डॉ. जयप्रकाश तिवारींच्या डीनपदी नियुक्तीला स्थगिती

0
14

बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि इस्पितळाच्या डीनपदी डॉ. जयप्रकाश तिवारी (प्रोफेसर नेफ्रोलॉजी) यांची नियुक्ती करण्याच्या आदेशाला अवघ्या काही तासांत काल रात्री उशिरा स्थगिती देण्यात आली.
गोमेकॉच्या डीनपदी डॉ. जयप्रकाश तिवारी यांच्या नियुक्तीचा आदेश काल सायंकाळी काढण्यात आला होता. यासंबंधीचा आदेश अवर सचिव (कार्मिक-२) यांनी जारी केला होता.

गोवा लोकसेवा आयोगाच्या शिफारशीनुसार ही नियुक्ती करण्यात आली, असे आदेशात म्हटले होते; मात्र रात्री उशिरा या आदेशाला स्थगिती देण्यात आली. परिणामी डॉ. शिवानंद बांदेकर हे गोमेकॉच्या डीनपदी कायम राहणार आहेत. आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी या संदर्भात भाष्य केले असून, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा करून डॉ. जयप्रकाश तिवारींच्या डीनपदी नियुक्तीला स्थगिती दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.