- प्रा. रमेश सप्रे
‘हे असं करा’ किंवा ‘ते -तसं करू नका’ असं सांगण्याला सूचना करणं म्हणतात. दुसर्याला योग्य-अयोग्य अशा प्रकारच्या सूचना देण्याऐवजी स्वतःला दिलेल्या सूचना खूप उपयोगी, प्रभावी ठरू शकतात. डूज् अँड डोंट्स् मध्ये ज्या केवळ सूचना असतात, त्याऐवजी ‘आपण हे असं करु या’ ही भावना हवी.
बायोस्कोप म्हणजे सिनेमा म्हणजे चलच्चित्रपट म्हणजेच पडद्यावरची हलणारी, बदलणारी चित्रं. आरंभी तीन चित्रं पाहू या.
- चित्र क्र. १ – ही रविंद्रनाथ टागोरांची कविता आहे. बालमानसशास्त्राची झलक तिच्यात पाहायला मिळते. घरात महत्त्वाचे पाहुणे येणार आहेत म्हणून घरातल्या लहान मुलाला आई छान आंघोळ घालते, नवे कपडे घालते, गळ्यात सोन्याची साखळी नि डोक्यावर जरीची टोपी. टवटवीत फुलासारख्या आपल्या मुलाकडे पाहत आई त्याला सांगते (खरं तर बजावते). आता बाहेर जायचं नाही. इतर मुलांबरोबर खेळायचं नाही. मातीत खेळून कपडे मळवायचे नाहीत. किती या नकारात्मक सूचना! रविंद्रनाथांचं हे मूल (सर्वच मुलं) मनात विचार करतं ‘हे पाहुणे येतातच कशाला?’ कदाचित प्रार्थनाही करत असेल, ‘देवा, पाहुण्यांना जन्मालाच घालू नकोस रे!’ सूचना नकारात्मक असोत वा सकारात्मक कुणालाच नको असतात.
- चित्र क्र. २ – वयानं जरा मोठा मुलगा. पाहुणे आलेले आहेत. गोडधोड केल्यामुळे सर्वजण जरा जास्तच जेवलेयत. आता झोप घेणं (वामकुक्षी) हा वडील मंडळींचा जन्मसिद्ध अधिकार. त्याचवेळी बच्चे कंपनीचा दंगा करण्याचाही हक्क. अशावेळी आपल्या मुलाला बोलावून पिताश्री सर्व पाहुण्यांसमक्ष सांगतात- ‘आता उन्हात खेळायला जायचं.’ यावर मुलाचं उत्तर ‘नाही जाणार.’ पुढे पिताश्री म्हणतात, ‘घरात खूप दंगा करायचा.’ यावर चिरंजीवांचे उद्गार ‘नाही करणार.’ वडिलांची तिसरी सूचना, ‘आता बिलकुल झोपायचं नाही.’ मुलगा म्हणतो, ‘झोपणार’. अन् खरंच तो थंड झोपून जातो. इथं पिताश्रींनी आपली चतुरता वापरून आपल्या मनासारखं घडवलं असलं तरी प्रत्यक्षात मुलगा बंडखोरीच करतोय. डोन्ट्स् (नकारात्मक) सूचनांच्या विरुद्धच वागतोय.
- चित्र क्र. ३ – कॉलेजमध्ये जाणारी, खरं तर उच्च माध्यमिक विद्यालयात शिकणारी तरुण मुलगी. कॉलेजमध्ये जायला निघते तेव्हा आईवडील डझनावारी सूचना द्यायला लागतात. बरोबर जायला आलेल्या मैत्रिणींच्या कानात ही कन्या पुटपुटते, ‘आता सुरु आईचं कीर्तन नि बाबांचं प्रवचन. हे करू नकोस- ते कर. असं करू नकोस- तसं कर.’ खरंच सुमारे पंधरा मिनिटं सलग आलटून पालटून अशा-तशा सूचना देत असतात. मुलगी मोबाईलवरचे मेसेजेस वाचत असते – आता बोला.
सर्वांना माहीत असलेलं सासू-सून यांच्यातल्या संघर्षाचं एक नाजूक कारण हेच असतं. ‘सारख्या सूचना’ करते ती सासू अन् त्यांना विरोध म्हणून ‘सूचना नकोत’ म्हणणारी सून. हा एक पारंपरिक संघर्ष सर्वत्र दिसून येतो. हे झालं ‘डूज्-डोन्ट्स’चे कौटुंबिक अंग. पण याला एक सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक अंगही आहे. धार्मिक संदर्भात याला विधि-निषेध असं म्हणतात. या गोष्टी करायच्या, अशा रीतीनं करायच्या याला ‘विधी’ (डूज्) म्हणतात. तर या गोष्टी टाळायच्या, त्या निषिद्ध मानलेल्या आहेत त्यांना ‘निषेध’ (डोन्ट्स्) म्हणायचं. या विचारात काही चांगल्या तर काही वाईट गोष्टींचा समावेश होतो. उदा. ‘सर्वांना समान वागणूक द्या’ या साध्या, माणुसकी असलेल्या गोष्टीऐवजी उच्च-नीच, स्पृश्य-अस्पृश्य, श्रेष्ठ-कनिष्ठ असे भेद निर्माण झाले नि समाजाचं आरोग्य धोक्यात आलं. योगशास्त्रात यम-नियम म्हणतात तोही डूज् अँड डोन्ट्स्चाच प्रकार आहे. इतकंच कशाला सर्व सामाजिक संस्था विशेषतः शिक्षणसंस्थांच्या आचारसंहितेत (कोड ऑफ कॉंडक्ट) जे यम-नियम (रुल्स अँड् रेग्युलेशन्स) असतात ते त्या संस्थेच्या निरोगी कार्यवाहीसाठी आवश्यक असतात. आहारातील विधीनिषेध, पथ्यं-अपथ्यं-कुपथ्यं ही निरामय, आरोग्यपूर्ण जीवनासाठी उपयुक्त असतात.
सर्वांत अधिक महत्त्व या डूज् अँड डोंट्स ना येतं ते कौटुंबिक नि शालेय जीवनात. घरी पालक म्हणून मुलांना नि शाळेत शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना जे सांगितलं जातं ते हितकारक असूनही त्यांचा प्रभाव मुलांच्या जीवनावर पडलेला दिसत नाही. कारण त्याच त्याच शब्दांत, त्याच त्याच पद्धतीनं, तेच तेच सांगितलं गेलं तर प्रभाव कसा पडणार?
एका प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यानं परीक्षेत ‘उलट अर्थाचे शब्द लिहा’ या प्रश्नाच्या उत्तरात – चांगला च्या विरुद्ध वाईट असं लिहिण्याऐवजी ‘लागचां’ असं लिहिलं, ‘चतुर’ शब्दाच्या उलट अर्थाचा शब्द म्हणून ‘रतुच’ असं लिहिलं. अशा प्रकारचे हे डूज् अँड डोंट्स नसतात. म्हणजे – ‘लवकर उठावं’ याच्या विरुद्ध ‘उशीरा उठू नये’ असं म्हणण्यात काही अर्थ नसतो. तर ‘अभ्यास करावा’ याच्या उलट ‘जास्त टी.व्ही. पाहू नये, मोबाईलवर बोलण्यात वेळ घालवू नये, मित्रांबरोबर उगीचच खेळत बसू नये इ. गोष्टी असतात.
सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘हे असं करा’ किंवा ‘ते -तसं करू नका’ असं सांगण्याला सूचना करणं म्हणतात. दुसर्याला योग्य-अयोग्य अशा प्रकारच्या सूचना देण्याऐवजी स्वतःला दिलेल्या सूचना (ऑटो सजेशन्स) खूप उपयोगी, प्रभावी ठरू शकतात.
एक प्रयोग पालकांनी करून पाहण्यासारखा आहे. संपूर्ण दिवसभर कामाच्या अगर सुटीच्या दिवशी मुलांशी झालेलं आपलं बोलणं रेकॉर्ड करून रात्री ऐकलं तर दोन गोष्टी लक्षात येतील. मुलांशी ‘प्रेमानं संभाषण’ करण्याऐवजी आपण ‘सूचनात्मक भाषण’ अधिक केलंय आणि या सूचनात केवळ आज्ञेसारख्या आणि नकारात्मक (निषेधात्मक) सूचनाच खूप म्हणजे खूपच असतात. पूर्वी शिक्षणाला इंस्ट्रक्शन म्हणत, इन्स्पेक्शन करतानाही नकारात्मक सूचना दिल्या जात, फक्त चुका काढल्या जात. आता आपण एज्युकेशन शब्द वापरतो. ट्रेनिंगऐवजी एज्युकेशन शब्द वापरतो. याचं सोपं उदाहरण म्हणजे पी.टी. (फिजिकल ट्रेनिंग) न म्हणता पी. ई. (फिजिकल एज्युकेशन) म्हणतो. डूज् अँड डोंट्स् मध्ये ज्या केवळ सूचना असतात, त्याऐवजी ‘आपण हे असं करु या’ (लेट अस् डू) ही भावना हवी. घरीदारी सूचनांचा पाऊस पाडण्याऐवजी संस्कारांचा वर्षाव करू या. तसा संकल्प करू या.