अयोध्येत ‘लक्ष्मण रेषा’

0
199

>> परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त

>> तयारी युद्धपातळीवर : ड्रोनद्वारे नियंत्रण

५ ऑगस्ट रोजी अयोध्येमध्ये राम मंदिराचा भूमीपूजन सोहळा होणार आहे. याकडे सार्‍या देशाचे लक्ष लागून राहिले आहे. तसेच त्याची तयारी सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. त्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

अयोध्येचे उप महानिरीक्षक दीपक कुमार यांनी अयोध्येमधील सुरक्षेची माहिती देताना कोविड प्रोटोकॉल पाळला जाणार असून पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई असेल, अशी माहिती दिली आहे.

दीपक कुमार म्हणाले, शहरातील दुकाने सुरू असतील, मात्र कोरोनाचे सर्व नियम पाळले जाणार आहेत. कोविड योद्धाही तिथे उपस्थित असणार आहेत. पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्रित येण्यास बंदी आहे. ड्रोनच्या माध्यमातून व्हीआयपी मार्गांवर नजर ठेवली जाणार आहे. अयोध्येत राहत असलेल्या लोकांना शहरात फिरण्यावर बंदी नसेल. पण गरजेशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन लोकांना करण्यात आले आहे. बाहेरील लोकांना शहरात प्रवेशबंदी असेल, असेही ते म्हणाले.

कोणतीही घोषणा नाही
५ ऑगस्टला अयोध्येत पोहोचल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वप्रथम हनुमानगढी येथे भेट देत तेथे नतमस्तक होतील. हनुमानगढी येथे पंतप्रधान केवळ ७ मिनिटांचा अवधी देणार आहेत. यात पंतप्रधानांचे आगमन आणि निघून जाणे यांचा समावेश आहे. येथे पंतप्रधान पूजेसाठी सुमारे ३ मिनिटे इतकाच कालावधी घेतील. तसेच यावेळी कोणत्याही प्रकारची घोषणा केली जाणार नसून पूर्णत: हा कार्यक्रम धार्मिक असेल, असे स्पष्ट करण्यात आले.