ट्वीटरयुद्ध

0
262

आपला संबंध नसताना एखाद्याने दुसर्‍याच्या प्रश्नात नाक खुपसणे याला सरळसोट भाषेमध्ये चोंबडेपणा म्हणतात. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गोमंतकीयांचे हितरक्षक असल्याच्या थाटात ट्वीटरवर बुधवारी हा चोंबडेपणा केला. त्यातून केजरीवाल आणि गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यात ट्वीटरवर जोरदार शाब्दिक चकमकी झडल्या. वास्तविक डॉ. सावंत हे शांत, संयमीपणाबद्दल ओळखले जातात. केजरीवालांनी कितीही उचकावले, तरी त्यांनी ट्वीटरसारख्या जाहीर व्यासपीठावरून त्यांना प्रत्युत्तर देण्याची तशी गरज नव्हती, परंतु शब्दाला शब्द लागला आणि ‘आले अंगावर, घेतले शिंगावर’ या पद्धतीने त्यातून रंगलेले ट्वीटरयुद्ध आम जनतेच्या मनोरंजनाचे मात्र कारण ठरले. दोन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी ट्वीटरसारख्या सार्वजनिक माध्यमातून अशा प्रकारे जाहीरपणे भांडण्याची ही बहुधा पहिलीच वेळ असावी!
‘‘रेलमार्ग दुपदरीकरणास गोमंतकीय विरोध करीत आहेत, केंद्राने हा प्रकल्प गोव्यावर लादला आहे, गोव्यासोबत राहा’’ असा सल्ला देणार्‍या केजरीवालांना डॉ. सावंत केवळ तो राष्ट्रीय प्रकल्प आहे व त्यापासून मोलेला काही भीती नाही असे उत्तर देऊन थांबले नाहीत, तर ‘केंद्र विरुद्ध राज्य असे प्रश्न निर्माण करण्याचे तुमचे कौशल्य जाणतो. तुमचा सल्ला आम्ही सोडून देऊ’ असेही त्यांना ठणकावले. त्यावर केजरीवालांनी ‘माझा सल्ला ऐकू नका, पण गोमंतकीयांचे ऐका’ असे प्रत्युत्तर दिले. गोमंतकीयांच्या आवाजापेक्षा केंद्राचा हुकूम तुम्हाला अधिक महत्त्वाचा वाटतो का, असेही केजरीवालांनी विचारले. त्यावर आमचे पाय आणि कान जमिनीवर घट्ट आहेत. आम्ही एक राष्ट्र आहोत असे प्रत्युत्तर डॉ. सावंत यांनी त्यांना दिले आहे. नुकत्याच केलेल्या दिल्लीवारीचा संदर्भ देत दिल्लीतील हवेचे प्रदूषण आपण अनुभवले आहे. गोव्यापेक्षा तेथे लक्ष देण्याचा सल्लाही सावंतांनी दिला आहे.
वास्तविक, गोव्याच्या विविध प्रश्नांमध्ये केजरीवालांनी यापूर्वी कधी सक्रियपणे लक्ष घातल्याचे मागील निवडणुकीचा प्रचाराचा काळ सोडल्यास कधीच दिसलेले नाही. त्यामुळे आता पुन्हा एकाएकी त्यांचे लक्ष गोव्याकडे वळण्यास सोळा महिन्यांवर येऊन ठेपलेली आगामी विधानसभा निवडणूक आहे हे वेगळे सांगण्याची काही गरज नसावी. गेल्या निवडणुकीमध्ये गोमंतकीयांनी सपशेल झिडकारल्यानंतर आम आदमी पक्षाने गोव्यामध्ये पुनश्च हरि ओम् करण्यासाठी जोरदार प्रयत्न सध्या चालवले आहेत. कोरोनाच्या विषयामध्ये ऑक्सीमित्र योजनेद्वारे आप गोव्यात अवतरला आणि सध्या सुरू असलेल्या जनआंदोलनांमध्येही आपचे कार्यकर्ते सक्रिय भूमिका बजावत आहेत. ही सगळी तयारी निव्वळ निवडणुकीसाठी आहे. डोळा अर्थातच मतांवर आहे. त्यासाठी मिळेल तो विषय हाती घेण्याची धडपड पक्षाने चालवलेली आहे.
भाजपचा गोव्यातील आजवरचा प्रतिस्पर्धी कॉंग्रेस पक्ष गर्भगळीत स्थितीत आहे. मगो पक्ष आमदारांच्या घाऊक पक्षांतरानंतर नामशेष झाला आहे. गोवा फॉरवर्ड टीवटीव करीत असला तरी त्याचा ‘बंदोबस्त’ करण्याची तयारी भाजपने चालवलेली आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये विरोधी पक्षाची भूमिका आक्रमकपणे बजावण्यासाठी आम आदमी पक्ष गोव्यात अवतरत असेल तर शेवटी तो एक राजकीय पक्ष असल्याने त्यात वावगे काहीच नाही. परंतु गोव्याचे प्रश्न गोव्याच्या जनतेने सोडवायचे आहेत. त्यासाठी पक्षाचे गोव्यातील काम अधिक वाढवण्याचा आणि सर्वांपर्यंत नेण्याचा प्रयत्न केजरीवालांनी करावा. दिल्लीत बसून उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रयत्न करू नये. आम आदमी पक्षाला गोव्यात पाय रोवायचे असतील तर एनजीओंच्या कळपापलीकडेच खरा गोवा आहे हे त्यांनी आधी ध्यानी घ्यायला हवे. विशिष्ट कोंडाळ्याचे मत म्हणजेच जनमत मानून त्यानुसार धोरणे आखण्याची घोडचूक आपने गेल्या निवडणुकीतही केली होती. ज्यांना जनता जवळ करीत नाही त्यांना जवळ केल्याची किंमत त्या पक्षाला चुकवावी लागली होती. यावेळीही हेच सल्लागार जवळ केले जाणार असतील तर २०१७ ची पुनरावृत्ती टळणारी नाही. दक्षिण गोव्यातले सध्याचे आंदोलनही विशिष्ट वर्गापुरते सीमित आहे. त्यातील काही मुद्दे महत्त्वाचे जरूर आहेत, परंतु शेवटी हा गोव्याचा अंतर्गत विषय आहे. केजरीवालांना फुकाचा सल्ला हा ‘आपले ठेवावे झाकून नि दुसर्‍याचे पाहावे वाकून’ या पठडीतला आहे. दिल्ली सध्या प्रदूषणग्रस्त बनली आहे. तिचा श्वास कोंडला आहे. कोरोनाची दुसरी लाट उसळताना दिसते आहे. केजरीवालांनी आधी त्याकडे पाहिले पाहिजे. दिल्लीच्या प्रदूषणास कारण ठरणार्‍या जाळल्या जाणार्‍या शेतातल्या मळीपासून जैविक खत बनविण्याचा उत्तम प्रयोग त्यांच्या सरकारने नुकताच यशस्वी केला आहे. गोव्याच्या जनतेला प्रभावित करायचे असेल तर त्यांनी अशा प्रकारच्या कामातून करावे. ट्वीटरवरील वाचाळतेने ना त्यांची वैयक्तिक प्रतिमा सुधारेल, ना पक्षाची!