डिचोलीत कारखान्यात सलग 4 स्फोट

0
29

>> अर्धा किलोमीटर परिसरातील घरे हादरली; स्फोटाचे कारण अस्पष्ट

मुस्लिमवाडा-डिचोली येथील कैराव रोलिंग मिल्स या कारखान्याच्या लोखंड वितळणाऱ्या भट्टीत काल सायंकाळी 7 च्या सुमारास सलग चार ते पाच स्फोट झाले. या स्फोटांमुळे सुमारे अर्धा किलोमीटरच्या परिसरातील घरांना हादरे बसले. डिचोली अग्निशमन दलाचे जवान लगेचच घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण आले. स्फोटाचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

सविस्तर माहितीनुसार, कैराव रोलिंग मिल्स या कारखान्यात काल सायंकाळी 7.10 वाजता अचानक एका मागोमाग एक असे सलग 4 स्फोट झाले. या कारखान्यात लोखंड वितळण्याचे काम केले जाते. सलग झालेल्या चार स्फोटांमुळे या कारखान्याच्या अर्धा किलोमीटर परिसरातील घरांना जोरदार हादरे बसले. तसेच मोठा आवाजही झाला. त्यामुळे स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. स्फोटामुळे कारखान्यातून मोठ्या प्रमाणात आगीच्या ज्वाळा आणि धूर बाहेर पडत होता. यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण आले. या स्फोटामुळे कारखान्याच्या आतील सामानाचे मोठे नुकसान झाले. या प्रकरणी स्थानिक लोकांनी तीव्र संताप व्यक्त करून सविस्तर चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली. प्राथमिक चौकशीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले.