांना घेता आले आहेत. विंडीजविरुद्धच्या अखेरच्या दोन कसोटींत १०.९३च्या सरासरीने बळी घेत ब्रॉडने इंग्लंडचा पहिल्या कसोटीत झालेला पराभव हा आपल्याला संघाबाहेर ठेवल्यामुळेच झाल्याचे अप्रत्यक्षरित्या दाखवून दिले होते.
‘पहिल्या कसोटीत संघ खेळत असताना मला बाहेर बसून त्यांचा खेळ पाहताना खूप दुःख होत होते. मी माझ्या भावना कुणाला सांगू देखील शकत नव्हतो. मनातील विचारांमुळे दोन दिवस मला पुरेशी झोपदेखील मिळाली नाही’, असे ब्रॉड म्हणाला. या कठीण काळात स्टोक्स याने माझ्या रुममध्ये येत माझी विचारपूस केली. त्याला माझ्या स्थितीची पुसटशी कल्पना आली असेल, असे सांगत ब्रॉडने स्टोक्सचे आभार मानले. २००७ साली कसोटी पदार्पण केलेल्या ब्रॉड याला आता ६०० बळींचा टप्पा खुणावत आहे. २००३ साली पदार्पण केलेला व त्याच्या नव्या चेंडूने गोलंदाजी करणारा सहकारी जेम्स अँडरसन ३८ वर्षांचा असून त्याच्या नावावर ५८९ बळी आहेत.