कुळे येथे दुधसागर धबधबा परिसरात काल सकाळी १० च्या दरम्यान ट्रेकिंग करणार्या विद्यार्थ्यांपैकी चेताली सतीश पाटील (२४) ही दगडावर घसरून वाहत्या पाण्यात पडून लगेच मरण पावली. एरंडावणे पुणे येथून ट्रेकिंग करण्यासाठी ३१ विद्यार्थ्यांचा एक गट आला होता. काल सकाळी ट्रेकिंग करत असताना ही दुर्दैवी घटना घडली. विद्यार्थ्यांमध्ये तिचा एक भाऊही होता. काही जणांनी पाण्यात उडी टाकून तिला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही.
कुळे पोलिसांना खबर दिल्यानंतर उपनिरीक्षक सचिन लोकरे यांनी सहकार्यांसह घटनास्थळी जाऊन मृतदेह पाण्याबाहेर काढला व पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सरकारी इस्पितळात पाठवला. या महिन्यातील ही तिसरी घटना असून यापूर्वीही या ठिकाणी अनेकांना मृत्यूने कवटाळले आहे. दूधसागर सध्या मृत्यूचा सापळा बनला आहे. संरक्षणाच्या बाबतीत येथे कोणतीच उपाय योजना नाही.
ताळगावचे ‘ते’ लोक घरांबाहेरच
पाणी ओसरेना; ५० लाख नुकसानाचा अंदाज
भर गणेश चतुर्थीच्या दिवसात ताळगांव येथील कामराभाट व पीटरभाट येथील सुमारे २०० घरांत पुराचे पाणी घुसल्याने झालेले नुकसान अंदाजे ५० लाखांच्या आसपास असावे असा प्राथमिक अंदाज काल अग्निशामक दलाच्या सुत्रांनी व्यक्त केला. परवाच्या दिवशी सगळे लक्ष हे बचाव कार्यावर केंद्रित करण्यात आले होते. त्यामुळे नेमके नुकसान किती झाले हे कळणे कठीण असल्याचे दलातील सूत्रांनी स्पष्ट केले.
ज्या लोकांच्या घरात पाणी घुसले होते व ज्यांना सुरक्षेसाठी अन्यत्र हलवण्यात आले आहे. त्यांना पुरामुळे त्यांच्या घरातील कोणकोणते साहित्य खराब झाले व त्यामुळे झालेल्या नुकसानीचा आकडा काय आहे त्याची माहिती अग्निशामक दलाला देण्याची सूचना करण्यात आलेली आहे. लोकांच्या घरात पाणी घुसल्याने घरातील टीव्ही संच, अन्य इलेक्ट्रॅनिक वस्तू, अन्न धान्य, कपडेलत्ते, आदीसह हजारोंच्या साहित्याचे नुकसान झालेले आहे. या लोकांना सध्या सरकारी प्राथमिक विद्यालयाच्या इमारतीत तात्पुरते हलवण्यात आलेले असून त्यांच्या खाण्यापिण्याचीही सोय सरकारने केलेली आहे. पूरग्रस्तांपैकी काही लोकांनी आपल्या नातेवाईकांच्या घरी आश्रय घेतलेला आहे. मात्र, तसे असले तरी त्यांना आपल्या घराची चिंता सतावू लागलेली असून काल बर्याच जणानी आपल्या घराकडे चक्कर मारून पुरपरिस्थितीची पाहणी केली. पूर ओसरलेला असला तरी कालही काही घरांमध्ये गुढघाभर पाणी होते. त्यामुळे या लोकांना आपल्या घरी न जाण्याची सूचना अग्निशामक दलाचे अधिकारी तसेच अन्य अधिकार्यांनी केली.
अग्निशामक दलाने कालही काम्राभाट परिसरात मदतकार्यासाठीचे आपले एक वाहन व चार जवानांना तैनात केले होते. हे जवान एकूण परिस्थितीवर नजर ठेवून असून तेथील लोकांना आवश्यक ती मदत करीत असल्याचे अग्निशामक दलाचे संचालक अशोक मेनन यांनी सांगितले. घरात पाणी घुसल्याने संकटात सापडलेले लोक परिस्थितीती लवकरच पूर्वपदावर यावी यासाठी देवाचा धावा करीत असल्याचे काल दिसून आले.
वाळवंटी, कष्टी नदीबाबत सतर्कता
डिचोली – सत्तरी तालुक्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अंजूणे धरणाची पातळी ९२.४५ मीटरपर्यंत वाढल्यानंतर दरवाजे खोलून पाणी सोडण्यात आल्यानंतर वाळवंटी व कष्टी नदीची पातळीबाबत सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने गणेश विसर्जनावेळी काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे.